गेल्यावर्षी भारत आणि मालदीव यांच्या संबंधांत मोठीच कटुता निर्माण झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर आणि या नितांत रमणीय अशा पर्यटनस्थळाला भारतीयांनी आवर्जून भेट द्यावी, असं आवाहन केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. त्यात मालदीवच्या मंत्र्यांनीही यात उडी घेत थेट मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्यानंतर भारतात सर्व स्तरात चीड व्यक्त केली गेली.
मालदीवचे मंत्री मरियम शिऊना, अब्दुल्ला माजिद आणि माल्शा शरीफ यांनी यासंदर्भात अनावश्यक टिप्पण्या करत स्वच्छता आणि सेवेच्या बाबतीत भारत आमच्याशी कधीच स्पर्धा करू शकत नाही, अशी विधानंही केली होती. त्यानंतर भारतीय जनतेनं मालदीवच्या विरोधात स्वयंस्फूर्तीनं हॅशटॅग BoycottMaldives ही मोहीम चालवली होती. अनेकांनी पर्यटनासाठी मालदीवला जाण्यावर बहिष्कार टाकला. मालदीवची तिकिटं रद्द केली आणि लक्षद्वीपला जाणं पसंत केलं. त्याचा मालदीवला फारच मोठा फटका बसला. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्यावर भारतावर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना डच्चू मिळाला, शिवाय मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइजू यांनाही मध्यस्थी करावी लागली होती.
या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे. यासंदर्भात कतरिनानं म्हटलं आहे, मालदीव हे आरामदायी राहणीमान आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक आहे. ही एक अशी जागा आहे, जिथे साधेपणा आणि शांतता या दोन्ही गोष्टींचा संगम झालेला आहे. या ‘सनी साईड ऑफ लाईफ’चा मी चेहरा असल्याचा मला अभिमान आहे. मालदीवच्या ज्या नागरिकांनी आणि मालदीवच्या मंत्र्यांनी भारताची खिल्ली उडवली होती, त्याच मालदीवची कतरिना कैफ ब्रॅण्ड ॲम्बॅसडर कशी काय झाली याबाबत अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, मालदीव आता ‘डॅमेज कंट्रोल’च्या मूडमध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांनी मालदीव भेटीचं आमंत्रण दिलं आहे. मोदी पुढील महिन्यात मालदीवला जाणार आहेत.
ज्या मालदीवला भारतीयांनी आजवर मोठ्या प्रमाणावर सर्वतोपरी मदत केली, तोच मालदीव उलटल्यावर, ‘इंडिया आऊट’सारख्या वादग्रस्त घोषणा त्यांनी दिल्यानंतर बॉलिवूडनंही मालदीवचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता. यात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर यांनी पुढाकार घेतला होता. अक्षय कुमारनं तर आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ज्या देशातले सर्वाधिक पर्यटक मालदीवमध्ये येतात, ज्यांच्या भरवशावर इथली अर्थव्यवस्था चालते त्याच देशाची बदनामी करणं, नावं ठेवणं ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे!
२०२३मध्ये जगातून भारतातले सर्वाधिक २,१०,१९८ नागरिक मालदीवला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, दोन्ही देशांत वाद झाल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०२४ या काळात केवळ ४३,९९१ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले. २०२३ला याच काळात भारतीय पर्यटकांची इथली संख्या मात्र ७३,७८५ होती! भारतीय पर्यटक तब्बल ४० टक्क्यांनी घटले!