Masap: Beautiful combination of tradition and modernity | मसाप : परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ
मसाप : परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ

- विजय बाविस्कर
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११३ वा वर्धापनदिन आज २७ मे रोजी पुण्यात साजरा होत आहे. या निमित्ताने ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते मसाप जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नोहा मस्सील यांना प्रदान केला जाईल. मसाप ही राज्यातील सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था. सर्व साहित्यिक महाराष्ट्राची साहित्यपंढरी म्हणून या संस्थेकडे आदराने पाहतात. तिची निर्मिती ग्रंथकार संमेलनातून झाली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केले. ही संमेलने काही कारणांमुळे खंडित झाली. एखाद्या साहित्य संस्थेची स्थापना केली तर या संमेलनाच्या आयोजनात सातत्य राहील असे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांना वाटले. त्यांनी १९0६ साली पुण्यातील मळेकर वाड्यात प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. त्याला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून मसाप मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. मराठीतील अनेक थोर साहित्यिकांनी बहुमोल वेळ देत या संस्थेसाठी योगदान दिले.
कसोटीच्या काळातही या संस्थेने साहित्यिकांचा आवाज बुलंद राहील याची काळजी घेतली आणि सारस्वतांचा धाकही दाखवून दिला, हे या संस्थेचे मोठेपण. बरेच पाणी नंतर वाहून गेले. मध्यंतरीच्या काळात तिथली कंपूशाही, तिथे काम करणाऱ्या माणसांचा संकुचित दृष्टिकोन आणि साहित्यकारणापेक्षा तिथल्या राजकारणाची अधिक चर्चा यामुळे साहित्यिक आणि साहित्यरसिक परिषदेपासून दुरावले होते. तिथे जाताना लोकांना मोकळेपणा वाटत नव्हता. हे चित्र बदलणे गरजेचे होते.


उत्तम लेखक आणि वक्ते म्हणून नावलौकिक मिळवलेल्या प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली परिषदेत आलेल्या परिवर्तन समूहाने हे चित्र बदलण्यास निश्चितच प्रयत्न केले. ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाºया जिल्हा प्रतिनिधींना अधिक जबाबदाºया आणि अधिकार दिले. साहित्य सहयोग करार करून शिक्षण संस्था आणि शाखा यांच्यात संवाद निर्माण करून शाखांना क्रियाशील बनविले. पुण्यातही मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवियत्री एक कवी असे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रसिकांना परिषदेकडे आकर्षित केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लेखक तुमच्या भेटीला’सारखा उपक्रम राबविला. या साºयातून परिषद साहित्यविषयक काम करते आहे असा विश्वास निर्माण झाला. या मंडळींनी ‘सदाशिव पेठ, पुणे ३0’ मध्ये अडकलेल्या साहित्य परिषदेला पुण्याबाहेर नेले. ग्रामीण भागात, छोट्या गावात शाखा स्थापन केल्या. ग्रामीण साहित्य चळवळीला बळ दिले. खेड्यापाड्यातील साहित्यिकांना व्यासपीठ दिले. विभागीय संमेलन, समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम ग्रामीण भागात घ्यायला सुरूवात केली. शिवार साहित्य संमेलन आणि बांधावरची कवी संमेलने सुरू केली.
साहित्य संमेलन जवळ आले, की अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून चिखलफेक सुरू व्हायची. अनेक साहित्यिक या पदापासून दूरच राहिले. मतदारयाद्या, त्यातील मतदार, पाकिटे गोळा करणारे संस्थाचालक आणि साहित्यिकांना करावी लागणारी यातायात यामुळे समाजात आणि साहित्यविश्वात एक प्रकारे नाराजीचा खेळ सुरू होता. हे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीऐवजी सन्मानाने निवडीला पाठिंबा देण्यासाठी ठराव केला आणि महामंडळात ठाम भूमिका घेतली म्हणून घटनादुरूस्ती झाली. त्यात मुंबई, विदर्भ आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे योगदानही मोलाचे आहे.

काळाची गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञानाशी जोडलेल्या समाजाला परिषदेशी जोडण्यासाठी मसापने संकेतस्थळ सुरू केले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू केला. फेसबुक पेज तयार केले. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. सात खंडात प्रकाशित केलेला मराठी साहित्याचा इतिहास ई बुक रूपात आणला. मसा पत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली. युनिकोडचा वापर सुरू केला. त्यामुळे परिषद तंत्रस्नेही झाली. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकचळवळ सुरू केली.
साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची झालेली निवड हीच साहित्य परिषदेतील परिवर्तनाची नांदी होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत परिषदेची वाटचाल सुरू आहे. मसाप जीवन गौरव पुरस्काराने दिलीप माजगावकर यांचा सन्मान करणार आहे. ही निवड यथार्थ आहेच पण नोहा यांच्यासारख्या इस्राईलमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणाºया भारताबाहेरील मराठी माणसाचा भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान करते आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. परिषद जुन्या विचारांच्या चौकटी मोडते आहे याचेच हे निदर्शक आहे
पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात पदाची हवा गेली, की संस्थेची संस्थाने व्हायला वेळ लागत नाही. गेल्या साडेतीन वर्षात तरी असे घडलेले नाही. यापुढे ही घडू नये हीच यानिमित्ताने अपेक्षा.
( समूह संपादक, लोकमत)

Web Title: Masap: Beautiful combination of tradition and modernity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.