आम्हा घरी लक्ष्मीपूजन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 23:43 IST2016-10-29T23:43:44+5:302016-10-29T23:43:44+5:30

या दिवाळी अंकांची मोहिनी इतकी आहे की, यंदाच्या वर्षापासून चक्क मुंबई विद्यापीठातर्फे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. एरव्ही विद्यापीठातर्फे जर्नल्स किंवा संशोधनपर

Laxmipujan is our home ... | आम्हा घरी लक्ष्मीपूजन...

आम्हा घरी लक्ष्मीपूजन...

- रविप्रकाश कुलकर्णी

या दिवाळी अंकांची मोहिनी इतकी आहे की, यंदाच्या वर्षापासून चक्क मुंबई विद्यापीठातर्फे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. एरव्ही विद्यापीठातर्फे जर्नल्स किंवा संशोधनपर निबंध प्रकाशित होत असतात. दिवाळी अंक काढणारे हे जगातले पहिले विद्यापीठ असेल. या अंकाचे नाव 'विद्याव्रती' आहे.

आज घरोघरी ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे लक्ष्मीपूजन आहे, होणारच आहे. आता ते कसं असतं हे मी सांगायला नको आहे. पण त्याला मी एक जोड देतो ती दिवाळी अंकाची! १९०९ साली काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी दिवाळीची अंक ही प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून ही प्रथा इतकी रुजली की आजही मराठी वाचकांच्या लेखी दिवाळी अंकाशिवाय दिवाळी साजरी झाली असं होऊच शकत नाही. शिवाय फटाके, फराळ वगैरे गोष्टी चार दिवसांपुरत्याच. नंतर त्याची मजा जाते. याउलट दिवाळी अंकाचा वाचकानंद पुढच्या दिवाळीपर्यंत तरी नक्कीच पुरवता येऊ शकतो. हा अक्षय ठेवा हे आमचं साहित्य धन आम्ही जपायचं नाही तर कुणी?
‘स्क्रीन इज दी वर्ल्ड’ असं म्हणण्याचा जमाना आहे. ‘छापील शब्द माध्यमाचा प्रभाव जात चालला आहे, असं म्हणणारा एक वर्ग आहे. तर काही जण छापील शब्दाचं राज्य संपलेलं आहे असं म्हणू लागले आहेत. पण यंदाही दिवाळी अंकाची संख्या पाहता या मायाजालाची भीती असलीच तर आपण काही करत नाही ना असं वाटायला लागतं. तीनशे-चारशे दिवाळी अंक आजही जर प्रकाशित होतात याचाच अर्थ इतक्या लोकांना काही तरी सांगायचं आहे, प्रकट व्हायचं आहे, आता ई-दिवाळी अंकही प्रकाशित झालेले आहेत. याचा अर्थ काय? कदाचित माध्यम बदलेल पण फॉर्म, आकृतिबंधीय आकर्षण टिकतं आहे का? दिवाळी अंकाची मोहिनी अजूनही आहे. पुढचं कोणी सांगायचं?
दिवाळी अंकाचा अक्षरयोग ज्याला लाभला त्याला मिळणाऱ्या सुखाची तुलना कशाचीही करता येणार नाही. उलट ही अक्षय ऊर्जा कायम बळ देणारी आहे, असा पूर्वानुभव आहे. या दिवाळी अंकांनी काल आनंद दिला होता. तेवढाच आनंद आजही मिळतो आहे. हा इतिहास पाहता उद्याही मिळेल असं म्हटलं तर काय बिघडेल की काय? नक्कीच नाही. हा युक्तिवाद नाही तर आज्ञा आहे. त्याचं कारणही सांगतो.
दिवाळी अंकाचं प्रकाशन हा प्रकार आपल्याकडे फारसा रूढ नाही. पुण्यात असे प्रयोग इव्हेंट होतात. पण मुंबईचं काय ते आता सगळ्यांनाच माहीत आहे. लोकं धावत असतात. हे सांगायचं कारण एवढंच - प्रतिभा दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ ठाण्यात गडकरी रंगायतनला झाला. दुपारी चार वाजता लोकप्रिय नाटक जसं हाऊसफुल्ल व्हावं तसं वातावरण होतं! दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला लोकांनी गर्दी का केली! अजून येतो वास फुलांना त्या चालीवर म्हणायचं तर अजूनही दिवाळी अंकाचं आकर्षण आहे. या प्रतिभावाल्यांनी एक नाही दोन नाही तर चक्क पाच विशेषांक काढले आहेत. एरव्ही एक दिवाळी अंक काढता काढता फे फे उडते हे स्वानुभवाने मी सांगू शकतो. मग पाच अंक कसे निघू शकतात? योजना आणि योजकता हे त्याचं उत्तर आहे. आता ते गणित त्यांनी कसं सोडवलं आहे हे जाणत्यांनी शोधावं...
फेरफटका
हंस, मौज, ऋतुरंग, प्रतिभा, दीपावली, दीपलक्ष्मी, अधिष्ठान असे अंक आता मी बरेचदा पाहतो आहे. न पाहिलेले आणि त्याच्या पलीकडेच असे किती तरी दिवाळी अंक जास्त आहेत. पण हे कसं बागेतून फुलपाखरांच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत जाण्यासारखं आहे. असाच एक क्षण तुम्हाला सांगेपर्यंत अनुभवला तो सांगतो. अक्षरगंध अंकात चित्रकर्त्यांवर एक विभाग आहे. त्यामध्ये दीनानाथ दलालांच्या पत्नी सुमती दलाल ज्या उत्कृष्ट चित्रकार होत्या त्यांच्याबद्दल त्यांच्याच मुलीनं प्रतिमा वैद्य यांनी लिहिलं आहे. त्यातल्या काही गोष्टी प्रथमच उजेडात येत आहेत. गेल्या वर्षी दीनानाथ दलालांनी जन्मशताब्दी साजरी झाली. पण त्याअगोदरच ६ महिने आधी सुमती दलालांची होती! (जन्म १७ जाने. १९१६. मृत्यू २३ आॅगस्ट १९८८) सुमतीबाई या दीनानाथ दलालांपेक्षा ६ महिने मोठ्या होत्या हे प्रथमच उजेडात येत आहे.
अशा सुमतीबार्इंचं चित्र काढणं दलालांचा संसार करताना सुटलं. पण त्या चित्रकलेच्याच जगात होत्या. त्याचं वर्णन प्रतिमा वैद्य यांनी केलं आहे. सुमतीबार्इंप्रमाणेच असं बरंच सांगण्यासारखं, वाचण्यासारखं येते काही दिवस मिळणार आहे. तो आनंदोत्सव आणि लक्ष्मीपूजनही... दिवाळी अंक त्यासाठीच तर वाचायचे!

Web Title: Laxmipujan is our home ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.