टेनिस सुंदरीच्या हाती मशीनगन, रॉकेट लाँचर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 08:05 IST2024-12-19T08:05:30+5:302024-12-19T08:05:53+5:30
बाळाप्रती माझं कर्तव्य अधिक महत्त्वाचं आहे. कोर्टवर मी पुन्हा उतरेनच आणि ती उतरलीही.

टेनिस सुंदरीच्या हाती मशीनगन, रॉकेट लाँचर!
युक्रेनची टेनिस स्टार एलिना स्विटोलिना. युक्रेनमध्ये ती खूपच प्रसिद्ध आहे. जगभरातही तिचे खूप चाहते आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू म्हणूनही तिनं नावलौकिक मिळवला आहे. मध्यंतरी बाळंतपणाच्या कारणानं तिनं टेनिसमधून विश्रांती घेतली होती. तिला दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर तिनं पुन्हा खेळाकडं लक्ष केंद्रित केलं. या काळात तिचं जागतिक रैंकिंग घसरून ती २३ व्या क्रमांकावर गेली असली तरी तिचं म्हणणं आहे की, मी अंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू असले तरी प्रथम आई आहे. बाळाप्रती माझं कर्तव्य अधिक महत्त्वाचं आहे. कोर्टवर मी पुन्हा उतरेनच आणि ती उतरलीही.
मात्र, सध्या एलिना आणखी एका वेगळ्याच कारणानं युक्रेन आणि संपूर्ण जगामध्ये चर्चेत आहे. टेनिसमध्ये तिला थोडा ब्रेक, 'ऑफ सिझन' मिळताच ती पुन्हा युक्रेनला आपल्या मायदेशी परतली. या काळात तिनं काय करावं? युक्रेनच्या या तीसवर्षीय टेनिस सुंदरीनं टेनिसची रॅकेट बाजूला ठेवून चक्क मशीनगन आणि रॉकेट लाँचर हाती घेतलं. नुसतं हातातच घेतलं नाही, तर त्याचं रीतसर प्रशिक्षणही तिनं घेतलं. तिचं म्हणणं आहे की, गरज पडली तर युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात मी प्रत्यक्ष लढाईवर जायलाही तयार आहे. माझ्या देशासाठी काहीही करायला माझी तयारी आहे. शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतानाचे तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सगळ्यांनीच या जिद्दी टेनिस सुंदरीचं वारेमाप कौतुक केलं आहे.
तिचं आपल्या देशावर खरोखरच मनापासून प्रेम आहे. त्यामुळं आपल्या उत्पन्नाचा बराचसा हिस्सा ती सैन्याच्या मदतीसाठी देते. त्यातून त्यांना अत्याधुनिक शस्त्रं खरेदी करता यावीत, असा तिचा प्रयत्न असतो. युद्धग्रस्तांच्या मदतीसाठीही तिनं मोठ्या प्रमाणात निधी पुरवला आहे. त्यासाठी अनेक चॅरिटी कार्यक्रमही तिनं आयोजित केले आहेत.
रशियानं आपल्या देशावर विनाकारण आक्रमण केलं आहे आणि निरपराध नागरिकांचा रशिया जीव घेत आहे, दोन्ही देशांतील लक्षावधी नागरिक आणि सैनिकांना रशियानं मरणाच्या दारात आणून सोडलं आहे, त्यामुळं रशियाला धडा शिकवायलाच हवा, असं तिचं ठाम मत आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण तिनं घेतलं, ते केवळ यासाठीच. ती म्हणते, गरज पडल्यास हातातली टेनिसची रॅकेट खाली टाकून मशीनगन आणि रॉकेट लाँचर हाती घेण्याची, प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन लढण्याची माझी केव्हाही तयारी आहे. देशासाठी मी एवढंही करू शकत नसेन, तर युक्रेनची कन्या म्हणवून घेण्याचा अधिकार मला नाही। रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर एलिना कायम आपल्या देशाच्या वतीनं अंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवत आली आहे. रशियाचे तिनं जाहीर वाभाडे काढले आहेत.
एलिनानं युद्धग्रस्त खारकिव्ह भागाचाही नुकताच दौरा केला. तिच्या हृदयात, मनात खारकिव्हविषयी एक अतिशय खास जागा आहे. एलिना म्हणते, ही तीच जागा आहे, जिथं वयाच्या बाराव्या वर्षी मी माझ्या टेनिसचा श्रीगणेशा केला होता, पहिल्यांदा हातात रॅकेट घेतली होती. माझ्या करिअरची सुरुवात इथूनच झाली आहे. इथे आलं की, मला माझ्या घरी आल्याचा अनुभव येतो; पण आज काय स्थिती आहे, माझ्या या 'घराची'? माझं हे गाव, माझं शहर बेचिराख झालं आहे. सगळीकडं रक्तपात आणि युद्धाच्या खुणा... लहानपणी मी पाहिलेली एकही खूण आता इथे अस्तित्वात नाही. ना रस्ते, ना इमारती, ना दुकानं, ना ती माणसं....
तुम्ही जर मला विचारलंत की, लढण्याची ही प्रेरणा, ऊर्मी तुझ्यात कुठून येते? एवढं बळ तुझ्यात कुठून येतं?... तर त्याचं उत्तर आहे, माझा देश, माझ्या देशातील माझी माणसं, देशासाठी लढणारे, जे देशाचे खरे नायक आहेत, ते आमचे सैनिक आणि माझं खारकिव्ह.. त्यांचं हे असं उद्ध्वस्त होणं, पणाला लागणं माझ्या हृदयाला अनंत वेदना देतं.. फ्रान्सचा टेनिसपटू गेल मोनफिल्स याच्याशी एलिनाचा विवाह झाला आहे. त्याचंही म्हणणं आहे, एलिनासारखी जिद्दी, मेहनती, धाडसी आणि हिकमती स्त्री मी पाहिलेली नाही...
देश संकटात असताना मी कशी खेळू ?
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनच्या वांग जिन्यू हिला हरवून एलिना क्वॉर्टरफायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी तिला अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी एलिना म्हणाली होती, माझ्या देशातील युद्धग्रस्त नागरिक मृत्यूशी झुंज देत असताना इथे मॅचवर लक्ष केंद्रित करणं खूपच अवघड होतं आणि आहे. विशेष अनुमती घेऊन सामन्यादरम्यान तिनं आपल्या ड्रेसवर काळी रिबनही बांधली होती. यावेळीही एलिना चांगलीच चर्चेत आली होती.