मनाचिये गुंथी - धनेशाचे गाणे...
By Admin | Updated: May 5, 2017 00:19 IST2017-05-05T00:19:32+5:302017-05-05T00:19:32+5:30
रायगड जिल्ह्यातील डोंगरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे अतिदुर्गम ठिकाण. हात लावू तिथे

मनाचिये गुंथी - धनेशाचे गाणे...
रायगड जिल्ह्यातील डोंगरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे अतिदुर्गम ठिकाण. हात लावू तिथे इतिहासाच्या कथा आणि कान लावू तेथे पराक्र माच्या गाथा हे त्याचे वैशिष्ट्य. कधीकाळी माणूस पोहोचणे अशक्य अशा या कुडपणला भेट देण्याचा योग आला.
पोलादपुरातील उपक्रमशील शिक्षक प्रमोद गायकवाड सोबत होते. नजरेचे पारणे फेडणारा निसर्ग आणि माणसाच्या उत्तुंग ध्येयासक्तीचे दर्शन घडवणारा घाटरस्ता असा थरार अनुभवत कुडपणला पोहचलो. सरपंच हनुमंत धोंडू शेलार हे शेलारमामांच्या सतराव्या पिढीचे प्रतिनिधी. ते म्हणाले, आमची रस्त्याची प्रतीक्षा संपायला सोळा पिढ्या जाव्या लागल्या. खरोखरच ते एक विदारक वास्तव होते. रस्ता आला; पण माणसे गेली, असे ते पुढे म्हणाले. त्यांच्या त्या विधानाला, गड आला, पण सिंह गेला या उक्तीचे वजन होते. गावात माणसे राहिली नाहीत, हायस्कूल बंद झाले, मराठी शाळा जेमतेम सुरू आहे, ही त्यांची व्यथा.
उदय भानूला मारून तानाजीच्या हौतात्म्याला विजयाची रूपेरी किनार मिळवून देणारे शेलारमामा, काळाचे नवे रूपक म्हणून समोर आले. महाराष्ट्रातील जनता, लेखक, कवी, पत्रकार, कलावंत, विचारवंत, साहसी तरुणांना ते कुडपणला या म्हणून साद घालत आहेत असे वाटले. एक उत्तम पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण योग्य नियोजनाअभावी मरणपंथाला लागले आहे, हे ते सांगत होते. तुमचा बाप येथे मरून पडलेला असताना भ्याडासारखे पळून काय जाता, लढा नाहीतर मरा, हे शब्द नवी प्रेरणा देताना दिसले. कुडपणच्या वारशाचा सर्वांगाने शोध घ्या, तो जतन करण्यासाठी प्राणांची बाजी लावा, किमान जो काही वारसा आहे तो गमवण्याचा करंटेपणा करू नका ही ती प्रेरणा. जुन्या आठवणी निघाल्या. स्वस्ताई, मुबलक दूध, दही, तूप. ताकात भाकरी चुरून खाण्याचा आनंद आणि असेच खूप काही.
माळ्यावरच्या तलवारी, बिचवे बाहेर आले. मावळ्यांच्या शौर्याचा इतिहास जागा झाला... परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित नाईक कृष्णा सोनावणे यांच्या घराचे दर्शन घेतले, जगबुडी नदीच्या उगमस्थानावर नजर टाकली, साहसी गिर्यारोहकांच्या प्रतीक्षेतील भीमाची काठी हा बेलाग सुळका पाहिला. संध्याकाळी कुडपण सोडले. मावळत्या सूर्याचे किरण अंगावर घेत घाट उतरू लागलो. दोन तीन डोंगरांवर वणवे लागले होते. गवत जळाल्याचा आणि कुड्याच्या फुलांचा संमिश्र गंध वातावरणात भरून राहिला होता. गोळेगणीजवळ एका ऐनाच्या झाडावर चिरक्या आवाजात धनेशाचे (हॉर्न बिल) गाणे सुरू होते. गाडी थांबवून मिनीटभराचे ते दुर्लभ गाणे ऐकले. गाणे कसले, निसर्गरक्षणाची याचना करणारे करूण प्रार्थनागीत होते ते !
- प्रल्हाद जाधव -