मेघदूत बनतोय यमदूत

By Admin | Updated: July 16, 2014 09:01 IST2014-07-16T09:01:38+5:302014-07-16T09:01:38+5:30

हवामानातील बदल हे सध्या तरी एक नैसर्गिक आपत्ती म्हणूनच आपण त्याकडे पाहत आहोत. पण, हे बदल जर जाणूनबुजून करता आले किंवा करता येत असतील तर..!

Meghdoot | मेघदूत बनतोय यमदूत

मेघदूत बनतोय यमदूत

सचिन दिवाण

हवामानातील बदलांमुळे मानवी जीवनावर किती गंभीर परिणाम होतात, ते आपण अनुभवत आहोत. सध्या तरी ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणूनच आपण त्याकडे पाहत आहोत. पण, हे बदल जर जाणूनबुजून करता आले किंवा करता येत असतील तर..! कदाचित आपण या शक्यतेचा विचारही केला नसेल आाणि सद्य:स्थितीला तसा काही संदर्भ आहे, असेही येथे सुचवायचे नाही. पण, हवामानात आपल्याला अनुकूल आणि शत्रूला प्रतिकूल असे बदल करून, हवामानाचा एक शस्त्र म्हणून वापर करण्यावर सध्या अनेक देशांत प्रयत्न सुरू आहेत. यापूवीर्ही असे प्रयत्न केले गेले होते आणि त्यांना थोड्याफार प्रमाणात यशही आले होते.
ऊन, वारा, पाऊस, विजांचा कडकडाट, वादळे, भूकंप अशा नैसर्गिक शक्तींवर आपला ताबा असावा अशी माणसाची फार पूर्वीपासूनची इच्छा आहे. त्यासाठी त्याने वेळोवेळी प्रयत्नही केले आहेत. आधुनिक युगात या प्रयोगांची सुरुवात केली ती १९४६ मध्ये अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरीतील विन्सेंट शीफर आणि आयर्विग लँगमूर या संशोधकांनी. त्यांनी आपल्या प्रयोगात पाण्याच्या बाष्पाच्या थंड ढगांमध्ये शुष्क बर्फाचे (ड्राय आइस म्हणजेच गोठलेला कार्बन डायआॅक्साइड) कण सोडले असता जलबिंदूंचे बर्फाच्या कणांमध्ये रूपांतर झाले आणि तो बर्फ खाली पडला. शुष्क बर्फाच्या ऐवजी सिल्व्हर आयोडाइड किंवा लेड आयोडाइड ही रसायने वापरून असाच परिणाम साधता येतो. त्यातूनच क्लाऊड सिडिंग हे तंत्र विकसित झाले आणि कृत्रिम पावसाचा उगम झाला. मात्र, क्लाऊड सिडिंगसाठी मुळात थोडेतरी पावसाचे ढग असणे गरजेचे आहे. ढग अजिबातच नसताना ते करता येत नाही.
सुरुवातीला केवळ शास्त्रीय पातळीवर असलेले हे संशोधन पुढे युद्धशास्त्रकडे वळले. शीतयुद्धाच्या काळात व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने कृत्रिम पाऊस आपल्या फायद्यासाठी वापरला होता. व्हिएतनामचा भूभाग जंगलांचा आणि डोंगराळ. गनिमी काव्याच्या लढाईसाठी अगदी सुयोग्य. त्याच्याच आधारे सोव्हिएत युनियनच्या मदतीने लढणाऱ्या उत्तर व्हिएतनामी गनिमी योद्ध्यांनी दक्षिण व्हिएतनामच्या पाठीशी असलेल्या अमेरिकेला जेरीस आणले होते. उत्तर व्हिएतनामचे नेते हो-चि-मिन्ह यांच्या नावाने ओळखल्या गेलेल्या हो-चि-मिन्ह ट्रेल या मार्गावरून येणारी गनिमांची रसद तोडण्यासाठी अमेरिकेने प्रोजेक्ट पॉपआय नावाने १९६७ ते १९७२ या काळात एक गुप्त मोहीम राबवली होती. त्यानुसार पूर्व आशियाई मॉन्सून थोडासा लांबवून हो-चि-मिन्ह ट्रेलच्या आसपासच्या प्रदेशात अधिक पाऊस पाडणे आणि त्यायोगे जंगलातील रस्ते, पायवाटा, पूल, खिंडी पुराच्या पाण्याने भरून, तसेच मार्गावर चिखल माजवून आणि दरडी कोसळवून रसदपुरवठा रोखण्याचे उद्दिष्ट होते. अमेरिकी हवाईदलाच्या ५४ व्या व्हेदर रेकॉनेसन्स स्क्वॉड्रनमधील विमाने आणि वैमानिकांनी या भागात क्लाऊड सिडिंग करून पावसाळा वाढवला. या दलाचे ब्रीदवाक्य होते - मेक मड, नॉट वॉर. त्याचा बऱ्याच प्रमाणात अमेरिकी सैन्याला फायदा झाला. जगापासून आणि खुद्द अमेरिकी काँग्रेसपासून लपवून ठेवलेल्या या मोहिमेबद्दल जॅक अँडरसन या पत्रकाराने प्रथम वाच्यता केली आणि हे प्रकरण उजेडात आले.
त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९७७ मध्ये वातावरणाचा लष्करी डावपेचांसाठी वापर करण्याविरुद्ध एक ठराव संमत केला. पण, त्याला डावलून अमेरिका, रशिया, चीनसह अन्य काही देशांत या विषयावर संशोधन सुरू आहे. चीनने ८ आॅगस्ट २00८ रोजी बीजिंगमध्ये झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी आणि १ आॅक्टोबर २00९ रोजी
झालेल्या ६0व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यातील संचलनावेळी कार्यक्रमस्थळी दाटलेले पावसाळी ढग पांगवण्यासाठी हवामानात बदल करण्याच्या तंत्राचा वापर केला. त्यामुळे चिनी अस्मितेचे प्रतीक बनलेल्या या कार्यक्रमांवेळी वातावरण निरभ्र राहिले. हा झाला विधायक उपयोग. पण चीनने या विषयातील संशोधनावर मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ गुंतवण्यास सुरुवात केली आहे. त्यातून निर्माण होणारे बरेचसे तंत्रज्ञान लष्करी वापराचे आहे. शत्रूराष्ट्रांतील हवामान बदलवून, पावसाचे वेळापत्रक कोलमडवून अर्थव्यवस्थेला खीळ घालणे, हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. भारतासारख्या शेजारी आणि शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशाने वेळीच सावध होण्याची गरज आहे.
अमेरिकेच्या अलास्का प्रांतात १९९२ मध्ये हार्प (हाय फ्रिक्वेन्सी अ‍ॅक्टिव्ह आॅरोरल रिसर्च प्रोग्रॅम) या नावाने एक प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार तेथे उच्च क्षमतेच्या अँटेनांचे मोठे जाळे उभे करण्यात आले.
हे अँटेना उच्च वारंवारीतेच्या रेडिओ लहरींच्या माध्यमातून
वातावरणातील आयनोस्फियर या पट्ट्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा प्रसारित करू शकतात. त्यातून स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वातावरणात बदल करून तापमान वाढवता येते. थोडक्यात ही प्रणाली वातावरणातील मोठ्या हिटरसारखी काम करते आणि घातक वैश्विक किरणे पृथ्वीवर येण्यापासून रोखणाऱ्या आवरणाला भगदाड पाडते. त्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवामानात बदल करून, शेती आणि पर्यावरणाचा नाश करता येणे शक्य आहे.
या क्षेत्रात सध्या सुरू असलेले संशोधन पाहता भविष्यात हवामान
हे एक नवे अस्त्र बनल्यास नवल वाटू नये. कालिदासाने मेघदूतात ढगांचे
जे रमणीय वर्णन केले आहे, त्याच ढगांना शस्त्र म्हणून वापरण्याचे
प्रयत्न होत असून, ते बरेचसे यशस्वीही झाले आहेत. हा मेघदूत आता यमदूत बनत आहे.

Web Title: Meghdoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.