‘मर्दानगी’ जिवावर बेतू लागली आहे, सावध असा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:29 IST2025-03-20T10:25:09+5:302025-03-20T10:29:06+5:30
जिजाऊ ब्रिगेड, संग्राम संस्था आणि विद्रोही महिला मंच या सांगलीतल्या संस्थांनी ‘जबरदस्तीत कसली मर्दानगी?’ नावाचे अभियान सुरू केले आहे, त्यानिमित्ताने ...

‘मर्दानगी’ जिवावर बेतू लागली आहे, सावध असा !
डॉ. प्रिया प्रभू , सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
नुकत्याच काही बातम्या वाचल्या :
* गाडी कुठे पार्क करायची या मुद्द्यावरून एका वैज्ञानिकाची हत्या झाली. एक साधे भांडण मृत्यूपर्यंत घेऊन गेले. *होळीचा रंग लावू दिला नाही यामुळे विद्यार्थ्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला. एक साधा नकार मृत्यूपर्यंत घेऊन गेला. *गाडीचा वेग २५० च्यावर नेण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात होऊन गाडीतील सर्वजण मृत्युमुखी पडले. धोका टाळण्यासाठी काळजीपूर्वक गाडी चालवणे ‘कूल’ नसल्याने अतिवेगाची नशा मृत्यूपर्यंत घेऊन गेली.
या सर्व वेगळ्या बातम्यांच्या मुळाशी एक गोष्ट सारखी आहे : मर्दानगीविषयी चुकीच्या कल्पना. मर्दानगीची अशी खास व्याख्या समाजाने केलेली नाही. मर्द कसे बनायचे याविषयी कुठे चर्चा किंवा शिक्षण मिळते असेही नाही. मात्र, मर्द कसा असतो, त्याने कसे वागायला-दिसायला-बोलायला हवे याविषयी कळत नकळत समाजाकडून सूचक विधाने होत राहतात. मर्दाने आक्रमक असावे, कोणाचे बोलणे ऐकून घेता कामा नये, बायकोला वरचढ होऊ देता कामा नये, मर्दाने कशाला घाबरू नये, कधी रडू नये, मदत मागू नये, सर्व प्रश्न शक्तीच्या जोरावर सोडवावेत इ. असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश लहानपणापासून मुलग्यांपर्यंत पोहोचतात. अशा वागण्याला समाजामध्ये मान्यता आहे हे दिसते. पण मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना सर्वांसाठीच जीवघेण्या ठर शकतात, याचे भान समाजाला नाही....
‘अरे’ ला ‘का रे’ने उत्तर देणे याला मोठेपणा समजल्याने लहान-सहान भांडणेदेखील लगेच तीव्र स्वरूप धारण करतात. शाब्दिक वाद शारीरिक मारामारीमध्ये आणि नंतर गंभीर दुखापती किंवा मृत्यूमध्ये बदलतात. क्षणाचा राग स्वतःचे व कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकतो. प्रश्न सोडवताना शारीरिक, आर्थिक, सामाजिक बळ वापरणे हा राजमार्ग समजला जातो. यामुळे बऱ्याचदा इतरांवर अन्याय होतो. प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होऊ शकते, मध्यममार्ग निघू शकतो हे समजून घेता येत नाही. हे जसे कौटुंबिक स्तरावर खरे आहे तसेच जागतिक राजकारणाबाबतही खरे आहे.
स्त्रीचे माणूसपण नाकारून तिच्याविषयी ‘मालकी’ भावना तयार होते. तिने वडील , भाऊ, पती, प्रियकर अशा कोणा ना कोणाच्या मर्जीनुसारच वागायला हवे, अन्यथा तिला हिंसेला सामोरे जावे लागते. ही हिंसा कुटुंबातील पुरुष करू शकतात, ओळखीचे पुरुष करू शकतात किंवा अनोळखी पुरुषदेखील करू शकतात. जसे नियम तोडणे, कायदे मोडणे, गोंधळ घालणे, विविध व्यसने करणे, गाड्या वेगाने किंवा धोकादायक रीतीने चालवणे. यासारख्या तथाकथित ‘मर्द’पणाचे लक्षण मानल्या जाणाऱ्या कृती बऱ्याचदा मृत्यूकडे घेऊन जातात.
मुलग्यांना लहानपणापासून स्वतःच्या भावना ओळखणे किंवा स्वीकारणे याची मुभा नसते. केवळ राग आणि आक्रमकपणा याच गोष्टी स्वीकारल्या गेल्याने इतर भावना व्यक्त कशा करायच्या हे समजत नाही. त्यात प्रेम, सहानुभूती हे सारे मागे सारले गेल्याने कुटुंबही आनंदी राहत नाही.
मदत मागणे हे ‘मर्द’पणात कमीपणाचे समजले जाते व त्यामुळे कितीही त्रासात असले तरी ते मदत घेणे नाकारतात. काही मानसिक त्रास असल्यास आत्महत्येपर्यंत पोहोचतो. इतरांना पत्ता लागत नाही. एखाद्या ‘मर्दा’ने एखाद्या मित्राला आपला त्रास सांगितला तर चेष्टा होण्याची जास्त शक्यता असते, कारण त्यालादेखील आधार कसा द्यायचा हे माहीत नसते. अधिक शक्तिशाली, अधिक मोठा, अधिक आक्रमक, अधिक पैसेवाला अशा प्रत्येक बाबतीत अधिकतेच्या आक्रमक अपेक्षांमुळे पुरुषांवरील ताण वाढत राहतो. त्याचे पर्यवसान विविध आजारांमध्ये, व्यसनांमध्ये होते. तरुण वयातील हृदयरोगाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
तुम्ही आजूबाजूला पाहाल, तर असे अनेक ‘मर्द’ दिसतील... सध्या तर या मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आपली पुढील पिढी अनेक अडचणींना सामोरे जाणार आहे. याविषयी खुली चर्चा व्हायला हवी. त्याची फार गरज आहे. जबरदस्तीत मर्दानगी नसते हे समाजाने जाणणे आणि बदलणे आवश्यक आहे. मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना केवळ स्त्रियांसाठी नव्हे, तर पुरुषांसाठीदेखील विषारी आहेत.
drprdeshpande2@gmail.com