हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...

By यदू जोशी | Updated: July 18, 2025 07:11 IST2025-07-18T07:08:59+5:302025-07-18T07:11:52+5:30

आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती वाटणाऱ्यांनी सावध असावे!

Maharashtra Honey-Money Trap Scandal: Ministers, officials uneasy! ‘Your name is not in it, is it?’ they fear... | हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...

हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...

- यदु जोशी, सहयोगी संपादक,
लोकमत

‘हनिट्रॅप’ हा काही आजचा विषय नाही. तो बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. दक्षिण मुंबईतील अनेक तारांकित, श्रीमंत हॉटेलांच्या आणि दुबईतील काही उंची हॉटेलांच्या भिंतीही त्याच्या साक्षी आहेत. कोण, कुठे, कसे अडकले हे काही रेकॉर्डवर नाही आणि नसतेही. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात असे किस्से अनेकदा चर्चिले गेले; पण त्याचे काही पुरावे नव्हते. विधिमंडळाचे अधिवेशन असले की आताशा ‘गुलाबी गोष्टींची आठवण’ जुने आमदार, पत्रकार काढतात. आता नव्याने हा विषय यासाठी येण्याचे कारण म्हणजे राज्यातील एका बड्या नेत्याने या विषयीचे ‘राज’ पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उघड केले. त्याची बातमी झाली आणि मग त्यातून चर्चेला ऊत आला. काही जुनेजाणते नेते आणि अधिकारी यांना आपला काळ आणि त्या काळातील आपली प्रकरणेही आठवली असतील. 

अशी प्रकरणे ही म्हणाल तर खासगी बाब आहे; पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक महत्त्वाची व्यक्ती असता, तेव्हा त्याची चर्चा तर होणारच. पूर्वी धोतर, पातळाचा जमाना होता, आता सगळे पातळी सोडून चालले आहे.  काळाबरोबर विसरले गेले असे तर बरेच किस्से आहेत. काहींकडे दोनचार गाड्या, दोनचार घरे असतात, तसेच दोन घरोबेही असतात. 

हनिट्रॅप आहेत तसेच ते मनिट्रॅपही आहेत. काही बडे नेते असे होते की ज्यांच्या अचानक निधनाचा चोख फायदा घेऊन त्यांचा पैसा त्यांच्या जवळच्या माणसांनी पचविला. त्या पैशांच्या भरवशावर मग ती जवळची माणसे आमदार, खासदार झाली. पैसा पचवून ढेकरही न देणारे तिघेचौघे आता मोठे नेते आहेत. हिशेबी पैशांचा हिशेब लागतो, बेहिशेबी पैशांचा हिशेब कसा लागणार? आणि तो लावणार कोण?  अगदी जवळच्या असलेल्यांनाच असा पैसा कुठे, कसा ठेवला आहे ते ठाऊक असते. अशावेळी हा पैसा ज्याचा असतो तो अचानक गेला की मग त्याच्या कुटुंबाऐवजी तो सगळा पैसा भलत्याच लोकांच्या खिशात जातो. राजकारण्यांची अडचण वेगळी आहे, प्रचंड पैसा कमावला तरी त्यांना त्याचा उपभोग एका मर्यादेपर्यंतच घेता येतो. कारण सोशल वॉच असतो. पैसा कमावणे सोपे असते, पण पैसा सांभाळून ठेवणे फारच कठीण. गेल्या आठवड्यात एक मंत्री या धर्तीवर फार सूचक बोलले. ‘पैसा कमावला तर खरा, पण तो ठेवायचा कुठे आणि कसा’ हा गहन प्रश्न अनेकांना सतावत  असतो. अशावेळी मग कधी चालकांच्या, तर पीएंच्या नावावर गुंतवणूक केली जाते. बड्या नेत्यांचा पैसा ‘मार्केट’मध्ये चालविणारे काही महाभाग महाराष्ट्रात आहेत. ते सगळेकाही व्यवस्थित करून देतात. काही मुंबईत, काही पुण्यात, तर काही नागपुरातही बसतात. अधिकाऱ्यांना नेत्यांइतकी अडचण नसते. एकतर त्यांच्यावर तेवढा सोशल वॉच नसतो. त्यामुळे त्यांचे बरेचसे बिनदिक्कत चाललेले असते.

आता हनिट्रॅपचा विषय नव्याने समोर आलेला असताना ही धोक्याची घंटा समजून काही नेत्यांनी स्वत:च्या वर्तनात सुधारणा करणे आवश्यक आहे. दोन-तीन नेत्यांबद्दल इतर नेते, जाणकार पत्रकार असे म्हणतात की ‘अरे! त्यांचे राजकीय भवितव्य खूप उज्ज्वल आहे बरं, पण फक्त आपली एखादी सीडी येणार नाही, आपण कुठे अडकणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, नाहीतर एवढं सगळं मिळवलं त्याच्यावर पाणी फिरेल’..

असे नेते दोन्हीकडे आहेत. आता अशी आत्मीय काळजी कोणत्या नेत्यांबद्दल लोकांना वाटते हे नामोल्लेख न करताही काही जणांच्या लक्षात आलेच असेल. आपले नाव लिहिले नाही, पण आपले नाव येऊ शकते असे ज्यांना ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी ‘अशा गोष्टींपासून दूर राहा’ एवढाच प्रेमाचा सल्ला आहे. एखाद्या घरात चोरी झाली म्हणून घरचे तीनचार लोक पोलिस ठाण्यात तक्रार करायला जातात आणि मग तपासात असे आढळते की ज्यांनी तक्रार केली होती त्यातलाच एकजण चोर निघाला. हनिट्रॅपवर फार बोलणाऱ्या नेत्यांबाबत असे काही होऊ नये म्हणजे झाले. आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकले असल्याच्या बातम्या आल्यानंतर ‘अरे बाबा! त्यात आपले तर नाव नाही ना’, अशी शंका ज्यांना ज्यांना आली, त्यांनी पुढच्या काळात काळजी घ्यायला हवी. कारण प्रतिष्ठा कमवायला बरीच वर्षे लागतात आणि ती गमवायला एक क्षणही पुरेसा असतो.

...काही सुखावणारेही 
या अधिवेशनाने काय दिले वगैरे यांची चर्चा होईलच. एक सुखावणारी बाब म्हणजे पहिल्या टर्मचे आमदार असूनही गांभीर्याने सभागृहात बसणारे, चर्चेत चांगला सहभाग घेणारे काही आमदार. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली आणि तुकडेबंदी कायदा तूर्त स्थगित करण्याचा व पुढे तो रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच मैत्रेय घोटाळ्यावरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक फसवणुकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय जाहीर केले. विक्रांत पाचपुते, स्नेहा दुबे, वरुण सरदेसाई, प्रवीण दटके, अतुल भोसले हे विधानसभेतील पहिल्यावेळचे आमदारही अतिशय मुद्देसूद बोलतात. पुढील अधिवेशनात ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे. 

जाता जाता :
विधानभवनच्या पायऱ्यांवर एकमेकांबाबत जी शेरेबाजी चालते ते बघता तिथे हाणामाऱ्याही होतील तो दिवस दूर नाही, असे याच ठिकाणी लिहिले होते. परवा विधानभवनच्या गेटवरच जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर यांनी एकमेकांची ऐशीतैसी केली. गुरुवारी लगेचंच त्याची प्रचिती आली. आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 
yadu.joshi@lokmat.com

Web Title: Maharashtra Honey-Money Trap Scandal: Ministers, officials uneasy! ‘Your name is not in it, is it?’ they fear...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.