Maharashtra Politics: नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:38 AM2023-02-02T06:38:47+5:302023-02-02T06:39:49+5:30

BJP : १८ केंद्रीय मंत्र्यांपैकी किमान १० जणांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यात राणे, आठवले यांची नावे आहेत.

Maharashtra Politics: Will Narayan Rane contest the Lok Sabha elections? | Maharashtra Politics: नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती

Maharashtra Politics: नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती

googlenewsNext

- हरीश गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
मे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सध्या राज्यसभेत असलेल्या १८ केंद्रीय मंत्र्यांपैकी किमान १०  जणांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. राज्यसभेत भाजपाचे ९२ खासदार आहेत. त्यांच्यापैकी किमान २५ ते ३० जणांनी निवडणूक रिंगणात उतरावे, असेही त्यांना वाटते. भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातून महाराष्ट्रातली जी नावे पुढे येत आहेत त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री रामदास आठवले ही दोन नावे आहेत. तिसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार असलेले आणि सभागृहातील पक्षाचे नेते पीयूष गोयल यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत; आणि तेही महाराष्ट्रातले आहेत; पण  लोकसभा निवडणुकीच्या वेळी पडद्यामागील कामे करण्याची त्यांची इच्छा आहे. २०२४  मध्ये निवडणुकीत दिल्लीमध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो. मात्र, इतर राज्यातले आठ मंत्री असे आहेत  की ज्यांना २०२४ च्या निवडणुकीत उतरवले जाईल. त्यामध्ये आसामचे सर्वानंद सोनोवाल, गुजरातमधले पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीया, ओडिशातले धर्मेंद्र प्रधान, मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे, केरळमधील व्ही मुरलीधरन आणि इतर काही जणांचा त्यात समावेश आहे. बिहारमधल्या सुशील मोदी यांनाही निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. छत्तीसगडच्या सरोज पांडे, उत्तर प्रदेशमधील नीरज शेखर ही अन्य काही नावे होत. 

फडणवीस यांचा चढता आलेख
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्षातील आलेख वाढतोच आहे. राजकीय कारणांमुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले असले, तरीही त्या दिवसापासून त्यांचे राजकीय वजन मात्र वाढले आहे. भाजपा श्रेष्ठींनी सर्वशक्तिमान अशा सेंट्रल इलेक्शन कमिटीमध्ये फडणवीस यांना नियुक्ती दिली. यातून महत्त्वाचे संदेश गेले. कारण भाजपाशासित राज्यांतल्या कुठल्याच मंत्र्याला ही मानाची जागा मिळालेली नाही. हे थोडे होते म्हणून की काय, देवेंद्र फडणवीस यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये आर्थिक प्रस्ताव मांडण्यास सांगण्यात आले. पक्षातील ज्येष्ठ मंडळींमध्ये त्यामुळे चलबिचल झाली. गमतीची गोष्ट अशी की राजकीय प्रस्ताव केंद्रीय कायदामंत्री किरण रिजीजू यांनी मांडला. राजकीय आणि आर्थिक प्रस्ताव मांडण्यासाठी केवळ ज्येष्ठता हाच निकष असणार नाही, हेच पक्षश्रेष्ठींना यातून दाखवायचे होते हे उघड आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय ठराव मांडण्यासाठी निवड करण्यात आली. व्यक्तिशः या बैठकीला उपस्थित असलेले ते एकमेव मुख्यमंत्री होते. बाकीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले.

कोश्यारींच्या जागी अमरिंदर येण्याची शक्यता कमी
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. महाराष्ट्रातून भगतसिंह कोश्यारी यांनी पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला; परंतु मोदी यांच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार कॅप्टनसाहेबांना महाराष्ट्रात पाठवले जाण्याची शक्यता कमी आहे; कारण त्यांची सेवा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपाला गरजेची आहे. गुरुदासपूर आणि होशियारपूर या दोन्ही जागा भाजपा जिंकू शकतो; पण तेही अकाली दलाशी युती असेल तर! अकाली दल एनडीएतून बाहेर पडलेले आहे. दुसरे म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परिणीत कौर अजूनही पतियाळामधून काँग्रेसच्या खासदार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यास त्या भाजपाकडे येऊ शकतात. पंजाबमध्ये भाजप किमान सहा ते आठ लोकसभेच्या जागा जिंकू इच्छित आहे आणि सर्व पक्षाच्या नेत्यांची त्या दृष्टीने मनधरणी चालू आहे. अलीकडेच  पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल भाजपामध्ये दाखल झाले आहेत.

बिहारमध्ये सगळाच गोंधळ
बिहारमधील तीन घटना जवळून पाहाव्यात अशा आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांना झेड श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. दुसरे म्हणजे संयुक्त जनता दलाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. तिसरी गोष्ट अशी की भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल मौन बाळगले असून संयुक्त जनता दलाशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, असे त्यांनी जाहीर केले आहे. एका जाहीर कार्यक्रमात नितीश कुमार म्हणाले, आपण एकवेळ मरण पत्करू, पण भाजपात जाणार नाही. संयुक्त जनता दलाने भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी श्रीनगरला जायचे नाही, असे ठरवले होते, यातच नितीश कुमार यांचा गोंधळ दिसून येतो. संयुक्त जनता दलाचे नेते एक पाऊल पुढे गेले. यात्रा हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असेल तर आम्ही त्यात सहभागी का व्हावे, असे त्यांनी जाहीर केले. भाजपला सोडून काँग्रेस आणि राजदशी घरोबा करून सत्तेवर आलेले नितीश कुमार असे का वागत आहेत हे राजकीय पंडितांना कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या की कदाचित काही खासदार फोडले जातील. चिराग पासवान यांच्यावर केंद्राने दाखवलेला अनुग्रह तसेच पारस पासवान यांना राज्यपाल म्हणून पाठवणे हा लोक जनता पक्षाच्या दोन भागात एकोपा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यात भाजपाचा मोठा डाव असू शकतो. भगवा पक्ष २०२४ च्या निवडणुकीत  पासवान यांचा नितीश कुमार यांच्याविरुद्ध वापर करणार आणि त्यासाठी लोजपाच्या दोन गटात एकी घडवण्याचा प्रयत्न करणार. कुशवाह यांची पुढची खेळी काय, याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे.

Web Title: Maharashtra Politics: Will Narayan Rane contest the Lok Sabha elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.