'एमसीए'च्या पिचवर षटकार मारण्यासाठी नेते आतूर !

By संदीप प्रधान | Updated: November 15, 2025 10:23 IST2025-11-15T10:23:15+5:302025-11-15T10:23:28+5:30

MCA Election: मुंबई क्रिकेट संघटनेची उलाढाल आज एक ते दीड हजार कोटींच्या घरात आहे. येथे आपले बस्तान बसवण्यासाठी राजकारण्यांचा कायम आटापिटा असतो.

Leaders eager to hit sixes on the 'MCA' pitch! | 'एमसीए'च्या पिचवर षटकार मारण्यासाठी नेते आतूर !

'एमसीए'च्या पिचवर षटकार मारण्यासाठी नेते आतूर !

- संदीप प्रधान
(सहयोगी संपादक, लोकमत, ठाणे)

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) च्या अध्यक्षपदी जेमतेम ३८ वर्षाच्या अजिंक्य नाईक यांची एकमताने निवड झाली. एमसीएचे ते सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. अल्पावधीत नाईक यांनी आपल्या कामाची चमक दाखवून या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असलेले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन केली. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर नाईक यांनी एक म्युझियम उभे केले. त्यामध्ये दर्शनीभागी शरद पवार यांचा पुतळा उभा केला. महाभारतात द्रोणाचार्याचा पुतळा उभा करून धनुर्विद्या शिकणाऱ्या एकलव्याला अंगठा गमवावा लागला होता. मात्र एमसीएच्या कुरुक्षेत्रावरील डावपेचांचे द्रोणाचार्य असलेल्या पवार यांचा पुतळा उभारलेल्या नाईक यांच्यावर पसंतीचा अंगठा उमटवला गेला.

पवार गटाच्या सोबत आशिष शेलार गटाची झालेली युती अल्पायुषी ठरली. मात्र त्याच वेळी पवार-फडणवीस यांनी खलबते करून नाईक यांच्या निवडीचा मार्ग प्रशस्त केला. एमसीएतील प्रमुख पाच पदांमध्ये शेलार गटाला कुठलेच पद प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, महाविकास आघाडीचे प्रयोग झाल्यानंतर परस्परांवर अत्यंत तिखट शब्दांत टीकास्त्र सोडणारे नेते, लोकप्रतिनिधी एमसीएत गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. येथे प्रसाद लाड यांच्यापासून मिलिंद नार्वेकरांपर्यंत आणि प्रताप-विहंग सरनाईक यांच्यापासून जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी बस्तान बसवले आहे. परिणामी क्रिकेटपटूंच्या या संस्थेत क्रिकेटपटू मतदान करतात आणि राजकीय नेते विजयश्रीचे अंगठे उंचावतात.

शिवसेना नेते स्व. मनोहर जोशी यांनी माधव मंत्री यांचा काही वर्षापूर्वी पराभव केला आणि क्रिकेटपटूंच्या या संस्थेत राजकीय नेत्यांचा चंचुप्रवेश झाला. एमसीएच्या मागील निवडणुकीत फडणवीस यांचे विश्वासू अमोल काळे यांनी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना धूळ चारली. त्यामुळे क्रिकेटपटू निवडणुकीपासून चार हात दूर राहिले. एकेकाळी बाळ महाडदळकर यांच्या गटाचा एमसीएवर वरचष्मा होता. पवार यांनी याच महाडदळकर यांच्या माध्यमातून एमसीएत प्रवेश मिळवला. आज महाडदळकर हे म्युझियममधील आठवणीपुरते उरले आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारा हा मुंबईचा रहिवासी हवा, असा नियम आहे. अध्यक्षपदाचे आकर्षण इतके तीव्र आहे की, शरद पवार यांनी बारामतीचा तर विलासराव देशमुख यांनी लातूरचा पत्ता बदलून मुंबईचा पत्ता दिला होता.

एकेकाळी जेमतेम ५० कोटींची उलाढाल असलेली एमसीए आज एक ते दीड हजार कोटींच्या घरात उलाढाल असलेली संस्था आहे. वांद्रे बीकेसीमधील क्लबचे सदस्यत्व सहजासहजी मिळत नाही. त्याकरिता ४५ लाख मोजावे लागतात. काही वर्षापूर्वी काही लाख रुपयात विकत घेता येणाऱ्या क्रिकेट क्लबकरता आज पाच ते सात कोटी रुपये लागतात. एमसीएच्या निवडणुकीत ३७५ क्लबचे प्रतिनिधी मतदान करतात. नाईक, ठाकुर कुटुंबाकडे सात क्रिकेट क्लब आहेत. उद्धव ठाकरे यांच्या घरात तीन क्लब आहेत. अन्य नेत्यांच्याही घरात एक-दोन क्लब आहेत. आयपीएलचे सामने, वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धा यांच्या तिकिटांकरिता क्रिकेटप्रेमींच्या उड्या पडतात. त्यामुळे एमसीएशी नाते असलेल्या अनेकांना मिळणाऱ्या प्रेसिडेंट बॉक्स किंवा व्हीआयपी स्टँडच्या तिकीटांपैकी काही तिकिटे अगदी तीन-चार लाख रुपयांना हातोहात विकली जातात.

वर्ल्ड कप फायनलच्या तिकिटाची बोली तर २५ लाखांपर्यंत गेली होती. 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनसुद्धा तिकिटाकरिता मिनतवाऱ्या करत होता. विविध देशांचे राजदूत, बड़े उद्योगपती, बॉलिवूड स्टार, आयएएस-आयपीएस अधिकारी, पॉवरब्रोकर यांना क्रिकेट सामन्यांची तिकिटे हवी असतात. काही राजकीय नेते एमसीएच्या माध्यमातून या वर्तुळात आपले स्थान बळकट करतात. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलाबाळांना किंवा राजदूतांना सामन्यांचे तिकीट दिले तर त्यातून अगोदर 'नेटवर्क' मग 'नेटवर्थ' मजबूत होते. क्रिकेट खेळणाऱ्या देशांत आता ओमानपासून अनेक देशांचा समावेश झाला असला तरी क्रिकेटचे ग्लॅमर आणि प्रचंड दर्शक भारतात आहे. त्यामुळे यशस्वीतेचे षटकार ठोकण्याकरिता एमसीएचे पिच राजकारणी कसे सोडतील?

 

Web Title : एमसीए की पिच पर छक्का मारने के लिए नेता उत्सुक!

Web Summary : राजनीतिक हस्तियां मुंबई क्रिकेट एसोसिएशन (एमसीए) पर नियंत्रण के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं, जो इसके वित्तीय प्रभाव और नेटवर्किंग के अवसरों से आकर्षित हैं। विभिन्न दलों के नेता एमसीए के भीतर प्रभाव चाहते हैं, व्यक्तिगत लाभ के लिए क्रिकेट की लोकप्रियता का लाभ उठाते हैं, राजनीति और खेल के चौराहे पर प्रकाश डालते हैं।

Web Title : Politicians Eager to Hit Sixes on MCA's Pitch!

Web Summary : Political figures vie for control of the Mumbai Cricket Association (MCA), drawn by its financial clout and networking opportunities. Leaders across party lines seek influence within the MCA, leveraging cricket's popularity for personal gain, highlighting the intersection of politics and sports.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई