Is the meaning of wealth changing? | संपत्तीचा अर्थ बदलत आहे काय?
संपत्तीचा अर्थ बदलत आहे काय?

-संतोष देसाई
(माजी सीईओ फ्युचर ब्रॅण्डस्)

मानवी इतिहासातील सर्वांत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली साधनसंपत्ती ही आपल्याला अत्यंत लहान आकारात उपलब्ध झाली आहे. माझा संबंध ‘गुगल सर्च बार’शी आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणातील माहितीचे दरवाजे आपल्यासाठी खुले झाले आहेत. ज्या सर्व्हरमुळे ही माहिती उपलब्ध होते, ते आपल्यासाठी अदृश्य असतात. तसेच जे अ‍ॅल्गोरिद्म आपल्याला ही माहिती शोधण्यासाठी मदत करतात, तेही अदृश्य स्वरूपातच असतात. ही साधनसंपत्ती प्रदर्शनासाठी नसते. त्यात काय काय उपलब्ध आहे, हे महत्त्वाचे नसते. पण आपल्याला त्याची जेव्हा गरज असते तेव्हा ती पूर्ण होत असते, हे महत्त्वाचे असते.

विपुलतेचे आजचे मॉडेल हे पूर्वीपेक्षा खूप वेगळे आहे. पैशाने समृद्ध असलेले श्रीमंत दिसतात आणि त्यांचे वर्तनही साजेसे असते. जे बुद्धिमान असतात ते आपले पांडित्य या ना त्या प्रकारे व्यक्त करीत असतात. आपला पोशाख, आपले जीवनातील गंतव्य, आपली शब्दसंपदा यातून आपल्या विद्वत्तेचे दर्शन घडत असते. कोणत्याही तºहेची संपत्ती धारण केल्याने आपण ठळकपणे उठून दिसतो आणि आपल्यात त्यामुळे बदलही घडत असतो. पण गुगलमुळे मिळणारी विपुलता ही उघडीवाघडी असते. ती कोणताही बडेजाव मिरवत नाही. ही विपुलता आपल्याला न मागताही उपलब्ध असते. एआरबीएनबी, ओयो किंवा उबेर यांच्या मालकीचे काहीच नसते; पण त्यांच्या माध्यमातून विपुलतेची प्राप्ती मात्र होत असते.

आपल्याला जे हवे आहे, जेव्हा हवे आहे तेव्हा ते मिळत गेले तर त्या संपत्तीचे मूल्य काय राहील? पंधरा मोटारगाड्या किंवा तीन घरे किंवा कपड्यांनी भरलेला वॉर्डरोब कशासाठी स्वत:जवळ बाळगायचा, जर या गोष्टी इच्छा करताच मिळू शकतात? कारण कोणत्याही विवक्षित क्षणी आपण एकच पोशाख घालू शकतो, एकाच घरात राहू शकतो आणि कितीही चैन केली तरी एकदाच जेवण करू शकतो! आपल्याला परवडू शकते म्हणून अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणे आजच्या जगात निरर्थक ठरते. कारण आपली इच्छा एका क्षणात पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून बघितले तर सरप्लसची कल्पनासुद्धा अतिशयोक्ती ठरू शकते. पण ही काही नवीन कल्पना नाही. जेव्हा समाज शिकार करून जगत होता, तेव्हा साठवणूक करण्याची कल्पनाच अस्तित्वात नव्हती. तसेच स्वत:च्या मालकीचं काही असण्याची गरज नव्हती. त्या वेळी संपत्ती कशाला म्हणत? गरज असली की शिकार करायची, हेच काम होते. जेव्हा मानवी वसाहती अस्तित्वात आल्या तेव्हा साठवणुकीची गरज भासू लागली. अभावाच्या शक्यतेने साठवून ठेवण्यास सुरुवात झाली.


आज मूलभूत गरजाच नाहीशा होऊ लागल्या आहेत. डिजिटलायझेशनने सर्व जग व्यापून टाकले आहे. त्यामुळे गरजा आणि गरजांची पूर्तता यातील अंतर कमी झाले आहे. आता वस्तूंचा संग्रह करण्याची गरज उरलेली नाही. विपुलतेची कल्पना आता बदलली आहे. आजच्या पिढीला नवे अनुभव घेण्याची उत्सुकता आहे. एकाच प्रकारच्या अनेक गोष्टी साठवून ठेवणे त्यांना निरर्थक वाटते. कारण आज अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपण याकडे वेगळ्या दृष्टीने बघू. सगळ्यात श्रीमंत कोण? नेट फ्लिक्स पाहणारा की अ‍ॅमेझॉन प्राईम पाहणारा? जो अधिक पाहतो? विविधता पाहतो, नवे पाहतो. नवे प्रयोग पाहतो तो अधिक श्रीमंत? तुम्ही कुणाचा हेवा कराल? आजच्या काळात अनेक चित्रपट संग्रही असणे किंवा गाण्यांचा साठा असणे हेही अर्थहीन झाले आहे. कारण आपल्याला ते सर्व किंमत चुकवून केव्हाही तत्काळ मिळू शकते. गुगलमुळे सर्व माणसे श्रीमंत झाली आहेत, ती श्रीमंती आपण किती वापरतो, हे फारसे महत्त्वाचे नसते! श्रीमंत म्हणजे तुमच्यापाशी विपुल असणे आणि इतरांपाशी त्याचा अभाव असणे. पण त्या स्थितीत जर बदल झाला तर कुणी श्रीमंत आहे म्हणून त्याचा हेवा करायचा हेही निरर्थक ठरले आहे.

आपण ज्याची ज्याची कल्पना करू ते ते आपल्याला मिळते आहे, अशावेळी संपत्तीचा अर्थसुद्धा काल्पनिक ठरेल. आज जे अधिक कल्पक आहेत ते अधिक पुढे जातील आणि इतरांकडून त्याचा मत्सर केला जाईल. आपल्या सर्वांना कॅनव्हास आणि रंगाच्या पेट्या उपलब्ध झाल्या तरी पिकासो हा एखादाच असतो. वस्तूंचा संग्रह करणे म्हणजे आपल्याला हवे ते हवे तेव्हा उपलब्ध व्हावे, यासाठी पर्यायांचा संग्रह करणे होय. अनेकवेळा पर्याय देण्यात येतात. त्यातून तुम्ही कशाची निवड करता, हेच महत्त्वाचे असते. वस्तूचा उपयोग करणे हे अधिक तरल होत जाणार आहे आणि तीच तुमची अभिव्यक्ती असेल. 

भांडवल हे संपत्तीपासून भिन्न असते, कल्पकतेच्या आविष्कारासाठी भांडवल आवश्यक असते, त्याशिवाय नवीन काही करण्याची प्रेरणा मिळू शकत नाही. पैशामुळे अधिकार विकत घेता येतात, पण ते प्रवाहित करता येत नाहीत. संपत्ती ही सामाजिक कार्यासाठी आवश्यक असते आणि तिचे हे काम सहजासहजी नष्ट होणार नाही. भविष्यात मोठे बदल घडणार आहेत. नव्या कल्पना उदयास येत आहेत आणि जुन्या मागे पडत आहेत. नव्या कल्पनांनी नवे आकार तयार होत आहेत. त्याचे आपल्यावर काय परिणाम होतील, हे सध्याच सांगता येणार नाही. पण आपण नवीन मूलभूत प्रश्न उपस्थित करायला हवेत आणि नव्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात, एवढे मात्र खरे आहे.

Web Title: Is the meaning of wealth changing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.