कायदा झाला, पण त्रुटी आहेतच
By Admin | Updated: January 3, 2015 22:35 IST2015-01-03T22:35:40+5:302015-01-03T22:35:40+5:30
जादूटोणाविराधी कायदा अमलात येऊन सुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी मांत्रिकांच्या सांगण्यावरून नरबळीचे अघोरी प्रकार व घटना घडून आल्याचा अनुभव येत आहे.

कायदा झाला, पण त्रुटी आहेतच
जादूटोणाविराधी कायदा अमलात येऊन सुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी मांत्रिकांच्या सांगण्यावरून नरबळीचे अघोरी प्रकार व घटना घडून आल्याचा अनुभव येत आहे. नाशिक येथे घडलेली घटना ही अमानुष व मानवतेला कलंकित करणारी तर आहेच; परंतु जादूटोणाविरोधी कायद्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होत नसल्याची निदर्शक सुद्धा आहे. असे जरी असेल तरी मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत लहानमोठे मिळून १०४ गुन्हे या नवीन कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून पोलिसांकडे दाखल आहेत, ही देखील तेवढीच जमेची बाजू आहे.
शिक जिल्ह्यातील घोटी परिसरात घरात शांतता होण्यासाठी तसेच मूलबाळ होण्यासाठी, मांत्रिकबाईच्या सल्ल्यावरून मुलाने आई व मावशीचा बळी दिल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी ग्रामपंचायतीच्या डुबेवारी शिवरात हे गंभीर प्रकरण घडले. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे मानवतेला काळिमा फासणारा हा गुन्हा उजेडात आला. याप्रकरणी मांत्रिक बच्चाबाई नारायण खडके, बुगाबाई महादू वीर यांच्यासह एकंदर १० संशयितांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७, २०१ आणि ३४, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नरबळी तसेच अमानुष छळ व अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जादूटोणाविरोधी कायद्यात एकंदर १२ तदतुदी असून, या कायद्याला एक अनुसूची जोडलेली आहे. या अनुसूचीत एकंदर १३ प्रमुख अनिष्ट, अघोरी अशा समाजविघातक , नुकसानकारक, जिवावर बेतणाऱ्या, काही प्रकरणी व्यक्तीचा जीव घेणाऱ्या, तिचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या, हालहाल करणाऱ्या व जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या बाबींचा समावेश आहे. अशाप्रकारच्या नुकसानकारक व व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होईल किंवा तिचा जीव जाईल अशाच अनिष्ट, अघोरी, दृष्ट रूढी आणि परंपरांना किंवा प्रथांचे अवलंबन करणाऱ्यांना शिक्षा ठोठवणारा हा कायदा आहे.
या कायद्यांतर्गत गुन्हा घडल्यावर अर्थात नरबळीनंतर कारवाही केली जाते. वस्तुत: भारतीय दंडविधान कायद्याअंतर्गत मनुष्यहत्या हा गंभीर प्रकारचा गुन्हा समजला जातो व कलम ३०२ अन्वये असा गुन्हा केल्या जाणाऱ्या गुन्हेगारास जन्मठेप व फाशीची शिक्षा दिली जाते. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, की नरबळीच्या संदर्भात या कायद्याची परिलाभकर्ता की काय, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर असे की, भारतीय दंडविधान संहितेप्रमाणे व्यक्तीची प्रत्यक्ष हत्या करून नरबळी देणारा किंवा अशा हत्येच्या कामी प्रत्यक्ष सहभाग घेणारा किंवा त्यासाठी मदत करणारा, कटकारस्थानात भाग घेणारा यालाच शिक्षा दिली जाते. बऱ्याच प्रकरणी मांत्रिक मोकाट सुटतो. मात्र नव्याने अमलात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३(१) प्रमाणे मांत्रिक म्हणून दुसऱ्या कोणा व्यक्तीस नरबळी द्यावयास लावणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. दुसऱ्या व्यक्तीमार्फत अघोरी किंवा अनिष्ट प्रथांचे आचरण करून घेणे किंवा नरबळी देणे हा सुद्धा गुन्हा ठरविण्यात आला आहे. अशा गुन्ह्यास, असा गुन्हा करणाऱ्या मांत्रिकास कमीत कमी ६ महिने ते जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते व १५ हजार रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. असे जरी असले तरी या कायद्यात काही त्रुटी आहेत. या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्यानंतर आणि गुन्हा घडल्यानंतर या कायद्याखाली आरोपीला अटक केली जाते. परंतु असा गुन्हा घडण्यापूर्वी, असा गुन्हा घडवून आणणाऱ्या मांत्रिकास व अशा गुन्ह्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून असे कृत्य न करण्याबाबत प्रतिज्ञेवर (बाँड) लिहून घेण्याची व जामीनदार घेण्याची तरतूद या कायद्यात नाही. जरी या कायद्याच्या कलम ५ मध्ये ‘दक्षता अधिकाऱ्याने’ या कायद्याखाली घडणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध करावा, असे म्हटलेले असले तरी त्यासाठी बळी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयाने तक्रार दाखल करण्याची अट घातलेली आहे. ही अट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जागरूक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन रद्द करून घेतली पाहिजे. भारतीय फ ौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१, या कायद्याखाली गुन्ह्यांना परिणामकारकरीत्या प्रतिबंध करण्यासाठी व कोणीएक निरपराध व्यक्ती मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार बळी जाण्यापासून किंवा तिचा नरबळी जात असेल तर वाचविण्यासाठी स्पष्टपणे तत्काळ लागू केली गेली पाहिजे. कारण नवीन जादूटोणा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे प्रत्येक कृत्य हे समाजविघातक कृत्य असते व तो दखलपात्र गुन्हा असतो, हे लक्षात घेऊन कलम १५१ लागू करण्यासंबंधी शासनाने स्पष्टता केली पाहिजे. त्यासाठी नियम केले पाहिजे आणि गरज असेल तर कायद्यात सुधारणा केली पाहिजे. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता, मुंबई पोलीस कायदा यांच्यातही इतरत्र सार्वजनिकरीत्या घडणाऱ्या गुन्ह्यांना किंवा समाजविघातक कृत्यामुळे घडून येणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस धोका पोचविणाऱ्या घटनांना प्रतिबंध करणाऱ्या अनेक तरतुदी आहेत. उदा : फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १०७, १०८ व १०९ यांच्याप्रमाणे मांत्रिकाकडून चांगल्या वर्तणुकीबाबत जामीन घेणे व या तरतुदीत या कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या बाबींचा समावेश करणे शासनाचे आद्य कर्तव्य ठरते.
कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागणार
नियम करतांना त्या नियमातही काही प्रमाणात प्रतिबंधात्मक नियम करता येतील. नरबळी देण्याची प्रथा ही आदी संस्कृतीशी जोडलेली आहे. नरबळी हे मानवी संस्कृतीत सबलांकडून दुर्बलांचे शोषण करण्याचा प्रकार आहे. अशा प्रथांना भारतीय संविधानाने नष्ट करण्याचे अभिवचन दिलेले आहे. संविधानाच्या धारा ४६ नुसार समाजातील दुर्बल घटकांचे शोषण आणि सामाजिक अन्यायापासून रक्षण करण्याचे आणि विशेषत: स्त्रिया व बालक यांचे शोषणापासून मुक्ती करण्याचे तसेच काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश संविधानाने राज्यांना दिले आहेत़ त्या आदेशांचे पालन करीत हा कायदा करण्यात आला आहे. कायदा झाला पण त्यात त्रुटी आहेत़ त्याही दूर करण्याचे आद्य कर्तव्य शासनाचे असून, या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
अॅड. निर्मलकुमार सुर्यवंशी