महाराष्ट्र कन्यांची गैरहजेरी !

By Admin | Updated: March 20, 2015 23:17 IST2015-03-20T23:17:45+5:302015-03-20T23:17:45+5:30

व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणाऱ्या २५ खासदारांची पंतप्रधान मोदी यांच्याकरवी झाडाझडती अजिबात चुकीची नाही

Maharashtra girls absence! | महाराष्ट्र कन्यांची गैरहजेरी !

महाराष्ट्र कन्यांची गैरहजेरी !

व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणाऱ्या २५ खासदारांची पंतप्रधान मोदी यांच्याकरवी झाडाझडती अजिबात चुकीची नाही

महाराष्ट्र कन्यांची लोकसभेतील गैरहजेरी दिल्लीच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. पूनम महाजन व प्रीतम मुंडे या दोन्ही कन्या त्यांच्या वडिलांच्या पुण्याईने राजकारणात ओळखीच्या असल्याने त्यांची भूसंपादन विधेयकावरील मतविभाजनप्रसंगी झालेली ‘दांडीयात्रा’ लक्षवेधी ठरली. लोकसभेत पूनम महाजन, रक्षा खडसे, हीना गावित व प्रीतम मुंडे या संख्येने चौघी असल्या तरी ‘चारचौघी’ नाहीत! त्या सर्वार्थाने वेगळ्या आहेत. पूनम यांच्यामागे प्रमोद महाजन यांची प्रभा आहे. एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारस म्हणून रक्षा लोकसभेत आल्या. राष्ट्रवादीतून आख्खं गावित घराणं भाजपात येण्यासाठी हीना कारणीभूत ठरल्या, तर गोपीनाथ मुंडे यांच्या राष्ट्रीय प्रतिमेचे प्रतिबिंब प्रीतम यांच्यात शोधण्यात आले. राजकारण त्यांच्यासाठी नवखे नाहीच. महाजन व मुंडे या नावाचा धाक, दबदबा भाजपात असताना, २८२ खासदारांच्या भाजपा सांसदीय पक्षाच्या सप्ताह बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोघींना उभे केले आणि गैरहजेरीबाबत जाब विचारला. दोन राज्यमंत्र्यांसह २५ खासदारांना असेच विचारण्यात आले. पण पूनम व प्रीतम, त्यांच्या भारदस्त राजकीय परंपरेमुळे केंद्रस्थानी आल्या. आरोग्यविषयक कारणे सांगून दोघींनी ‘मोदीसरांच्या या क्लास’मधून अलगद आपली सुटका करून घेतली तरी त्यांना साऱ्यांसमोर उभे करून अपमानीत करण्याचा भाजपा नेतृत्वाचा उद्देश नव्हता. ‘तुम्ही कितीही मोठे असा, पक्षशिस्तीपुढे सारेच समान’ हा संकेत साऱ्यांना द्यायचा होता. मोदींनी ज्यांना उभे केले, त्या २५ पैकी १३ जण पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. ज्यांची ही दुसरी टर्म आहे असे सात जण आहेत. त्यांनाही उभे केल्याने ‘आपले लक्ष सर्वांवरच आहे, तुम्ही मन मानेल तसे वागू नका’, असे सुनावण्यासही मोदींनी कमी केले नाही. खरं तर, पूमन किंवा प्रीतम या गुणी खासदार आहेत. अकराच्या
ठोक्याला त्या सभागृहात हजर असतात. सभागृहातील उपस्थितीही ९० टक्क्यांच्या पलीकडे आहे. सभागृहातील गांभीर्याचे प्रसंग त्या पाहतात. स्वत:चे अनेक विषय मांडतात. दुसऱ्यांचे विषय जाणून घेतात. इतर खासदारांचे मुद्दे पटले तर त्यांना अनुमोदनही देतात. ‘लुप्त होणाऱ्या भारतीय भाषांचे संवर्धन केले पाहिजे’, यावरील पूनम महाजन यांनी मागच्या सत्रात केलेले भाषण स्मरणीय ठरले. कैक वर्षांनी तरुण खासदाराचे असे मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पूनम यांचे कौतुक केले होते. संपूर्ण सभागृहाच्या टाळ्या त्यांनी मिळवल्या होत्या. या सत्रात आरोग्यविषयक चर्चेत प्रीतम यांनी आरोग्याच्या सोयी व लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत मुद्देसूद मांडणी केली. पूनम व प्रीतम यांची सांसदीय कामकाजातील वाटचाल लक्षवेधक आहे. यामुळे मोदींसमोरील त्यांची ‘हजेरी’ चर्चेचा विषय ठरली व राजकारणातील दिग्गजांच्या कन्या महत्त्वाच्या वेळी गैरहजर राहतात म्हणून टीकेचेही लक्ष्य झाली. सरकारसाठी जीव की प्राण झालेले भूसंपादन विधेयक बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर झाले असले तरी बहुमत असल्याने खासदारांनी बिनधास्त वागणे मोदींना अपेक्षित नाही. मतविभाजनाच्या वेळी पक्षादेश (व्हीप) असूनही खासदारांनी पूर्वसूचना न देता दांडी मारणे मोदींना आवडलेले नाही. त्यांनी सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांना सांगून या खासदारांची खरडपट्टी काढण्याच्या सूचना दिल्या. पण नायडूंनी हे पातक नको म्हणून ‘गैरहजेरांची’ यादी मोदींपुढे धरली आणि तुम्हीच काय तो निर्णय करा, असे सांगितले. तेव्हा नायडूंनी नाव पुकारायचे आणि मोदींनी ‘चला उभे राहा’ असे म्हणायचे ठरले. बैठकीत झालेही तसेच ! मुळात सर्वच पक्षात व्हीप निघतात, त्याचे अनेकदा उल्लंघनही होते. पण बहुमत असूनही भाजपाने दखल घेतली. त्यामुळे मोदींची ही भूमिका चुकीची नाही. व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणे हा मामला पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक होतो. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पाला हीना गावित यांनी दांडी मारली होती, तर मोदींनी बोलाविलेल्या खासदारांच्या पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे उशिरा पोचल्या होत्या. तेव्हाही पक्षाच्या दप्तरात याची नोंद झाली होती. यावेळी मुद्दाच अस्मितेचा होता, त्यामुळे म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, या तात्पर्यापर्यंत ही कथा पोहोचली.
- रघुनाथ पांडे

Web Title: Maharashtra girls absence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.