‘वाघा’ हल्ल्याचा धडा
By Admin | Updated: November 5, 2014 00:45 IST2014-11-05T00:45:16+5:302014-11-05T00:45:16+5:30
या स्फोटात ६० निरपराधांचा मृत्यू होऊन १०० वर लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य स्त्रिया व मुले असल्यामुळे या घातपाताची तीव्रता आणखी गंभीर झाली आहे.

‘वाघा’ हल्ल्याचा धडा
पाकिस्तानातील जिहादी व दहशती टोळ््या त्या सरकारच्या नियंत्रणात राहिल्या नसल्याचे व त्यांनी त्या सरकारविरुद्धच आपले शस्त्र उपसले असल्याचे परवा वाघा (अट्टारी) सीमेवर त्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी साऱ्यांना दाखवून दिले आहे. या स्फोटात ६० निरपराधांचा मृत्यू होऊन १०० वर लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य स्त्रिया व मुले असल्यामुळे या घातपाताची तीव्रता आणखी गंभीर झाली आहे. वाघा सीमेवर भारत आणि पाकिस्तानचे ध्वज उतरविण्याचा सोहळा दरदिवशी सायंकाळी मोठ्या थाटामाटात पार पडतो. त्यात एक नाट्यमयता असल्याने तो पाहायला अक्षरश: हजारो लोक दोन्ही बाजूंनी या सीमेजवळ गर्दी करतात. काहीसे जत्रेसारखेच स्वरूप या कार्यक्रमाला अलीकडच्या काळात आले आहे. त्याच भावनेने आलेली पाकिस्तानातील मुले व स्त्रिया या बॉम्बस्फोटाला बळी पडले असतील, तर या घटनेचा नीट अर्थ पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांनी समजून घेणे गरजेचे झाले आहे. पाकिस्तानच्या उत्तर व पश्चिम सीमेवर, तसेच वजिरीस्तानच्या अरण्यक्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने तेथील दहशती कारवाया मोडून काढण्यासाठी जर्ब-ए-अज्ब ही मोठी मोहीम हाती घेतली आहे. अफगाण सीमेवरील व वायव्य सरहद्द प्रांतातील बंडखोरी मोडून काढण्याची जबाबदारीही या मोहिमेवर आहे. अल-कायदा, तालिबान यांसह स्वत:ला इसिसचे म्हणवणारे दहशतखोरही पाकिस्तानच्या या क्षेत्रात हवा तसा दंगा घालत आहेत. आपल्या देशातील दहशती कारवाया फक्त उत्तर व पश्चिम सीमेपुरत्याच मर्यादित आहेत आणि बाकीचा देश त्यापासून मुक्त आहे, असाच पाकिस्तान सरकारचा व तेथील लष्करी अधिकाऱ्यांचा आजवरचा समज राहिला आहे. वाघा सीमेवरील परवाच्या बॉम्बस्फोटांनी हा समज निकालात काढला असून, जिहादी कारवायांचा हा कॅन्सर साऱ्या पाकिस्तानात पसरला असल्याचे त्यांच्या लक्षात प्रथमच आणून दिले आहे. जिहादी कारवायात गुंतलेल्या टोळ््यांनी या आधीही पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढविले आहेत. वजिरीस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांतात लष्कराने त्यांच्याविरुद्ध केलेल्या मोठ्या कारवायांना युद्धाचेच स्वरूप आलेले जगाला दिसले आहे. परंतु, ही लढत पाकिस्तानचे लष्कर व दहशतवादी यांच्यापुरतीच आतापर्यंत मर्यादित राहिली आहे. वाघाच्या घटनेने या दहशतवाद्यांच्या जिहादी कारवाया नागरी जीवनावर उठल्या असल्याचे आता उघड केले आहे. दहशतीच्या मार्गाने लष्कर व सरकार यांना आपले म्हणणे मान्य करायला लावण्याच्या दिशेने जिहादी टोळ््यांनी उचललेले हे पाऊल आहे. पाकिस्तानच्या लष्करातील एक मोठा वर्ग या टोळ््यांना अनुकूल असणे हेही त्यांच्या वाढत्या साहसाचे एक कारण आहे. खरेतर पाकिस्तानच्या लष्कराएवढेच पाकिस्तानचे सरकारही या प्रकाराला बऱ्याच अंशी जबाबदार आहे. सीमेवरील कारवायांच्या बंदोबस्तात पाकिस्तानी लष्करासोबत अमेरिकेचे सैनिक जोवर सहभागी होते तोवर पाकिस्तानने त्यात हात राखूनच भाग घेतला. अमेरिकी सैन्याला योग्य ती माहिती न देण्याच्या प्रयत्नात व त्यांच्या कारवायांत अडथळे उत्पन्न करण्यातही ते सक्रिय होते. अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात शस्त्रे व अर्थबळ मिळत असतानाही पाकिस्तानच्या लष्करशहांनी अबोटाबाद येथे दडून बसलेल्या ओसामा बीन लादेनचा ठावठिकाणा अमेरिकेला अखेरपर्यंत कळू दिला नव्हता. पुढे अमेरिकी यंत्रणेनेच त्याला शोधून काढून ठार मारले होते. पाकिस्तानच्या या बोटचेपेपणाचा फायदा जिहादी टोळ््यांनी घेतला नसता तरच नवल. आता अमेरिकेचा सहभाग नाही आणि दहशतवाद्यांचा भस्मासुर एकट्या पाकिस्तान सरकारवरच उलटला आहे. एका अर्थाने इराण व इराकसारख्या मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीसारखाच हा प्रकार आहे. तेथील सरकारांना आपली सारी ताकद दहशतखोरांना आवरण्यातच कामी आणावी लागत आहे. तीच पाळी आता पाकिस्तानच्या सरकारवरही आली असल्याचा हा पुरावा आहे. या प्रकाराला पाकिस्तानचे सरकार किती कणखरपणे तोंड देते हे आता बघायचे. भारतानेही या घटनेतून एक धडा घ्यायचा आहे. पाकिस्तानातील दहशती कारवायांना तेथील सरकारची फूसच नव्हे, तर सक्रिय साथ आहे, असेच भारतात आजवर मानले गेले. सरकार व जनतेतही तोच समज रुजत राहिला. ही स्थिती आता बदलली आहे. पाकिस्तानातील जिहादी आता पाकिस्तानवरच उलटले आहेत. त्यांच्यापासून जेवढा धोका भारताला होता तेवढाच तो आता पाकिस्तानलाही आहे, असा या घटनाक्रमाचा अर्थ आहे.