शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आज महाविकास आघाडी महायुतीपेक्षा तगडी का आहे?

By यदू जोशी | Updated: June 28, 2024 06:56 IST

लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. त्यामुळे ३१x६=१८६ जागा पक्क्या असे होत नाही; तरीही आघाडीचे पारडे सध्या जड दिसते आहे.

यदू जोशी, सहयोगी संपादक

भाजपचे नेते, कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात लोकसभेतील पराभवानंतर भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट स्पष्ट दिसते. कालपर्यंत आपण ताकदवान होतो आणि आज अचानक शक्तिपात झाला, अशी त्यांची अवस्था भासते. पराभवानंतर रावसाहेब दानवे मराठवाडाभर फिरले, लहानमोठ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटले, काय काय चुकले ते विचारले. आपले ऐकले जात नाही, अशी पक्षात जी खंत आहे त्यावर फुंकर घातली. इतर नेतेही अशाच पद्धतीने लोकांना कान देतील तर चार महिन्यांत काहीतरी सावरले जाईल; नाहीतर काही खरे नाही, अशी भावना अनेकांची आहे. 

मराठवाड्यातील एक माजी मंत्री भेटले, त्यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचे ते एकटेच आमदार आहेत; पण, लोकसभेचा उमेदवार देताना त्यांना एकदाही विचारले गेले नाही. असे बऱ्याच ठिकाणी घडले. दिल्लीला सगळे कळते हा आविर्भाव असल्याने स्थानिक आवाजाला किंमत राहिली नाही, त्याचा मोठा फटका बसला. एखादे कोडे हळूहळू उलगडते, तशी लोकसभेच्या पराभवाची एकेक कारणे समोर येत आहेत. भाजपमध्ये ब्लेमगेम सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्याजिल्ह्यांतून एकमेकांविरुद्ध अनेक तक्रारी पोहोचत आहेत. त्यांचे ऑडिट आणि मग त्या आधारावर कोणावर मोठी कारवाई होईल असे मात्र वाटत नाही. लोकसभेतील पराभवात कोणाकोणाचा वाटा आहे हे शोधून कारवाई केली गेली तर विधानसभेला अडचण येईल. विधानसभेपर्यंत सगळ्यांनाच दादा, भाऊ म्हणणे ही भाजपची मजबुरी बनली आहे. आतापर्यंत लोक भाजपमध्ये येत होते, आता भाजपमधून दुसरीकडे जातील, असे गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी लिहिले होते. त्याच्या चवथ्या दिवशी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील भाजप सोडून शरद पवारांसोबत गेल्या. 

भाजपमधील काही जणांबद्दल बरेच वाईटसाईट बोलले जात आहे. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते उद्या त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतीलही; पण एक लक्षात ठेवा, पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते, समाज यांचे समाधान तुमच्या युक्तिवादाने होत नसते. तुमचे वर्तन कसे आहे यावर लोक काय ते ठरवतात. “अरे! याच्याकडे एवढा माल आला कुठून?” असे कोणाबद्दल उगाच बोलले जात नाही. आग लागल्याशिवाय धूर निघत नसतो. काँग्रेसमध्ये अनेकांनी माया जमविली अन् श्रीमंत झाले, पक्षापेक्षा नेते मोठे झाले त्यांनी काँग्रेसचे जहाज बुडवले. महाराष्ट्रात काही जणांमुळे भाजपचे काँग्रेसीकरण होत आहे. दुसरीकडे पूर्वीच्या मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडत आहे, नेत्यांनी एकमेकांच्या काड्या करणे जवळपास बंद केले आहे. तिकडचे अवगुण भिंत ओलांडून इकडे येत आहेत; भाजपसाठी हा डबल धोका आहे. 

आपल्या जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात सोडाच आपल्या गावात, वॉर्डातही भाजप, महायुतीला लीड देऊ शकले नाहीत, त्यांना विधान परिषद हवी आहे. मराठवाड्यातील एका जिल्ह्यात भाजपच्या एका आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद घेण्यासाठी ‘व्यवहार’ झाला. ज्याला या व्यवहाराच्या आधारे पद मिळाले त्याने ४० वर्षे पक्षात घालविलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत केले; अर्थात हा ऐकीव किस्सा आहे.  भाजपच्या संघटनेची जबाबदारी असलेल्यांबाबत सर्वाधिक गंभीर तक्रारी मराठवाड्यातून आहेत. 

जागावाटपाची डोकेदुखीलोकांना शंका आहे की अजित पवार गट महायुतीसोबत राहील की नाही? ते भाजपसोबतच राहतील. आता त्यांना जाण्यासाठीचे ठिकाण तरी कोणते आहे? काकांना पूर्ण शरण जातील असे वाटत नाही. त्यांची अडचण अशी आहे की लोकसभेसारख्या कमी जागांवर त्यांनी समाधान मानले तर त्यांचेच काही लोक त्यांना सोडून मोठ्या साहेबांसोबत जातील. लोकसभेतील पराभवाने त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे, शिंदेंनी सात जागा आणल्याने त्यांची वाढली आहे. दोघांनाही जागा देताना भाजपची दमछाक होईल. शिंदेंनी लोकसभेवेळी ताणून धरले होतेच, आता विधानसभेला त्यांना अधिक जोर येईल. मध्यंतरी फडणवीस म्हणाले होते की, “मी एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये ट्राफिक पोलिस आहे; एकाला रस्ता देतो मग दुसऱ्याला देतो, ट्राफिक जाम होऊ देत नाही.” जागावाटपाचे ट्राफिक कंट्रोल करताना भाजपला रेड सिग्नल न मिळो म्हणजे झाले. 

आघाडीचे मुख्यमंत्री कोण? महायुतीचे हे शेवटचे विधीमंडळ अधिवेशन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकले आहे. लोकसभेला १५५ जागांवर पुढे असलेली महाविकास आघाडी आता विधानसभेला आपणच असे गृहीत धरत आहे. त्यामुळेच प्रत्येकाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसेल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. उद्धवसेनेला ते मान्य नाही. संजय राऊत स्पष्टच बोलले आहेत की ठाकरेच मुख्यमंत्री असतील. तिकडे नाना पटोलेंनाही मुख्यमंत्रिपद खुणावत आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असे सतेज पाटलांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्रिपद, जागावाटप यावरून आघाडीतही कुरबुरी होतील; पण, तुटेपर्यंत ताणले जाणार नाही. महाविकास आघाडीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले हे फेविकॉल का जोड आहेत, वरून राहुल गांधी आहेतच. महायुतीत शिंदे-फडणवीस-अजित पवार एकत्र दिसत असले तरी या तिघांपैकी कोणाला किती मोठे करायचे याची चावी दिल्लीच्या हातात आहे. हेही खरे की लोकसभेचे बरेच संदर्भ विधानसभेला बदललेले असतील. त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या म्हणजे ३१ गुणिले ६ म्हणजे  १८६ जागा पक्क्या आहेत असे होत नाही; पण, तरीही तीन पक्षांची एकजूट, लोकांचा मूड हे बघता ‘ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी’ असेच चित्र आहे. पराभवानंतर महायुतीला सत्ता राखायची आहे आणि विजयानंतर आघाडीला ती मिळवायची आहे हा फरक महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभा