धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून धर्माचा गैरवापर

By Admin | Updated: November 5, 2014 00:49 IST2014-11-05T00:49:36+5:302014-11-05T00:49:36+5:30

धर्मांतरितांमध्ये दोन प्रकार आढळतात. एक प्रकार कट्टरपंथी होऊन हातात शस्त्र धारण करतो आणि धर्माच्या नावावर हिंसाचार करण्याला उद्युक्त होतो

Misuse of religion by religious fundamentalists | धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून धर्माचा गैरवापर

धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून धर्माचा गैरवापर

बलबीर पुंज
भाजपाचे उपाध्यक्ष

रेनी जब्बारी नावाच्या २६ वर्षे वयाच्या इराणी महिलेला शनिवारी तेहरानमध्ये फासावर देण्यात आले. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला ठार मारल्याचा आरोप होता. तिच्या शिक्षेचा जगभरातून निषेध झाला. संयुक्त राष्ट्रसंघानेही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षा थांबली नाही. तिने लिहिलेले अखेरचे पत्र पाषाणहृदयी माणसालाही पाझर फोडणारे आहे. इस्लामी कायद्याच्या नावाखाली हा रानटीपणा सुरू आहे. आणखी एका मुस्लिम देशात असाच प्रकार उजेडात आला. पाकिस्तानमध्ये आशिया बिबी नावाच्या एका ख्रिश्चन महिलेला लवकरच फासावर चढविले जाणार आहे. ईश्वरनिंदेचा तिच्यावर आरोप आहे. पण, प्रत्यक्षात तिने ईश्वरनिंदा केलेलीच नाही. शेतमजुरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकच प्याला वापरण्यावरून तिचा इतर महिलांशी वाद झाला. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांविषयी आणि खास करून महिलांविषयी किती द्वेष बाळगला जातो याचे हे उदाहरण आहे. पाच वर्षांपूवीचे हे प्रकरण एवढे तापवण्यात आले, की त्या महिलेबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी तिची तुरुंगात भेट घेणारे पाकिस्तानी पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांना त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडून ठार मारले. ईश्वरनिंदात्मक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता या गव्हर्नरांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्या महिलेला सहानुभूती दाखवणारे पाकचे अल्पसंख्याक मंत्री भट्टी यांचीही हत्या करण्यात आली. पवित्र धार्मिक गोष्टींच्या विरोधात बोलण्यास प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी काही समाजसुधारक करीत आहेत. पण, इतरांचा त्याला विरोध आहे. ईश्वरनिंदेसंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणेला विरोध करणारे फलक देशभर लावण्यात आले होते. ईश्वरनिंदा करणाऱ्यांना ठार मारले जाईल, अशा धमक्या दिल्या गेल्या. तासीर यांचा १८ वर्षे वयाचा मुलगा शाबाज याला पळवण्यात आले आणि सध्या त्याचा ठावठिकाणा नाही. पण बहुसंख्य मुस्लिमेतर देशांमध्ये उदारमतवादी चळवळी आहेत. तिथे प्रसारमाध्यमे सशक्तआहेत. माणुसकीच्या विरोधात जाणाऱ्या जुन्या परंपरांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतासारख्या देशांमध्ये तर महिलांशी भेदभावाने वागायला मनाई आहे. तसे वागणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. आपल्याकडे त्यासाठी कडक कायदे आहेत. इथली प्रसारमाध्यमे स्वतंत्र आहेत. भारतीय घटनेत मात्र धर्म, जात किंवा पंथ या आधारावर कसलाही सापत्नभाव केला जात नाही.
पाकिस्तानमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथल्या व्यवस्थेतच सापत्नभाव आहे आणि तो त्यांच्या मानसिकतेत खोलवर घुसला आहे. कट्टरपंथी इस्लामी राजवटीमध्ये अल्पसंख्याक आणि महिलांची परिस्थिती तर सर्वाधिक दयनीय आहे. उदाहरण म्हणून नायजेरिया किंवा इराकच्या वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचा. नायजेरियामध्ये बोको हरम नावाचा एक हिंसक इस्लामी गट सक्रिय आहे. ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या शाळांमधल्या २०० मुली या गटाने मागे पळवल्या. आता या मुलींना गुलाम म्हणून विकण्याची धमकी त्यांनी दिली आहे. जो विकत घ्यायला तयार आहे त्यांना त्या विकल्या जातील. कुठल्याही धार्मिक ग्रंथात अशा कृत्याचे समर्थन सापडणार नाही, पण हे सारे धर्माच्या नावाखाली केले जात आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे लोक तर अक्षरश: रानटी आहेत. इराकमध्ये अल्पसंख्याकांना भर रस्त्यावर फाशी दिले जात आहे. ओलीस ठेवलेल्या महिलांना ‘सेक्स गुलाम’ म्हणून त्यांच्या ‘योद्ध्यां’साठी वापरले जात आहे.
धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून धर्माचा गैरवापर होत असल्याबद्दल त्या धर्मातील सज्जनशक्तीचा आवाज कट्टर धर्ममार्तंडांकडून दाबून टाकण्यात येतो. धर्मांतरितांमध्ये अन्य धर्मीयांविषयी द्वेषभावना कशा रुजवण्यात येतात, हे धर्मांतरितांनी युरोप आणि अमेरिकेत जो दहशतवाद निर्माण केला आहे त्यावरून पाहायला मिळते. अशाच तऱ्हेच्या एका धर्मांतरित धर्मवेड्याने कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये बंदुकीसह प्रवेश करून पंतप्रधानानांच ओलीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निर्माण झालेल्या गदारोळात आपल्याला नक्की ठार करण्यात येईल याविषयी त्या दहशतवाद्याला खात्री होती. अन्य एका धर्मांतरिताने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या एकाने बुटात दडवून ठेवलेल्या बॉम्बच्या माध्यमातून विमान उडवण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल झाला. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे हा प्रकार साऱ्या जगभर पाहायला मिळतो. पण अन्य धर्मामध्ये प्रवेश केलेले लोक हाती शस्त्र धारण करीत असल्याचा प्रकार अजब आहे.
धर्मांतरितांमध्ये दोन प्रकार आढळतात. एक प्रकार कट्टरपंथी होऊन हातात शस्त्र धारण करतो आणि धर्माच्या नावावर हिंसाचार करण्याला उद्युक्त होतो. ही माणसे मूलतत्त्ववादाकडे वळतात. तर दुसऱ्या प्रकारचे लोक हिंसाचाराला विरोध करतात आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार करतात. त्यांना धार्मिक कट्टरवाद मान्य नसतो. इराकमधील आयएसआयएस, नायजेरियातील बोको हराम यांसारख्या संघटना दगडाने ठेचून मारण्यासारख्या
क्रूर शिक्षा देत असतात. तसेच सामूहिक हिंसाचाराला प्रोत्साहन देऊन स्वर्गप्राप्ती करण्याचा तोच एक मार्ग आहे, अशा तऱ्हेची भावना बाळगत असतात. तरुण मुले आणि मुली धर्माच्या नावावर धार्मिक परंपरांच्या आवरणाखाली जो दहशतवाद करीत असतात तो साऱ्या जगासाठी एक आव्हान ठरला आहे. पाकिस्तान, सिरिया, सुदान, येमेन आणि अन्य राष्ट्रांमध्ये शिया आणि सुन्नी समाज हे एकमेकांवर बॉम्बहल्ले करीत असतात. आपल्या धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांना संपवून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे इस्लामी राष्ट्रांनाही
अशा तऱ्हेच्या प्रवृत्तीचा धोका निर्माण झाला आहे. जगापुढे या प्रवृत्तीने एक भीषण संकट उभे केले आहे.

Web Title: Misuse of religion by religious fundamentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.