पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 9, 2025 08:55 IST2025-03-09T08:55:32+5:302025-03-09T08:55:42+5:30

मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात आपण नवी भर टाकली आहे.

Meaning of the word pigeon hole used by MLA Anil Parab in the Legislative Council | पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..?

पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..?

अतुल कुलकर्णी, संपादक

प्रिय अनिल परब नमस्कार. आपण प्रख्यात वकील आहात. कोणते शब्द कुठे आणि कसे वापरायचे? याविषयीचे आपले ज्ञान महाराष्ट्राला आणि मातोश्रीला माहिती आहे. परवा विधान परिषदेत आपण 'पिजन होल' या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगून मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जा कैक पटीने उंचावला. त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्या भाषणावर मंत्री नितेश राणे बरंच काही बोलून गेले. त्यामुळे चाटणे, पुसणे, स्वच्छ करणे या सगळ्या शब्दांना नवे अर्थ आणि संदर्भ प्राप्त झाले. मात्र, आज विषय पिजन होलचा आहे.

अनिल परब यांनी या शब्दाची केलेली व्याख्याच यापुढे वापरली गेली पाहिजे, असा आदेश खरे तर सभापतींनी तत्काळ द्यायला हवा होता. मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात आपण नवी भर टाकली आहे. ती अशी वाया जायला नको. ब्रिटिश वेडे होते. त्यांना शब्दांचे अर्थ कळत नव्हते.

खरे तर पिजन होल हा शब्द ब्रिटिश संसदीय प्रणालीमधून आला. पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या दस्ताऐवजांसाठी छोटे कप्पे असलेले कपाट असे. त्याला पिजन होल्स म्हटले जात असे. जेव्हा एखादा दस्तऐवज त्या कप्प्यात टाकला जायचा, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जायचे किंवा त्यावर काहीही कारवाई होत नसे. हीच संकल्पना पुढे संसदीय कामकाजात वापरली गेली. आपल्याकडे हा शब्द विधिमंडळाच्या कामकाजात वापरला गेल्याचे आमच्या गावाकडचे एक वयोवृद्ध माजी आमदार सांगत होते. विधिमंडळाच्या कामकाजात कुठलाही प्रस्ताव किंवा विधेयकाला अधिक विचार न करता किंवा त्यावर पुढील चर्चा न करता लांबणीवर टाकायचे असेल, तर त्याला पिजन होलमध्ये टाकले जात असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. हा शब्द लोकसभेत, राज्यसभेत आणि विधिमंडळातही वापरला गेल्याचे त्यांचे म्हणणे होते.

जेव्हा एखादे विधेयक किंवा प्रस्ताव सादर केला जातो, तेव्हा तो मंजूर होईल की नाही, यावर चर्चा होते. पण काही वेळा सत्ताधारी पक्ष किंवा सभागृहाचे अधिकारी त्या विधेयकावर चर्चा न करता किंवा मतदान न घेता त्याला बाजूला ठेवतात. अशा वेळी हे विधेयक किंवा प्रस्ताव 'पिजन होल' झाल्याचे म्हटले जाते. याचा अर्थ, त्या प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई केली जाणार नाही किंवा तो पुढील प्रक्रियेत जाणार नाही. ही प्रक्रिया मुख्यतः विधानसभा, लोकसभा किंवा संसदीय समित्यांमध्ये केली जाते, इतका तपशील आम्हाला विधिमंडळाचे जुने जाणते अधिकारीदेखील सांगत होते. हे सगळे आमच्या डोक्यापलीकडचे आहे. खरे खोटे आम्हाला माहिती नाही.

मात्र, आमच्यापुढे काही प्रश्न आहेत, पण वकील आहात. त्यामुळे याचे उत्तर देऊ शकाल. म्हणून आपल्याला विचारतो. राज्यपाल महोदयांचे भाषण पिजन होलमध्ये टाकले, असे सांगितले जाते. बऱ्याचदा, वर्षानुवर्ष पेंडिंग असलेल्या विविध महामंडळांचे अहवाल याच पिजन होलमध्ये टाकले जातात. तारांकित प्रश्नांची उत्तरे, कागदपत्रे, लक्षवेधीची अतिरिक्त उत्तरे अशी विविध प्रकारची माहिती पिजन होलमध्ये टाकल्याचे सभागृहात ऐकायला मिळते. ब्रिटिशांनी ज्या हेतूने या शब्दाचा प्रयोग केला, तो अर्थ इथे लावला तर या सगळ्या गोष्टी कोणतीही कारवाई न करण्यासाठी किंवा पुढे कुठल्याही प्रक्रियेत न पाठवण्यासाठी ठेवल्या जातात का? ज्यावर सरकारला चर्चा करायची नाही, अशा गोष्टी तिथे ठेवल्या जातात का? याचे उत्तर आम्हाला मिळत नाही. म्हणूनच सभागृहात होणाऱ्या गोंधळाच्या बातम्या येत असतील आणि पिजन होलमध्ये टाकले जाणारे सगळे साहित्य गोळा करून आमदारांचे पीए आणखी कुठल्यातरी वेगळ्याच होलमध्ये टाकत असतील असे तर नाही ना... ज्या राज्यपालांच्या भाषणाचा संदर्भ देऊन आपण बोलत होतात, ते भाषण आपल्याला पिजन होलमध्ये मिळाले असे आपण म्हणालात. म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे होते..?

आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हे काहीही कळत नाही आणि कोणी समजावून सांगत नाही. आपण कायद्याचे अभ्यासक, त्याच्यामुळे आपल्याला ते जास्त माहिती असेल... आपणच आता या विषयावरून महाराष्ट्राचे प्रबोधन केले पाहिजे, असे आम्हाला वाटते... त्यामुळेच आपण विधान परिषदेत 'पिजन होल' या शब्दाचे शब्दशः मराठी भाषांतर करून तमाम महाराष्ट्राचे डोळे उघडले. त्याबद्दल आपला शिवाजी पार्कवर मराठी भाषेचे हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या हस्ते सत्काराचा प्रस्ताव याच अधिवेशनात आणायला सांगायचे का..? सभागृहातील ज्या सदस्याने त्याच्या कुत्र्याचे ठेवलेले नाव नंतर बदलले आणि जाहीर माफी मागितली असे आपण सांगितले, त्या माननीय सदस्यालाही आपल्या सत्काराला बोलवायचे का..? अधिवेशन सुरू आहे. याच कालावधीत हा सत्कार समारंभ आपण घेऊन टाकू... सगळे लोकप्रतिनिधी, मंत्री त्याला उपस्थित राहतील... आपल्यालाही कल्पना कशी वाटली ते नक्की कळवा... आपल्या हातून मराठी भाषेची अशीच अभिजात सेवा घडो या सदिच्छासह... आपलाच बाबूराव
 

Web Title: Meaning of the word pigeon hole used by MLA Anil Parab in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.