सक्षम भारतासाठी उचला एक छोटेसे पाऊल! - सचिन तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:13 AM2019-08-15T07:13:14+5:302019-08-15T07:13:37+5:30

मुलांच्या म्हणजेच भारताच्या भावी पिढीच्या संगोपनाकडे लक्ष दिले, त्यांच्या पोषणाची काळजी घेतली, त्यांच्या विकासाला वाव दिला; तर त्यातूनच त्यांच्या आणि देशाच्या भविष्याला आकार मिळेल. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या प्रयत्नांचे पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. स्वातंत्र्य दिनापासून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत...

A Little Step For A Capable India! - Sachin Tendulkar | सक्षम भारतासाठी उचला एक छोटेसे पाऊल! - सचिन तेंडुलकर

सक्षम भारतासाठी उचला एक छोटेसे पाऊल! - सचिन तेंडुलकर

Next

आज, आपण स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत. १५ आॅगस्ट १९४७ पासून आजपर्यंत आपण मोठी वाटचाल केली आहे. अनेक संस्थाने व प्रदेश यांची गुंफण करून या देशाची निर्मिती झाल्यावर, आपल्या देशाने आता जागतिक स्तरावर आपले बळ सिद्ध केले आहे. भारतीय व्यक्ती बहुराष्ट्रीय व्यवसायांचे नेतृत्व करत आहेत. बॉलीवूडच्या चित्रपटांनी विविध ठिकाणी चाहते निर्माण केले आहेत. आपले खेळाडू जगभर भारताचा झेंडा फडकवत आहेत; आणि इस्रो तर भारताचा झेंडा अवकाशात विविध ठिकाणी उंचावत आहे. असे असले, तरी सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण घटना अद्याप घडायची आहे. आपला देश २०२० या वर्षापर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश बनणार असून, आपल्या लोकसंख्येचे सरासरी वय २९ वर्षे असणार आहे. आपल्या देशातील तरुणांची क्षमता आणि आपले प्राचीन काळापासूनचे ज्ञान यांची उत्तम सांगड जर आपण घालू शकलो, तर भारत हा उद्याचा आघाडीचा देश म्हणून लौकिक मिळविणार आहे.
परंतु तरुणांवर आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण येऊन त्यांचे सामाजिक व कुटुंबासाठीच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. कुटुंबाची काळजी घेण्याचा व समाजाला आकार देण्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, मुलांचे संगोपन. आज आपली मुले आनंदी, बुद्धिवान व निरोगी असतील; तर उद्याचा भारत सक्षम व समृद्ध घडणार आहे. माझी पत्नी बालरोगतज्ज्ञ असल्याने आणि युनिसेफशी माझा सहयोग असल्याने बाल्यावस्थेतील विकासाचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक परिणाम यांची मला कल्पना आहे. जागतिक पातळीवर विचार केला, तर आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी व संगोपनासाठी आपण आज खर्च केलेल्या एका डॉलरचा समाजाला व अर्थव्यवस्थेला तेरा डॉलर इतका परतावा मिळतो!
बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या मेंदूची वाढ होण्यास सुरुवात होते आणि बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत त्याच्या मेंदूची ८० टक्के वाढ झालेली असते. त्यामुळेच बाळ मोठे झाल्यावर त्याचे सर्वांगीण जीवन कसे असणार आहे, हे त्याच्या बालपणात पालकांनी बाळाबरोबर किती व कसा वेळ व्यतित केला आहे, यावर अवलंबून असते. आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून ‘गर्भसंस्कार’ प्रचलित आहेत. गर्भसंस्कार म्हणजे ‘गर्भामध्ये असतानाच अर्भकाला संस्कार व शिक्षण देणे.’ आपल्यापैकी अनेकांनी महाभारतातील अभिमन्यूची गोष्ट ऐकली असेल. अभिमन्यूने आईच्या गर्भात असतानाच युद्धाचे धडे घेतले होते. म्हणूनच मुलांच्या मेंदूची उत्तम वाढ व्हायला हवी असेल, तर त्यांचे संगोपन सुरक्षित व आपुलकीच्या वातावरणात होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. पालकांनी व इतर व्यक्तींनी त्याचे संगोपन सकारात्मक भावनेने व प्रेमाने करायला हवे.
मुलांच्या संगोपनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, दोन्ही पाल्यांनी समानता पाळणे. मुलांना जितके आईचे प्रेम हवे असते, तितकीच वडिलांची मायाही हवी असते. पालकत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यांपासून वडिलांनी यात सहभाग घेतला, तर मुलांवर एकंदरीतच चांगला परिणाम होतो, असे आढळले आहे. इतकेच नाही, यामुळे आईचा ताणही कमी होतो. पालकत्वाची सगळी जबाबदारी एकट्या आईवर पडत नाही. क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करणाºया दोन्ही खेळाडंूप्रमाणे आई आणि वडिलांनी आलटून पालटून पुढाकार घ्यायला हवा. तो संगोपनाचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक पुरोगामी संस्था आता बाळंतपणाच्या रजेबाबत स्त्री-पुरुष असा भेद न करता पालकत्वाची रजा देऊ लागल्या आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे.
मुलांना सुरक्षित व संरक्षक वातावरणामध्ये वाढवणेही गरजेचे आहे. हिंसा व छळ यामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास व मनोधैर्य खचते आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक विकासावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. पालकांचे एकमेकांशी आणि मुलांशी वागणे चांगले असेल, तर मात्र पालकांना मुलांचे मन जिंकता येते आणि मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते.
जन्मल्यापासून पहिल्या २४ महिन्यांत त्याचे आरोग्य व स्वच्छता यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असणे, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी असणे आणि वेळेवर लसीकरण करणे, ही पथ्ये पाळल्यास मलेरिया, डायरिया अशा आजारांना मुले बळी पडत नाहीत. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ हा पूर्वीपासूनचा विचार संगोपनाच्या बाबतीत सार्थ ठरतो. पोषणाच्या दृष्टिकोनातून विचार करता, गर्भवती मातेचा जो आहार असतो तोच गर्भाचाही आहार असतो. त्यामुळे आपण काय सेवन करत आहोत, याचे भान गर्भवतीने कायम ठेवणे आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर स्तनपान दिल्याने त्या तान्हुल्यांना आवश्यक ती पोषणे मिळतात व बाळाची प्रतिकारक्षमता वाढते. शिवाय आई व बाळ यांचे नाते घट्ट होते. स ुरक्षित स्तनपानाला उत्तेजन दिले जाईल, असे वातावरण संस्थांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी असायला हवे.
अखेरचा मुद्दा म्हणजे, मुलांबरोबर खेळण्यासाठी आवर्जून वेळ द्यावा. मूल आपल्याकडे पाहून गोड हसू लागले, की त्याला सगळे समजते, असे आपल्याला वाटते. पण खरेतर ते जन्माला आल्यापासूनच त्याच्यापर्यंत भावना पोहोचत असतात. म्हणूनच बाळांकडे जास्तीतजास्त लक्ष द्या. त्यांच्याशी बोलत असताना नजरेला नजर द्या. त्यांच्यासाठी चांगले संगीत लावा किंवा तुम्ही गाणे म्हणा! या सगळ्याचा परिणाम ते गर्भात असल्यापासून होत असतो. अंघोळ घालत असताना, भरवत असताना किंवा त्यांच्याशी खेळत असताना त्यांच्याशी बोलल्यास त्यांची भाषाकौशल्ये व शारीरिक कौशल्ये अनेक पटींनी विकसित होतात. नवीन काही शिकल्यावर कौतुक केले, तर त्यांना प्रोत्साहन मिळते.
आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी, शांततामय व शाश्वत समाजाला उत्तेजन देण्यासाठी आणि कमालीचे दारिद्र्य व असमानता नाहीशी करण्यासाठी बाल्यावस्थेतील विकास ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. मुलांना योग्य आहार मिळाला, त्यांना खेळता खेळता नव्या गोष्टी शिकता आल्या आणि दोन्ही पालकांकडून भरपूर प्रेम मिळाले, तर भारताच्या भविष्याला सकारात्मक आकार देता येऊ शकतो. आपण २०५० पर्यंत आपल्या देशाला निश्चितपणे महासत्ता बनवू शकतो, यात शंका नाही. भावी पिढीकडून अनेक आॅलिम्पिक सुवर्णपदके, नोबेल पुरस्कार, वर्ल्डकप आणि लाख कोटी डॉलर उलाढालीच्या एंटरप्रायजेसची अपेक्षा आहे आणि या सगळ्याची सुरुवात आईच्या गर्भामध्येच होऊ शकते, हे लक्षात ठेवायला हवे!
तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!

मुलांबरोबर खेळण्यासाठी आवर्जून वेळ द्यावा. मूल आपल्याकडे पाहून गोड हसू लागले, की त्याला सगळे समजते, असे आपल्याला वाटते. पण खरेतर ते जन्माला आल्यापासूनच त्याच्यापर्यंत भावना पोहोचत असतात. म्हणूनच बाळांकडे जास्तीतजास्त लक्ष द्या.
 

Web Title: A Little Step For A Capable India! - Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.