मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘मान्सून जन गण मन’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक सुनील तांबे यांच्याशी संवाद.
‘मान्सून जन गण मन’ हे शीर्षक कसे निवडले?- हे पुस्तक मान्सूनची हवामान प्रणाली या विषयावरचं नाही. तर मान्सूनमुळे एकंदर जीवनप्रणाली कशी निर्माण झाली, कशी घडली यावर आहे. ‘जन’ म्हणजे संपूर्ण दक्षिण आशिया, ‘गण’ म्हणजे वेगवेगळे सामाजिक समूह आणि ‘मन’ म्हणजे संस्कृती... मान्सूनच्या प्रभावाखाली समाजरचना, अर्थकारण आणि सांस्कृतिक देवघेव कशी विकसित झाली, याचा शोध हे पुस्तक घेते; त्यामुळे नाव दिलं ‘मान्सून जन गण मन...’
‘मान्सून’ हा शब्द सहसा हवामानाशी जोडला जातो; पण तुमचे पुस्तक तो भौगोलिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक एकात्मतेचा घटक म्हणून सांगते?- आपल्या देशामध्ये सर्वधर्म सहिष्णुता का आहे? तर ती मान्सूनच्या वाऱ्यामुळे आहे हे माझ्या ध्यानात आलं. हिंद महासागरातील सागरी व्यापार मान्सूनच्या वाऱ्यांवर आधारलेला होता. पूर्व आफ्रिका ते इंडोनेशिया हा व्यापारी पट्टा मान्सूनमार्गे जोडला गेला. अरब व्यापारी भारतात येऊन महिनोन्महिने थांबत; त्यामुळे किनारपट्ट्यांवर बहुभाषिक, बहुधर्मी वसाहती निर्माण झाल्या. व्यापारासोबत भाषा, धर्म, न्यायपद्धती आणि संस्कृतीही आली. केरळमधील हिंदू राजांनी स्थापन केलेल्या काझी न्यायालयांत सर्वधर्मीयांना न्याय मिळत असे. उत्तर भारतात खैबरखिंडीमार्गे चालणाऱ्या व्यापारातही परस्परपूरक भूमिका दिसते. या देवघेवीतून सर्वधर्मसमभावाची व्यवहार्य पायाभरणी झाली. याला कारण मान्सून आहे हे माझ्या लक्षात आलं.
या पुस्तकात ‘सिव्हिलायझेशन मार्च’ ही संकल्पना दिसते, ती कशी?- ‘सिव्हिलायझेन मार्च’ ही संकल्पना कुमार केतकरांनी त्यांच्या प्रस्तावनेत मांडलीय. ही संकल्पना पर्यावरण, उत्पादन आणि व्यापार यांच्या परस्परसंबंधातून उलगडते. शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, वनजीविकेवर अवलंबून समाज हे सर्व मान्सूनच्या लयीत गुंफलेले आहेत. या सामूहिक हालचालीतूनच संस्कृतीचा प्रवास म्हणजे ‘सिव्हिलायझेशन मार्च’ घडतो.
या पुस्तकात ‘मान्सून राष्ट्रवाद’ दिसतो, तो नेमका काय? - मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे. हे दिशा बदलणारे वारे आफ्रिकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणखी कुठे कुठे आहेत. परंतु, मान्सूनमुळे आपल्याकडे अर्थात संपूर्ण दक्षिण आशियात पाऊस येतो. पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भारत आणि श्रीलंका या सर्व प्रदेशांमध्ये समान सामाजिक रचना आणि परंपरा दिसतात. म्हणजे मान्सून ही सगळ्या दक्षिण आशियाला एकत्र बांधणारी शक्ती आहे. त्याउलट धर्म, भाषा, प्रांत, वंश हे त्या केंद्रापासून फुटून निघणारी विभाजक शक्ती आहे. त्याची सुरुवात ब्रिटिशांच्या राजवटीपासून झाली. तोपर्यंत असं कधी नव्हतं आपल्याकडे... इतिहासात संघर्ष झाले; पण लोकांचं धर्म, वंश, भाषा यावरून कधी संपूर्ण विभाजन झालं नाही. मान्सून या प्रदेशाला शतकानुशतके जोडणारा घटक आहे.
तुम्ही मान्सूनला एक ऐक्यबांधणी करणारा घटक म्हणता; परंतु विभाजन, संघर्ष आणि असंतोषाचे इतिहासही आहेतच की? - हे असतंच सगळीकडे... वेगवेगळे मानवी समूह आपली सत्ता स्थापन करावी, आपला प्रभाव वाढवावा म्हणून उपद्व्याप करतच असतात, म्हणूनच युद्ध होत असतात ना? मुद्दा असा आहे की तेव्हा युद्ध झाल्यानंतरही संपूर्ण अशा वाटण्या होत नव्हत्या... धर्म, भाषा, प्रांत या गोष्टींवरती आधारित राष्ट्रवादच नव्हता. राष्ट्रवाद ही मुळी आधुनिकच कल्पना आहे. त्यावेळेला ती नव्हतीच...! राज्यविस्तारासाठी युद्धे होत; धर्माधारित राष्ट्रनिर्मितीसाठी नव्हे. मुघल, मराठे किंवा इतर सत्ताधीशांनी सत्ता वाढवली; पण समाजांचे संपूर्ण स्थलांतर किंवा धार्मिक विभाजन झाले नव्हते. आधुनिक लोकशाही आणि वसाहतवादानंतरच धर्म-वंश-भाषाधारित राजकारण तीव्र झाले.
लेखनातून वाचकांना काय विचार, कोणती कृती मिळावी? हे पुस्तक लिहिताना तुमची अपेक्षा काय होती? - दक्षिण आशियाई समाजांनी कृत्रिम भेद ओलांडून आपली ऐतिहासिक एकात्मता ओळखावी. रोहिंग्या, बांग्लादेशी, पाकिस्तानी अशी विभागणी करण्याऐवजी आपण समान पर्यावरणीय वारशाचे भागीदार आहोत, हे समजणे आवश्यक आहे. विविधतेचा उगमही मान्सूनमध्येच आहे. म्हणून मी म्हटलं धर्म, वंश, भाषा हे मान्सूनच्या एकतेला छेद देणाऱ्या शक्ती आहेत. या शक्तींपासून आपण सावध असलं पाहिजे.
भविष्यात भारताच्या भूमिकेमध्ये मान्सूनचा संदर्भ महत्त्वाचा राहील का? - पाश्चात्त्य अर्थव्यवस्थेला खनिज तेल केंद्रस्थानी आहे. तसं भारताच्या अर्थव्यवस्थेला पाणी हे केंद्रस्थानी आहे. कारण आपल्याकडे हजार वर्षं झाली तरी पाऊस
दोन-चार महिनेच पडतो, जास्त नाही पडत ! माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हटले होते तसं मान्सून हाच खरा भारताचा अर्थमंत्री आहे. म्हणूनच पारंपरिक जलसंधारण व्यवस्थांचा पुनर्विचार आवश्यक आहे. जैसलमेरमधील गडीसर लेक आणि चित्तोडगड येथील शतकानुशतके टिकलेल्या जलव्यवस्था याचे उत्तम उदाहरण आहेत. स्थानिक पाणलोट जपून उभी केलेली ही अधोसंरचना आजच्या विकासदृष्टीला पुनर्विचाराची दिशा देते. आजच्या अभियंत्यांकडे तशी दृष्टी असायला हवी. पाणी फक्त आकाशातच तयार होतं. बाकी जगात कुठंही पाण्याचा स्रोत नाही आणि मान्सूनमुळे हे पाणी आपल्याकडे चार महिनेच येतं, याचं भान राखायलाच हवं.
मुलाखत व शब्दांकन :
दुर्गेश सोनार, सहायक संपादक, ‘लोकमत’durgesh.sonar@lokmat.com
Web Summary : Author Sunil Tambe discusses how the monsoon shapes South Asian society, economy, and culture, fostering unity, unlike divisive forces like religion. It highlights the region's shared environmental heritage.
Web Summary : लेखक सुनील तांबे ने बताया कि कैसे मानसून दक्षिण एशियाई समाज, अर्थव्यवस्था और संस्कृति को आकार देता है, एकता को बढ़ावा देता है, धर्म जैसे विभाजनकारी बलों के विपरीत। यह क्षेत्र की साझा पर्यावरणीय विरासत पर प्रकाश डालता है।