नितीन गडकरी... पंतप्रधान होण्याची इच्छा नसलेला नेता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 11:16 IST2019-02-10T02:38:13+5:302019-02-11T11:16:20+5:30
एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत.

नितीन गडकरी... पंतप्रधान होण्याची इच्छा नसलेला नेता!
- दिनकर रायकर
नितीन गडकरी आता एवढे प्रकाशझोतात का आले, याची चिकित्सा केली तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. पहिली बाब अशी, की गडकरींच्या नावाची जी काही चर्चा सुरू आहे, त्याची पूर्वपीठिका राजकीय आहे. यापूर्वीही गडकरी असंख्य वेळा चर्चेत राहिले. त्याचा केंद्रबिंदू त्यांचे काम होता. राजकारण नव्हे.
एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत. एरव्ही राजकारणात काहीही घडू शकते, हे तत्त्वज्ञान सांगणारा हाच नेता ‘मी पंतप्रधान होणार नाही... त्यात मला रस नाही,’ असे छातीठोकपणे सांगतो आहे. इंग्रजी मथळ्यांच्या संदर्भात सांगायचे तर ‘आफ्टर मोदी हू,’ या प्रश्नाचे भाजपाशी निगडित उत्तर म्हणून याच माणसाचे नाव घेतले जात आहे... नितीन गडकरी..!
यात तर्क किती, वास्तव किती यावर चर्चा होत राहणार. पण ज्यांनी गडकरींना जवळून पाहिले आहे; ओळखले आहे त्यांना असे प्रश्न पडत नाहीत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसावे, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यांच्या चाहत्यांची, तशी मोदी विरोधकांचीही! पण दस्तुरखुद्द गडकरी त्याला राजी कुठे आहेत? असो. खरा मुद्दा वेगळाच आहे. नितीन गडकरी आता एवढे प्रकाशझोतात का आले, याची चिकित्सा केली तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. पहिली बाब अशी, की गडकरींच्या नावाची जी काही चर्चा सुरू आहे, त्याची पूर्वपीठिका राजकीय आहे. यापूर्वीही गडकरी असंख्य वेळा चर्चेत राहिले. त्याचा केंद्रबिंदू त्यांचे काम होता. राजकारण नव्हे.
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतून १९८0 च्या दशकात संसदीय कारकीर्द सुरू करणारे गडकरी कायमच चैतन्यमूर्ती राहिले आहेत. झपाटून काम करण्याखेरीज खाणे व बोलणे यावर या माणसाचे विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या वाणीला काही खास पैलू आहेत. ती लोकांची भाषा बोलते, व्यवहाराशी नाते सांगते आणि कसलाही आडपडदा न ठेवता थेट बोलते. त्यांची ही रसवंती कोणाला क्वचित प्रसंगी मुँहफट वाटावी अशी आहे. आताचा संदर्भही या वाणीशी आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व मंत्री मौनात असताना एकटे गडकरी कुठल्याही व्यासपीठावर खुलेआम बोलतात. यातून या नव्या चर्चेचा जन्म झाला. प्रत्यक्षात गडकरी हे असेच होते, आहेत आणि राहतील. त्यांच्या दिलखुलास बोलण्याकडे पाहण्याचा राजकीय चष्मा बदलल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. गडकरी बदललेले नाहीत, ते आहे तसेच आहेत.
राज्यातून दिल्लीत जाणे ही राजकारणाची वरची पायरी. पण तेथे जातानाही या माणसाच्या मनात किंतू होता. का? तर दिल्लीतली रेस्टॉरंट्स, जेवण आवडत नाही म्हणून! भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून देशाची राजधानी हेच कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी स्वीकारले आहे. मुख्य म्हणजे दिल्लीत असून ते गल्लीत लुडबुड करत नाहीत. दोन दगडांवर पाय ठेवणं हा त्यांचा स्वभाव नाही.
गडकरी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून त्यांनी केलेल्या अपूर्व कामगिरीमुळे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असूनही गडकरींनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे काम अंबानींना दिले नाही. त्यांच्या देकारापेक्षा दोन हजार कोटी रुपये कमी खर्चून विक्रमी वेळेत गडकरींनी हा रस्ता पूर्ण केला. बाळासाहेबांची शाबासकी तर त्यांना मिळालीच; शिवाय खिशात (सरकारच्या) पाचशे कोटी असताना रोखे काढून हजारो कोटींची कामे केल्यावर टाटा-अंबानींचीही दाद मिळविली. हा माणूस मनात असेल तेच बोलतो. खरे बोलायला कचरत नाही. राजकारणाच्या पलीकडची मैत्री सांभाळायला भीत नाही. मैत्रीसाठी पकडलेला हात चुकूनही सोडत नाही. त्यांचे सर्वपक्षीय संबंध हा आता राष्ट्रीय प्रसार माध्यमांसाठी औत्सुक्याचा विषय बनला आहे. पण मैत्री करणे आणि ती जपणे हा त्यांचा स्वभाव आहे. चांगले काम केलेल्या विरोधकाची भरभरून प्रशंसा करताना त्यांना संकोच वाटत नाही. राजकारणातील घराणेशाहीला असलेला त्यांचा विरोध जगजाहीर आहे. ती भूमिकाही आजची नाही. आता मात्र हा कलंदर नेता दिल्लीत पुरता रमला आहे. दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याचा विचारही त्यांच्या
मनाला शिवत नाही. दिल्लीतून परतणार ते थेट नागपुरात, असे ते सांगतात.
भारतभरातील भ्रमंती, काही लाख कोटींची रस्ते-पूल आणि दळणवळणाची कामे ही त्यांची राजकारणातील अक्षरश: काँक्रिट कमाई. पंधराचा पाढा म्हणावा, तसे ते बोलता बोलता लाखो-करोडोंचे आकडे सांगत जातात. ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ हे मारुती स्त्रोत्रातले वर्णन त्यांना चपखल लागू पडते. मुख्य म्हणजे ‘झेपावे उत्तरेकडे’ हा त्यातीलच एक भाग त्यांनी दिल्लीला जाऊन केलेल्या कर्तृत्वातून सिद्धही केला. त्यांचा दिलदार दृष्टिकोन रिटर्न गिफ्टसारखा विरोधी पक्ष नेत्यांकडून त्यांना अनुभवायला मिळतो हे नैसर्गिक आहे. सोनिया गांधी यांनी अलीकडेच केलेली गडकरींची प्रशंसा हा त्याचा ताजा पुरावा आहे.
तूर्तास, भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातील हा नेता आजमितीस देशाच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पण ते कर्तृत्व त्यांचे की माध्यमांचे, याचे उत्तर काळ देणार आहेच की!
(लेखक लोकमतचे सल्लागार संपादक आहेत.)