मनाचिये गुंथी - भावविश्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:18 IST2017-05-08T00:18:07+5:302017-05-08T00:18:07+5:30
तुमचं अनुभवविश्व जेवढं जसं असतं तसंच तेवढंच तुम्ही लिहिता. तुमचा आवाका एवढाच आहे. म्हणजे हा विचार एकीकडे तुमचं भावविश्व अधोरेखित

मनाचिये गुंथी - भावविश्व
तुमचं अनुभवविश्व जेवढं जसं असतं तसंच तेवढंच तुम्ही लिहिता. तुमचा आवाका एवढाच आहे. म्हणजे हा विचार एकीकडे तुमचं भावविश्व अधोरेखित करतो आणि दुसरीकडे त्याच्या मर्यादाही! म्हणजे तुम्ही तुमचं एक विश्व बनवता. ते दुसऱ्याच्या दृष्टीने तोकडंही असतं पण ते तुमचं असतं. स्वत:चं असतं. विश्वाचा आकार केवढा! ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. माझं डोकं जेवढं मोठं तेवढा माझा आकार मोठा.
पण हा आकार ठरवला कुणी? तर आपणच! एखादा माणूस फोटो काढतो, चित्र काढतो, रंग भरतो, कविता लिहितो, खेळतो. मला आठवतंय इंग्लंडचा एक क्रिकेटर. त्याच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ग्राउंडवर झालं होतं. असं सगळं काही करणारा हा माणूस सर्वश्रेष्ठ की एकाच जागी बसून एखाद्या विषयात संशोधन करणारा विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ श्रेष्ठ? हा ज्याचा त्याचा विचार आहे. आयुष्यभर सात्त्विक, शुचिर्भूत आचरण असणाऱ्याचा मित्र अट्टल दारुडा, भामटा असू शकतो का? आयुष्यभर एकाच साच्यात काम करीत राहणारी माणसं असत. ते सकाळी मंगल प्रभातने उठतात. चहापाणी आटोपतात. पेपर वाचतात. घरात कुणी असेल तर तावातावाने चर्चा करतात. मग, स्नान करून बायकोने दिलेला डबा घेऊन घरून निघतात. आॅफिसला जातात. काम करतात. दुपारी जेवणाच्या सुटीत डबा खातात. पुन्हा काम करतात. चहा पितात. नंतर संध्याकाळी घामेजल्या चेहऱ्याने घरी येतात. चहा घेऊन बाहेर जातात. पत्नीबरोबर भाजी आणतात. खाऊ आणतात. टीव्हीची सीरीयलची वेळ चुकवत नाहीत. सीरीयलमधली सगळी पात्रं आज काय करणार याची चर्चा करतात. त्यात एखादा विरुद्ध वागला तर ते त्याला आवडत नाही. तो चुकचुकतो. निषेध व्यक्त करतो. त्याला ते आवडत नाही. तो नाइलाजाने जेवतो. गप्पा मारत झोपी जातो. रात्री एकदोनदा उठतो. पुन्हा झोपतो. त्याला वयानुरूप आजार होतात. या सर्व रुटीनमध्ये डॉक्टरकडे जाणे, खरेदी करणे आलेच. पण पुस्तक वाचणे, एखाद्या कलात्मक चित्रपटावर, चित्रावर गप्पा मारणे त्याला पटत नाही. मग तो वेगळे विषय काढत नाही. अशी माणसं त्यांच्या दृष्टीने छान जगत असतात. त्यांना काळजी असते स्वत:च्या तब्येतीची, घरातल्यांच्या तब्येतीची, मुलांची, मुलींची, म्हणजे तो आदर्श पिता होऊ शकतो. भाऊ, मामा, काका होतो. त्याला हे सारे नियमितपणे करावे वाटते. मग त्याचा वेगळा रंग दिसत नाही. त्याला तो काटेकोर जीवन म्हणतो. घरातील व्यक्तीचा मोठा अपघात, मृत्यू, घटस्फोट किंवा मोठ्ठा आघात तो एकदम बदलू शकतो असा. म्हणजे एखादे आयुष्य खूप छान जात असते. त्याला एखाद्या घटनेने धक्का बसतो. तो नीट राहू शकत नाही. हा बदल म्हणजे यू-टर्न असतो. सुखात पोहता पोहता दु:खात बुडत जाणे हे भागधेय, नशीबच म्हणावे लागेल. त्याला नेहमी वाटते, असे प्रसंग कुणाच्याही वाट्यास येऊ नये. आपले भावविश्व बदलू नये. पण एखादा आपलंच भावविश्व तोडत तुटत पुढे जात राहतो. प्रचंड गोते खातो, संकटं झेलतो तोच खरा पठ्ठा, माणूस, झगडणारा, झगडत हसत राहणारा.
- किशोर पाठक -