पाटलांच्या वाड्यावरचा जय महाराष्ट्र !

By सचिन जवळकोटे | Published: August 18, 2019 08:31 AM2019-08-18T08:31:06+5:302019-08-18T08:32:23+5:30

लगाव बत्ती..

Maharashtra on the palace of Patil! | पाटलांच्या वाड्यावरचा जय महाराष्ट्र !

पाटलांच्या वाड्यावरचा जय महाराष्ट्र !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘भगव्याचा गवगवा’ तसा आपल्या जिल्ह्याला नवा नाही. गेल्या तीस वर्षांपासून तो चालत आलेला. ज्यावेळी गळ्यातलं भगवं उपरणं विकत घ्यायचीही ऐपत नव्हती, तेव्हा ‘कट्टर’ सैनिकांनी इकडून-तिकडून निधी गोळा करून गावोगावी उभारल्या शाखा. मात्र हीच ‘गोळा करण्याची’ सवय पुढं निवडणुकीत बनली घातक, धोकादायक. पाटलांच्या वाड्यावर जाऊन ‘जय महाराष्ट्र’ म्हणणा-यांना लागली ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ची चटक. आता सत्तेत बसलेल्या ‘तानाजीरावां’ना लागलंय हे खटकू. अशा कैक ‘मालकां’ना विकत घेण्याची सुरू झालीय भाषा; मात्र ‘भगवं उपरणं’ आजपावेतो वाड्यांवर गेलंच कसं, याचाही शोध घेणं गरजेचं. मग त्यासाठीच हवी...लगाव बत्ती...


का लागली ‘डिलिंग’ची चटक ?
सु
मारे तीन दशकांपूर्वी जिल्ह्यात विरोधक नावाचा घटक नव्हताच अस्तित्वात. त्यावेळी ‘हात’वालेच एकमेकांचे दुश्मन. एकानं उभं राहायचं, दुसºयानं त्याला पाडायचं. निवडणुका संपल्यानंतर मात्र हातात हात घालून सहकारात एकत्र नांदायचं. सत्तेच्या कुरणात मोकाटपणे चरायचं. तेरी भी चूप...मेरी भी चूप..अशावेळी पंढरपुरात उगम झाला ‘बाळासाहेबां’च्या लाडक्या ‘भुजंगरावां’चा. सत्तेच्या बिळातील घुशींवर फुत्कार सोडणाºया ‘साईनाथां’नी त्या काळात धगधगत्या रक्ताच्या तरुणाईची फळीच केली उभी. गावोगावी झळकू लागले बोर्ड. वेशीवर चमकू लागले ‘वाघ’. वरून ‘मातोश्री’चा आदेश यायचा अवकाश, इथं भडकायची आंदोलनं. व्हायचा खळ्ळऽऽ खट्याक.


राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासनावरही निर्माण झाला होता ‘कट्टर सैनिकां’चा वचक. लोकशाही अधिक बळकट करायची असेल विरोधकही हवेत बलवान, हे प्रथमच आलं सोलापूरकरांच्या ध्यानी. याच काळात प्रथमच आली ‘युती’ची सत्ता. ‘आहे मनोहर तरी’ म्हणत तेव्हा ‘जोशीपंतां’चं सुरू झालं राज्य. वर्षानुवर्षे हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरणा-यांना ‘सत्ता कशी पचवायची असते ?’ हेच नव्हतं माहीत. कुणी अधिका-यांकडं पांढ-या पाकिटासाठी तगादा लावू लागलं, तर कुणी बदल्यांच्या भानगडीत खो-यानं कमवू लागलं. ‘कृष्णा खोºया’तही कैकजणांनी हात धुऊन घेतले. सत्ता नसताना ज्यांनी संघटनेसाठी स्वत:ची डोकी फोडून घेतली, लाठ्या झेलल्या ते बाजूलाच राहिले... अन् सत्ताधारी ‘सॉफिस्टीकेटेड’ पक्षात केवळ ‘छापणा-यां’चीच सुरू झाली चलती.


...अन् इथंच सारं गणित बिघडलं. पाच वर्षांनी सत्ता गेली. नोटांची चटक लागलेले रिकामे हात पुन्हा सळसळू लागले. आपसूकच अनेकांची पावले गुपचूपपणे ‘हातात घड्याळ’ बांधणा-या नेत्यांच्या घराकडे वळली. निवडणुकीच्या काळात त्यांचा उंबरठा ओलांडणा-यांच्या ‘पेट्या’ भरू लागल्या; मात्र ‘बाणा’च्या नावानं ‘मतपेट्या’ राहू लागल्या रिकाम्या. कितीही संघर्ष केला तरी आपली सत्ता काही येतच नाही, हे वारंवार आलेल्या अनुभवातून कैकजण लागले फक्त ‘जुळणी’च्या मागे. नुकताच ‘सावंतां’नी केलेला आरोप अनगरच्या वाड्याबाबत असला तरी इतरही अशी कैक नावं नक्की सांगू शकतील ‘मोहोळ’चे ‘दीपकराव’. ‘सुशीलकुमारां’च्या निवडणुकीत मुरारजीपेठेतील ‘महेशअण्णां’च्या बंगल्यावर कसं कसं ‘डिलिंग’ व्हायचं, यावर खात्रीनं बोलू शकतील ‘अवंतीनगर’चे ‘पुरुषोत्तम’... अगदी नंतरच्या काळात ‘पंढरपूर’च्या ‘भुजंगरावां’नीही कशी बदलली आपली ‘स्ट्रॅटेजी’, यावरही निवांतपणे गप्पा मारतील ‘क-हाड नाक्या’वरील ‘दत्तादादा’.


आता पुन्हा ‘युती’ची सत्ता पाच वर्षांपासून टिकलेली. जुनी मंडळी मागे पडलेली. कैक नवे चेहरे चमकलेले...खरंतर, महिला सेनेची ‘अस्मिता’ जपण्यासाठी ‘कर्णिकनगर’च्या ज्या ‘तार्इं’नी आयुष्यभर रान केलं, त्याही मधल्या काळात दूर राहिलेल्या. ज्यांना ‘भगवा डॉन’ म्हणून मोठ्या कौतुकानं सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे उपाधी दिली, ते ‘पुरुषोत्तम’ही बराच काळ पदाविना शांत राहिलेले. खरंतर पक्षाच्या जडणघडणीत मोठा वाटा असणारी ही मंडळी पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर टीकेचा विषय बनलेली. ‘ज्यांना स्वत:च्या वॉर्डात निवडून येता येत नाही, ते जिल्हा काय सांभाळणार ?’ अशीही बोचरी भाषा त्यांच्याच सहका-यांकडून केली गेलेली.


याच गोष्टीचा फायदा नंतर अनेकांनी घेतला. खिरापत वाटल्याप्रमाणं तीन-चार तालुके वाटून जिल्हाभर प्रमुख नेमले गेले. सर्वसामान्यांचे विषय उचलून धरण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांची तळी उचलणाच्या स्पर्धेतच काहीजण रमले गेले. ‘लक्ष्मीकांत’नी अलीकडं किती सामाजिक आंदोलनं केली, हे त्यांनाच माहीत. ‘गणेशदादां’चे सहकारी केवळ ‘फ्लेक्स’मध्येच कसे रमले, हे त्यांनाच ठावूक. पूर्वी संघटना वाढविण्यासाठी याच ‘गणेशदादां’च्या ‘पिताश्रीं’नी अर्थात ‘प्रकाशदादां’नी किती काठ्या खाल्ल्या हे समजायला हवं होतं नव्या पिढीला. 


‘मुरारजीपेठेत’लं ‘महेशअण्णा’ तर आता या पक्षाची सूत्रंच हातात घेऊन मी म्हणेन ती ‘पूर्व’ दिशा म्हणत चाललेत. ‘मराठी बाणा निलची उंडालेऽऽ (म्हणजे टिकविला पाहिजे!) असं विडी घरकूल परिसरात सांगत सुटलेत. असो. या सा-यांच्या बदलत्या युगात खरेखुरे ‘सैनिक’ मात्र अचंबित होऊन कोनाड्यात अंग चोरून बसलेत. मात्र त्यांना अशा कैक ‘हायब्रीड उपरण्यां’ची आता सवय करून घ्यावीच लागेल. पुढच्या आठवड्यात बार्शीचे ‘दिलीपराव’ अन् करमाळ्याच्या ‘रश्मीदीदी’ जेव्हा जोरात ‘जय महाराष्ट्रऽऽ’ म्हणतील, तेव्हा पाटलांच्या वाड्यावरचा ‘जय महाराष्ट्र’ विसरून जावाच लागेल...लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Maharashtra on the palace of Patil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.