Mahashivi will be leading in Khandesh! | खान्देशात महाशिवआघाडी ठरणार प्रबळ !
खान्देशात महाशिवआघाडी ठरणार प्रबळ !

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑात सत्ता स्थापन करण्यात शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या ‘महाशिवआघाडी’ च्या वाटाघाटी सुरु आहेत. भाजपला अजून सत्तास्थापनेची आशा असली तरी कागदावर गणित काही जमताना दिसत नाही. त्यामुळे उशिरा का होईना, परंतु नव्या आघाडीची सत्ता येईल, असे आता तरी म्हणता येईल.
सत्तास्थापनेसंबंधी पदांचे वाटप हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. मुख्यमंत्रिपदावरुन ‘महायुती’ तुटली. त्यामुळे नव्या आघाडीत हा विषय चर्चेला येत असताना सर्व बाजू विचारात घ्याव्या लागतील. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने यापूर्वी १९९९ ते २०१४ असे तब्बल १५ वर्षे आघाडीचे सरकार चालविले होते. काँग्रेस मोठा भाऊ तर राष्टÑवादी काँग्रेस धाकट्या भावाच्या भूमिकेत होती. यंदा मात्र राष्टÑवादीचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भूमिकेत बदल संभवतो. यंदा त्यात शिवसेना सहभागी झाल्याने सेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती द्यावी लागतील. प्रादेशिक समतोल साधत असताना प्रत्येक पक्षाची तेथील ताकद लक्षात घेऊन मंत्रिपदे, पालकमंत्रीपद, महामंडळांची अध्यक्षपदे द्यावी लागणार आहेत. शिवसेनेने अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्टÑवादी कॉंग्रेसचा पराभव केलेला आहे. त्यामुळे जिल्हापातळीवर सत्तासंतुलन राखण्याचे मोठे आव्हान या आघाडीपुढे राहील.
खान्देशचा विचार केला तर ही आघाडी प्रबळ आणि सक्षम आहे. एकूण २० जागांपैकी ११ आमदार हे आघाडीचे वा त्यांना समर्थन देणारे आहेत. भाजपचे आठ तर एमआयएमचा एक आमदार आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपला गेल्या २५ वर्षांत प्रथमच एवढ्या निचांकी संख्येवर यावे लागले आहे. भाजपचा दबदबा त्यामुळे कमी होणार असून शिवसेना प्रथमच तुल्यबळ ठरली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्टÑवादीचे प्रत्येकी एक आहे तर अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेना किंवा राष्टÑवादी अशा कोणालाही पाठिंबा दिला तरी तो आघाडीला पाठिंबा राहणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात २०१४ प्रमाणेच पक्षीय बलाबल आणि जागा कायम आहेत. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात भाजपचे गेल्या निवडणुकीएवढेच संख्याबळ म्हणजे दोन कायम आहे. मात्र काँग्रेसला मोठा फटका बसला. गेल्यावेळी तीन आमदार असताना यंदा केवळ कुणाल पाटील हे निवडून आले. साक्रीच्या मंजुळा गावीत या अपक्ष आमदारांनी सेनेला पाठिंबा दिल्याने महाशिवआघाडीचे बळ दोन झाले. एमआयएमच्या डॉ.फारुक शाह यांचे कोणत्याही पक्षाला समर्थन राहणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
कळीचा मुद्दा हा मंत्रिपदाविषयी येणार आहे. गेल्यावेळी भाजपकडून एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तर शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदे मिळाली होती. ही चार मंत्रिपदे कायम राहतात का, याविषयी उत्सुकता राहील. मंत्रिपद कुणाला मिळते, याचीही उत्कंठा आहे. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील हे प्रबळ दावेदार असून त्यांना कॅबीनेट मंत्रिपदाची बढती मिळू शकते. चिमणराव पाटील हे दुसरे दावेदार आहेत, मात्र त्यांच्याकडे महायुती सरकारच्या काळात शेवटच्या काही महिन्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते, ते कायम ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. साक्रीच्या मंजुळा गावीत आणि मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील या दोन अपक्षांना सेनेच्या कोट्यातून काही वाटा मिळतो का, ही अपेक्षा असणार आहे.
काँग्रेसचे चार आमदार असून चौघांची मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदारी आहे. त्यात पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या आणि आठव्यांदा आमदार झालेल्या के.सी.पाडवी यांचे नाव निश्चित मानले जाते. एवढा अनुभवी आमदार पहिल्यांदा मंत्री होण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी, कुणाल पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले असून ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत.
अमळनेरचे अनिल भाईदास पाटील हे राष्टÑवादीचे खान्देशातील एकमेव आमदार आहेत. गेल्यावेळी डॉ.सतीश पाटील हे एकमेव आमदार होते. गुलाबराव देवकर, संजय सावकारे या पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना २००९-१४ या काळात मंत्रिपद देण्यात आले होते, हा निकष राहिला तर पाटील यांना संधी मिळू शकते. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांना पक्षाकडून बळ देण्याचा प्रयत्न होईल.
नंदुरबार व धुळ्याला गेल्या पंचवार्षिक काळात स्थानिक पालकमंत्री नव्हता. यंदा तो मिळू शकेल, अशी आशा करुया. जळगावला गुलाबरावांकडे हे पद येऊ शकेल, असा अंदाज बांधता येतो. एकंदरीत पुढील काळ हा पक्षीय घडामोडींचा आणि त्याच्या उमटणाºया पडसादांचा राहणार आहे, हे मात्र निश्चित.

Web Title: Mahashivi will be leading in Khandesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.