शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 03:15 IST

भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत

ठळक मुद्देभंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत.

महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरच्या भंडाऱ्याच्या जिल्हा सरकारी इस्पितळातील तान्हुल्यांचा अतिदक्षता कक्ष शनिवारी पहाटे आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतला. काही बाळे होरपळली, काहींचे श्वास गुदमरले. जीवदान देणाऱ्या इनक्युबेटर्सच्या यांत्रिक पेट्या सुरक्षित स्थळी हलविण्याचीही संधी मिळाली नाही. अरण्यप्रदेश असूनही तो आसमंत पक्ष्यांची किलबिल नव्हे, तर अभागी माता व नातेवाईकांच्या हंबरड्यांनी व्यापला. परत कधी न येण्यासाठी दूर उडून गेलेल्या या दहा पाखरांच्या नशिबी आले ते या राज्यातल्या, देशातल्या सगळ्याच बाळांचे प्राक्तन आहे. फक्त गावांची नावे, दुर्घटनेच्या तारखा बदलतात. आज भंडारा, काल आणखी कुठले तरी गाव असते. उद्याचे ठिकाण आज कुणी सांगू शकत नाही. त्याचे कारण, प्रचंड लोकसंख्येच्या या देशात जगात पाऊल ठेवणाऱ्यांच्या स्वागताची व्यवस्था बेफिकीर, निष्ठुर आहे. भविष्याच्या सुंदर स्वप्नांची आरास नवजात आयुष्यापुढे मांडून ठेवण्याऐवजी चिमुकल्यांच्या पदरात ही व्यवस्था असे किड्यामुंग्यांचे जगणे- मरणे टाकते.

भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत. एकतर आधी गर्भातच कळ्या खुडल्या जातात आणि जन्मल्याच तर नशिबी नरकयातना येतात. दुसरीकडे देशात दर तीन बालकांपैकी एक बालक कुपोषित असते. कसले तरी आजार त्यांचा घास घेतात. या आगीचा घटनाक्रम पाहता आराेग्य यंत्रणेने वेळीच काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसते. जिल्हा मुख्यालयाच्या सरकारी रुग्णालयातही आगरोधक यंत्रणा सज्ज नसावी. ती अद्ययावत ठेवण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचवले जावेत. दोन वर्षांपासून त्याबाबत पत्रव्यवहार करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या धडपडीकडे दुर्लक्ष व्हावे. फायर ऑडिटचा प्रस्ताव लालफितीत अडकला जावा. अत्यंत कमी वजनाच्या, अपुऱ्या दिवसांत जन्मलेल्या बाळांच्या अतिदक्षता कक्षात पूर्णवेळ डॉक्टर नसावा. सतरा बाळांची काळजी घेण्यासाठी एकच परिचारिका असावी आणि तिनेही मध्यरात्री दुर्लक्ष करावे. आणखी संतापजनक म्हणजे बड्या अधिकाऱ्यांनी घाईघाईत शवविच्छेदन उरकून ती कलेवरे गरीब मातापित्यांच्या हाती द्यावीत व लोकांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधीच त्यांना गावांकडे रवाना करावे. बरे हे फक्त भंडाऱ्यातच घडते असे नाही.

शनिवारीच ‘लोकमत’च्या बातमीदारांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात तात्काळ पाहणी केली. तेव्हा कमी-अधिक प्रमाणात सरकारी उदासीनता सगळीकडेच आढळली. यंत्रणा निबर असते, हे ठीक; पण निरागस बाळाच्या हसण्याने चेहऱ्यावर स्मितरेषा उमटतील व गतप्राण बाळांचे मलूल, निस्तेज चेहरे पाहून डोळ्याच्या कडा पाणावतील, अशी माणसेच यंत्रणेत नसावीत? वरवर आपण ‘त्या कोवळ्या कळ्यांमाजी, लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी’ असे भविष्याचे गोडवे गातो; पण तसे करताना केवळ भाबडे असतो, असे नाही. अवतीभोवतीची व्यवस्था दुबळ्या माणसांच्या जिवांबद्दल प्रचंड बेफिकीर असतानाही आपण स्वत:ची फसवणूक करीत राहतो. माता, बालके, वृद्धांची परवड होत असताना सरकारला धारेवर धरीत नाही. त्याऐवजी अच्छे दिनाचे आभासी इमले बांधण्यात, सजवण्यात धन्यता मानतो. आरोग्य, शिक्षण, सामान्यांच्या जीविताचे रक्षण यापेक्षा नटनट्यांच्या सुख-दु:खाची चिंता करतो. अशा जगण्यामरण्याच्या मुद्यांऐवजी भावनांवर स्वार होऊन मतदान करतो. दुर्घटना घडल्या की चार दिवस सरकारी यंत्रणेच्या नावाने संतापतो. कड ओसरला की पुन्हा सगळे ‘उद्या’चे मारेकरी बनलेल्या व्यवस्थेचा घटक बनण्यासाठी सज्ज होताे.   श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतानसारखे कथित गरीब शेजारीही आपल्या पुढे आहेत. कोविड महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेतील माणसांनी चांगले काम केले; पण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. भविष्याच्या दृष्टीने तिची फेरबांधणी करण्याऐवजी सरकार हळूहळू अंग काढून घेत आहे. महागडी खासगी वैद्यकीय सेवा ही सूज असल्याचे विसरून तेच सोयीस्कररीत्या बाळसे समजले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्याच्या इस्पितळातील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर भेटीला आलेल्या सगळ्या मान्यवरांनीही दुर्लक्ष खपवून घेणार नसल्याची ग्वाही दिली. अशा चौकशांचे व अहवालांचे पुढे काय होते, हे माहिती असल्याने लोकांना हा फार्स वाटणे स्वाभाविक आहे. मुळात हे दुर्लक्ष्य अक्षम्य, गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. त्याला जबाबदार असलेले दोषी उच्चपदस्थ, अधिकारी, कर्मचारी शोधले जायलाच हवेत. त्यांना अजिबात दयामाया दाखवू नये.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगDeathमृत्यूGovernmentसरकार