आशानिराशेचे खेळ

By Admin | Updated: August 19, 2016 04:19 IST2016-08-19T04:19:12+5:302016-08-19T04:19:12+5:30

रिओ आॅलिम्पिकची सांगता होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत सत्तरपेक्षा जास्त देशांनी पदकतालिकेत स्थान मिळविले आहे. त्यात काही इटुकल्या

Mountain sports | आशानिराशेचे खेळ

आशानिराशेचे खेळ

रिओ आॅलिम्पिकची सांगता होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत सत्तरपेक्षा जास्त देशांनी पदकतालिकेत स्थान मिळविले आहे. त्यात काही इटुकल्या-पिटुकल्या देशांचाही समावेश आहे. भारताचा शेजारी चीन यावेळी काहीसा माघारला असला तरी, पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ब्रिटनला कडवी लढत देत आहे. कोट्यवधी भारतीयांच्या मनात दाटत असलेल्या निराशेवर नाही म्हणायला साक्षी मलिकने महिलांच्या कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक का होईना जिंकून फुंकर मारली आहे, इतकेच. एरवी भारतासाठी रिओतून मैदानातील धवल कामगिरीऐवजी मैदानाबाहेरील वादांच्याच बातम्या जास्त येत असताना, चीन संदर्भात आलेली एक बातमी मात्र तमाम भारतीयांना अचंबीत करणारी आहे. टेबल टेनिसमधील महिलांच्या सांघिक प्रकारातील अंतिम सामना संपण्यापूर्वीच, चीनच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याच्या सहकारी प्रशिक्षकासोबत चार वर्षांनंतर होऊ घातलेल्या टोक्यो आॅलिम्पिकसाठीच्या तयारीची चर्चा सुरू केली आहे! क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा आकार इत्यादी मापदंडांच्या आधारे जगातील दहा बड्या देशांमध्ये गणना होणारा भारत मात्र क्रीडा क्षेत्रात तळाशी का, या प्रश्नाचे उत्तर ही बातमी देते. जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी अशी क्रीडा संस्कृती आवश्यक असते. आधुनिक आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात १८९६ मधील पहिली आणि नंतर १९०४, १९०८ व १९१२ मधील स्पर्धांचा अपवाद वगळता, प्रत्येक आॅलिम्पिकमध्ये भारत सहभागी झाला आहे; पण पदकांच्या बाबतीत निरपेक्ष वृत्तीचाच कित्ता गिरवित आला आहे. सर्वोच्च कामगिरी म्हणजे गेल्या आॅलिम्पिकमधील सहा पदके! या उलट चीनचे आॅलिम्पिकमध्ये पदार्पण झाले ते १९५२ मध्ये! त्यानंतर तैवानला स्थान देण्याच्या मुद्यावरून चीनने आॅलिम्पिकवर बहिष्कार घातला तो पार १९८० पर्यंत! आॅलिम्पिक पदार्पणात अवघे एक पदक मिळविलेल्या चीनने १९८४ मध्ये थेट ३२ पदके मिळवित तालिकेत चौथा क्रमांक पटकावला व २००८च्या बीजिंग स्पर्धेत १०० पदके मिळवून पहिल्या क्रमांकालाच गवसणी घातली! चीनच्या या यशामागील रहस्य आहे, ते त्या देशाने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधांमध्ये व रुजविलेल्या क्रीडा संस्कृतीमध्ये! भारतात ना धड पायाभूत सुविधा, ना निखळ गुणवत्तेला प्राधान्य! जोवर हे चित्र बदलत नाही, तोवर आशानिराशेचा खेळ असाच चालत राहाणार!

Web Title: Mountain sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.