Maharashtra Election 2019: The percentage dropped ... | Maharashtra Election 2019: टक्का घसरला...

Maharashtra Election 2019: टक्का घसरला...

राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. ते अर्थातच अपेक्षेहून कमी आहे. जनतेला मतदानाविषयी फारसा उत्साह नसल्याचे हे चिन्ह आहे. ‘आपण निवडून येणारच’ या आविर्भावातला सत्तारूढ पक्ष आणि आपण काहीही केले तरी विजयी होऊ शकणार नाही वा ईव्हीएम आपल्याला विजय मिळू देणार नाही, याचा विरोधकांना वाटणारा विश्वास यामुळेही हे मतदान कमी झाल्याची शक्यता आहे. तेवढीच महत्त्वाची आणखी एक बाब ही की, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी विभागात अगदी मुंबईतसुद्धा ते कमी झाले. नेते काही म्हणत असले तरी जनतेची मतदानाविषयीची अनास्था सांगणारी ही बाब आहे.

निवडणुकीच्या निकालांचे आगाऊ अंदाज बांधणारे व सांगणारे कमी मतदानाचा सत्तारूढांना लाभ होतो, असे सांगतात. मात्र ते दरवेळी खरे असेलच असे नाही. या निवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झंझावाती दौरे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही अनेक ठिकाणी सभा घेऊन पक्षाचा दणक्यात प्रचार केला. काश्मीरमधील रद्द केलेले ३७0 कलम आणि पाकिस्तानवर आणलेला जागतिक दबाव व केंद्र-राज्य सरकारने केलेली जनताभिमुख कामे यावर त्यांनी भर दिला. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार हेही त्यांनी ठासून सांगितले. वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र या जोडीने खूपच चांगले काम केले आहे, हे पंतप्रधानांनी स्वत: व अमित शहा यांनी अनेक प्रचारसभेत अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेक प्रचारसभा घेतल्या.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघाबाहेर जाता आले नाही, हेही खरेच. काही अपवाद वगळता शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचाच प्रचार केला. कणकवली मतदारसंघात नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपने दिलेली उमेदवारी शिवसेनेला आवडली नाही. त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना जोरदार आव्हान दिले. येथील निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसचे राहुल गांधी आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे वगळता दुसरे कोणतेही राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात आले नाहीत. ज्यांच्या हाती तिकिटांचे वाटप होते, ते पुढारीही ‘निवडून येणारा’ उमेदवार देण्याऐवजी जातीपातीच्या व नातेसंबंधाच्या राजकारणात जास्तीचे अडकलेले दिसले. या निवडणुकीत जनतेला खरा जाणवला तो चेहरा शरद पवारांचा होता. वयाच्या ८० व्या वर्षी या अनुभवी नेत्याने जो उत्साह दाखवला व राज्याच्या अनेक भागांत जी दमदार भाषणे दिली, ती सर्वाधिक लोकांच्या लक्षात राहिली. त्यांच्या पक्षातले अनेक वजनदार नेते पक्ष सोडून सत्तेच्या आश्रयाला गेले, पण पवारांनी एकट्याच्या जिद्दीवर पक्षाची धुरा वाहून नेली. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल, अशी चर्चा जनमानसात होती.

मात्र त्यांच्या जागा कमी होतील, त्यातही शिवसेना तिच्या बऱ्याच जागा गमावील, असेही त्यांना वाटत होते. जाणकारांच्या मते, विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा वाढतील, तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आपल्या जागा वाढवता येतील. सत्तेचा दावा मात्र त्यांच्या आघाडीला करता येणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात किंवा त्यांची युथ काँग्रेसही या निवडणुकीत कुठे दिसली नाही. विरोधकांकडे प्रचाराची साधनेही अल्प प्रमाणात दिसली. पण तरीही शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राज्यात परिवर्तन होणारच, हे जोरकसपणे सांगत राहिले. पण त्यांचा पूर्वेतिहास लोकांना ठाऊक असल्याने जनतेचा त्यांना खुला पाठिंबा दिसला नाही.

एक मात्र खरे की, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यास सरकार काहीसे अपुरे पडते आहे, हेही लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर जनता कोणाला कौल देते, हे पाहण्यासाठी आपल्याला २४ तारखेची वाट पाहावी लागेल. ‘आपण निवडून येणारच’ या आविर्भावातला सत्तारूढ पक्ष आणि आपण काहीही केले तरी विजयी होऊ शकणार नाही वा ईव्हीएम आपल्याला विजय मिळू देणार नाही, याचा विरोधकांना वाटणारा विश्वास हे मुद्दे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले.

Web Title: Maharashtra Election 2019: The percentage dropped ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.