मनुष्यबळ ते वस्त्रबळ : एक उतरता प्रवास
By Admin | Updated: July 8, 2016 04:39 IST2016-07-08T04:39:38+5:302016-07-08T04:39:38+5:30
मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वाचे खाते काढून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्या बरोबरच आपल्या मंत्रिमंडळातील अन्य सर्व नव्या-जुन्या सहकाऱ्यांना सबुरीइतकाच

मनुष्यबळ ते वस्त्रबळ : एक उतरता प्रवास
मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वाचे खाते काढून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्या बरोबरच आपल्या मंत्रिमंडळातील अन्य सर्व नव्या-जुन्या सहकाऱ्यांना सबुरीइतकाच संयमाचा धडा शिकविला आहे. स्मृती इराणी यांच्याकडे आता वस्त्रोद्योग हे कमी बोलाचे व कमीच कर्तृत्वाचे खाते पंतप्रधानांनी सोपविले आहे. इराणींना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान मिळण्यामागचे खरे कारण त्यांचे राजकीय कर्तृत्व हे नसून त्यांनी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली हे आहे. त्या निवडणुकीत त्यांचा अपेक्षेप्रमाणेच पराभवही झाला. त्या जोखमीचे बक्षीस म्हणून त्यांना मनुष्यबळ विकास हे महत्त्वाचे खाते दिले गेले. परंतु संघाचा हिंदुत्वाचा सारा कार्यक्रम अंमलात आणण्याची जबाबदारी आता आपली एकटीचीच असल्याच्या भ्रमात त्यांनी त्या खात्याचा कारभार केला. तो करताना राजनाथसिंहांपासून जेटलींपर्यंतच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांना नाराज केले. पक्षातील ज्येष्ठांचा मान राखला नाही आणि आपल्या निर्णयांबाबतही फारसा विवेक राखला नाही. त्यांचा पहिलाच निर्णय फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये गजेंद्र चौहान या दुय्यम दर्जाच्या नटाला संचालक म्हणून नेमण्याचा. त्याविरुद्ध तेथील विद्यार्थ्यांनी कित्येक महिने संप व बहिष्काराचे आंदोलन केले. त्याच काळात हैदराबादच्या विद्यापीठातील वसतीगृहातून चार दलित विद्यार्थ्यांना घालवून देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे रोहित वेमुला या विद्यार्थ्याला आत्महत्त्या करावी लागली. त्या घटनेने स्मृतीबाईंच्या विरोधात साऱ्या देशातच संतापाची लाट उसळली. पुढे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवडणुकीत पराभूत झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना साथ देण्याचे त्यांचे राजकारण त्यांच्या अंगलट आले आणि कन्हैयाकुमार या नव्या नेत्याचाच त्यातून उदय झाला. आता या कन्हैयाला देशद्रोहाच्या आरोपावरून (गुजरातच्या हार्दिक पटेलप्रमाणेच) तुरुंगात डांबले गेले असले तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि स्मृती इराणींवरचा लोकांचा रोषही कायम आहे. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात तेच चुकीचे राजकारण करून पाहिले व तोच प्रकार नंतरच्या काळात अलीगडबाबतही केला. रोहित वेमुला व कन्हैयाकुमार यांच्या प्रकरणात त्यांनी संसदेत केलेले साभिनय भाषण जोरकस दिसले तरी त्यातील त्यांचे सगळे मुद्दे ठिसूळ व बिनबुडाचे असल्याचे नंतर सिद्ध झाले. ‘बाई हा दूरदर्शनवरील प्रयोग नाही, ही संसद आहे,’ असे त्याविषयी त्यांना मुलायमसिंहांसारख्या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे ऐकविलेही. याच काळात देशातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूपदावर त्यांनी संघाची माणसे आणून बसविली. अमर्त्य सेन यांच्यासारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञाला तेवढ्यासाठी नालंदा विद्यापीठातून बाहेर करण्याचे राजकारणही त्यांनी केले. संघ आणि भाजपा यांच्या नेत्यांच्या नजरेत भरतील अशी ही कामे असल्याचे त्यांना त्या काळात वाटत आले असावे. मात्र याच कामांनी त्यांच्या खात्यावर व सरकारवर देशभर टीका झाली आणि या देशाच्या बहुविधतेला बाधा आणणारे राजकारण त्या आणि त्यांच्या पाठीशी असणारे सारे मिळून करीत आहेत, असेच सर्वत्र बोलले गेले. परंतु आपली नाराजी कुणालाही उघडपणे न ऐकविण्याच्या पंतप्रधानांच्या वृत्तीमुळे आणि माध्यमांमधून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे स्मृतीबाईंचे वर्तन तसेच चालू राहिले. संसदेत हेमामालिनी आणि जया बच्चन यांच्यासारख्या अनेक अभिनेत्री आहेत आणि त्यांचा तेथील अधिकार मोठा आहे. मात्र संयमी वृत्तीने काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीने कृतीशील असूनही त्या प्रसिद्धीच्या मागे नाहीत आणि कोणत्या वादातही त्या पडल्याचे एवढ्या काळात दिसले नाही. फार कशाला, परराष्ट्र मंत्रालयासारखे महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या व एकेकाळी विरोधी पक्ष नेत्या राहिलेल्या सुषमा स्वराज यांनीही आताच्या राजकारणात पुढेपुढे करण्याचे जे टाळले तेही स्मृती इराणींना साधले नाही. अशा माणसांना सांभाळून घेणे जेवढे अवघड तेवढेच त्यांना आवर घालणेही कठीण असते. त्यांना मग त्यांच्याच पावलांनी खाली उतरू द्यावे लागते. नरेंद्र मोदींनी आता नेमके हेच केले आहे. देशाचा वस्त्रोद्योग मंत्री कोण आहे, हे विचारावे लागते आणि अनेकदा ऐकूनही त्याचे नाव कोणाच्या फारसे लक्षात राहणारे नसते. ते खाते स्मृती इराणींच्या सुपूर्द करून पंतप्रधानांनी मनुष्यबळ विकास खाते आणि देशाची शिक्षण व्यवस्था यांना संरक्षण मिळवून दिले आहे. ज्या खात्याचा कारभार अतिशय गंभीर व विवेकी माणसांच्या हाती असावा आणि जिथे मनमिळावू वृत्तीची व सदैव चर्चेला सिद्ध असणारी माणसे असावीत, त्या खात्याच्या प्रमुखपदी केवळ अविर्भाव आणून बोलणारी व वागणारी माणसे येताच उपयोगी नाही. उशीरा का होईना ते खाते आणि देशाचे शिक्षण आता प्रकाश जावडेकरांकडे गेले असल्याने स्मृती इराणी यांनी केलेल्या चुका दुरुस्त व्हाव्यात ही अपेक्षा.