‘पीके’चे तात्पर्य
By Admin | Updated: January 2, 2015 23:56 IST2015-01-02T23:56:51+5:302015-01-02T23:56:51+5:30
पीकेच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला १00 टक्के पाठिंबा देताना इतकेच म्हणावेसे वाटते, की असा लढा 'लंच बॉक्स', 'फँड्री', 'अस्तु' किंवा अशा एखाद्या चित्रपटासाठी द्यायला अधिक बरे वाटले असते

‘पीके’चे तात्पर्य
पीकेच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला १00 टक्के पाठिंबा देताना इतकेच म्हणावेसे वाटते, की असा लढा 'लंच बॉक्स', 'फँड्री', 'अस्तु' किंवा अशा एखाद्या चित्रपटासाठी द्यायला अधिक बरे वाटले असते. पीके तीनशे-चारशे कोटींचा गल्ला जमवताना, अस्तुसारख्या चित्रपटाला चित्रपटगृहच मिळत नाही म्हणून लढावे लागते याचे मात्र वाईट वाटल्याशिवाय राहात नाही.
ल्टेअरचे एक विख्यात वचन अनेक वेळा उद्धृत केले जाते,
क ङ्मि ल्लङ्म३ ँ१ीी ६्र३ँ ६ँं३ ८ङ्म४ ँं५ी ३ङ्म २ं८, ु४३ क'’’ ीिाील्ल ि३ङ्म ३ँी ीिं३ँ ८ङ्म४१ १्रॅँ३ ३ङ्म २ं८ ्र३.
विशेषत: एखाद्या कलाकृतीच्या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा या वचनाची आठवण होतेच. सध्या चाललेला ‘पीके’ या अमीर खानच्या चित्रपटासंदर्भात पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे, किंवा खरे तर आणला गेला आहे. यावर माझे स्पष्ट मत आहे, की ‘पीके’वर बंदी घाला म्हणणे जितके निरर्थक आणि भंपक आहे तितकेच ‘पीके’मुळे समाजात काही चांगले विचार पसरून सामाजिक सुधारणा होईल ही अपेक्षादेखील निरर्थक आणि भंपक आहे. त्यामुळे व्हॉल्टेअरचे वाक्य किंचित बदलून आपल्याला हिरानी आणि अमीर खान यांना उद्देशून असे म्हणावे लागते, मित्रांनो, तुम्ही कितीही भंपक चित्रपट बनवला असला तरी तुमच्या चित्रपट बनवण्याच्या स्वातंत्र्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे.
यापूर्वी आलेला ‘ओ माय गॉड’ हा उमेश शुक्ला दिग्दर्शित चित्रपट नेमका याच विषयावर होता आणि परेश रावल या ग्रेट अभिनेत्याने केलेली त्यातली आर्ग्युमेंट्स जास्त परिणामकारक होती. तरीही वास्तव हेच आहे, की ‘ओ माय गॉड’चा संदेश काही जनमानसात पोचलेला दिसत नाही. उलट त्या चित्रपटात ज्या बुवाबाजीवर थेट हल्ला चढवला होता, ती बुवाबाजी अधिकाधिक बोकाळत चाललेली दिसते. ज्यांच्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी असे लेबल लावून निरर्थक आणि बिनडोक सिनेमे बनवले जातात ती तथाकथित सर्वसामान्य जनता, बुवा आणि बाबांच्या अधिकच भजनी लागताना दिसते आहे. त्यामुळे ‘पीके’ चित्रपटानेही जनता धडा शिकेल आणि बुवाबाजीविरुद्ध लढायला तयार होईल ही आशा भलतीच भाबडी आहे.
जे चित्रपट प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून काढले जातात, किंवा ज्या चित्रपटांचे वर्णन दोन तास डोके बाजूला ठेवून बघावे असे केले जाते त्या चित्रपटात कितीही मौलिक संदेश दिला तरी तो चित्रपटगृहाच्या अंधारातच विसरला जातो हे वास्तव आपण समजून घ्यायला आणि स्वीकारायला हवे. चित्रपट (किंवा टीव्ही सीरियल्स) हे डोके बाजूला ठेवून बघायचे मनोरंजन आहे, या मानसिकतेतून आपण बाहेर
येऊ तेव्हाच जीवनासाठी कला आणि कलेसाठी
कला या दोन्हीवर होणारा बलात्कार थांबेल. सवंगपणे प्रेक्षकानुनय करणारी कला जीवनासाठी कला या तत्त्वाचा चिद्घोष करत आली तरी तो केवळ
दंभ असतो. त्यातून कोणतीच मूल्ये जनमानसावर बिंबवली जात नाहीत. त्यांचा परिणाम झालाच तरी
तो अत्यंत अल्पकाळ असतो (उदा. लगे रहो मुन्नाभाई चित्रपट बघून आलेली तथाकथित गांधीगिरीची लाट) कारण अशा चित्रपटाची रचना करताना रंजकमूल्ये अग्रस्थानी असल्याने त्यांचाच प्रभाव उरतो.
‘पीके’मध्ये धर्मावर हल्ला वगैरे नाही तर धर्माचा बाजार मांडणाऱ्या बुवाबाजीवर हल्ला आहे. पण तो हल्ला इतका क्षीण आणि वरवरचा आहे, की उरतो तो केवळ अमीर खानचा तथाकथित अप्रतिम अभिनय. शिवाय त्याचे मार्केटिंगदेखील अमीर खानचे टीझिंग नग्नरूप दाखवून केलेले आहे, त्यामुळे त्याचा हेतू सवंग मनोरंजन हाच उरतो. यातली गाणी, फालतू विनोदाची दृश्ये आणि बाळबोध संवाद यांचा परिणाम एक धमाल पिक्चर इतकाच होतो. ‘पीके’ कुठेच आपल्या बुद्धीला आवाहन करत नाही, जिथे बुद्धीला आवाहन नसते तिथे वैचारिक बदल (वैचारिक क्रांती वगैरे तर विसराच) होण्याची शक्यता नसते.
अशा वेळी सवंग तडजोडी न करता बनवलेले आणि शेकडो लेखांपेक्षा अधिक परिणाम करणारे काही चित्रपट आठवतात. स्त्रीशिक्षणावर मौलिक भाष्य करणारा ‘हयात’ (इराणी : दिग्दर्शक : घोलमरेज रमझानी), स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अप्रतिम भाष्य करणारा ‘वाजदा’ (अफगाणी : दिग्दर्शिका : हैफा अल मन्सूर) किंवा आपल्याकडचाच स्त्रियांवर पुरुषी संस्कृतीने केलेल्या अन्यायाला वाचा फोडणारा ‘फायर’ (दिग्दर्शिका : दीपा मेहता) यांसारख्या चित्रपटांत मौलिक संदेश देण्याचा आव न आणता परिणामकारक संदेश दिलेला आढळतो.
‘पीके’च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला १00 टक्के पाठिंबा देताना इतकेच म्हणावेसे वाटते, की असा लढा 'लंच बॉक्स', 'फँड्री', 'अस्तु' किंवा अशा एखाद्या चित्रपटासाठी द्यायला अधिक बरे वाटले असते.
असो. इथे ‘पीके’ तीनशे-चारशे कोटींचा गल्ला जमवताना ‘अस्तु’सारख्या चित्रपटाला चित्रपटगृहच मिळत नाही म्हणून लढावे लागते याचे मात्र वाईट वाटल्याशिवाय राहात नाही. हा प्रेक्षक म्हणून आपलाच पराभव आहे.
प्रेक्षक म्हणून अस्तु किंवा यलो यांसारख्या चित्रपटांचे थिएटरबाहेर जोरदार ब्लॅक मार्केटिंग होणे आणि दबंग सारखे चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटणे हे आपले अंतिम ध्येय असायला हवे.
संजय भास्कर जोशी
साहित्यिक