भूषण कांबळेसंस्थापक, वहाण
गेल्या आठवड्यातील ‘प्राडा’ प्रकरण अजून तसं ताजंच आहे म्हणायचं. इटलीतील प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने त्यांच्या मेन्सवेअर फॅशन शोमध्ये एक चप्पल सादर केली, जी दिसायला अगदी हुबेहूब पारंपरिक कोल्हापुरी चप्पलसारखी होती. मात्र, त्यांनी ‘कोल्हापुरी’चा संदर्भ, क्रेडिट न देता किंवा उल्लेखही न करता, ती स्वतःच्या ब्रँडच्या नावाखाली बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सोशल मीडियापासून ते व्यापार मंडळांपर्यंत सर्वत्र संतापाची लाट उसळली. एकूण समाज, स्थानिक कारागीर आणि चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थांनीही या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला.
परिणामी, ‘प्राडा’ला आपली चूक मान्य करावी लागली आणि शेवटी कबूल करावं लागलं की हो, हे डिझाइन कोल्हापुरी चपलेवर आधारितच आहे. वरून त्यांनी ‘आम्ही स्थानिक कारागिरीचा सन्मान करतो’ अशी जोडही दिली. डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या हेतूने ‘प्राडा’ने त्यांच्या टीमला थेट कोल्हापूरला पाठविलं. त्यांनी काही कारखाने आणि दुकानांना भेटी दिल्या, सात कोल्हापुरी चपला खरेदी केल्या. पण त्यांचं हे पाऊल खरंच सच्च्या संवेदनशीलतेतून होतं की केवळ जनतेच्या रोषाला शांत करण्यासाठी रचलेला ‘पीआर स्टंट’ होता; हा प्रश्नच आहे. कारण कोल्हापुरातील खरे कारागीर, हस्तकला मंडळं किंवा प्रत्यक्ष हस्तकलेशी संबंधित कोणत्याही संस्थेशी त्यांनी औपचारिक भागीदारी केली असल्याचं निदान वाचनात तरी आलेलं नाही.
या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली : जर आपण निर्धाराने आपल्या हक्कासाठी आवाज उठवला, तर जगातील सर्वांत मोठ्या ब्रँडनाही नमविता येतं. आपण गप्प बसलो असतो, तर कदाचित ‘प्राडा’ने हे प्रकरण सहज जिरवलं असतं. या प्रकरणातून मिळालेला आत्मविश्वास, लोकांना आपल्या कलेबद्दल आणि वारशाबद्दल अधिक जागरूक करेल, अशी आशा आहे. यापुढे या प्रतिक्रिया केवळ भावनिक असून, भागणार नाही, तर कायद्याची चौकट भक्कम करणं, आणि आपल्या कलाकृतींना सामूहिक बौद्धिक संपदा म्हणून बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणंही तितकंच गरजेचं आहे. भारतीय ब्रँड तज्ज्ञ आता कोल्हापुरी चपलेला एक स्वतंत्र, मजबूत ब्रँड म्हणून गांभीर्याने घ्यायला लागले आहेत. कोल्हापुरीची लोकमान्यता व सजगता इतर प्रांतांतही पसरण्याची शक्यता आहे.
‘कोल्हापुरी’ने जागतिक बाजारपेठेत केवळ टिकून राहणं नव्हे, तर वाढणं आणि समृद्ध होणं हे आपलं ध्येय असायला हवं. यासाठी सर्व संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन एक धोरणात्मक दिशादर्शक कृती आराखडा तयार करणं आवश्यक आहे. ‘Vhaan’ सारखे अधिकाधिक ब्रँड या क्षेत्रात उतरले, तर कोल्हापुरी चपलांची वितरण साखळी अधिक भक्कम, कार्यक्षम आणि वाढती राहील. चांगल्या दर्जाच्या स्पर्धेमुळे खऱ्या कोल्हापुरीचा टॅग अधिक प्रतिष्ठेचा होईल. उत्तम गुणवत्ता राखून, स्वतःहून गुणवत्ता नियमन स्वीकारून, सर्वोत्तम दर्जाच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं भान ठेवलं गेलं, तर कोल्हापुरीची प्रतिमा अधिक ठळक होईल. हे साध्य करण्यासाठी पुढील गोष्टी अत्यावश्यक आहेत: १. मजबूत सप्लाय चेन उभारणं २. GI टॅगचं काटेकोर पालन ३. गुणवत्ता नियंत्रणाचं स्वयंस्फूर्त धोरण ४. ब्रँडिंग, पॅकेजिंग, डिझाईन इनोव्हेशनमध्ये भक्कम गुंतवणूक ५. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारागिरांसाठी प्रशिक्षण, क्षमतावाढ आणि संधींची निर्मिती.
हा उद्योग पूर्णतः हातकलेवर आधारित असल्याने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे विशेष ट्रेनिंग सेंटर्स, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प, एक्स्पोर्ट, फायनान्स, क्वालिटी कंट्रोल अशा क्षेत्रातील तज्ज्ञ समित्यांची निर्मिती गरजेची आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून सक्रिय सहकार्य मिळवणं अत्यावश्यक आहे. कोल्हापुरी ही एक फक्त चप्पल नाही; तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला कलेचा वारसा आहे. अनेकांच्या मनात जपलेली, आठवणीत रुजलेली ती एक कथा आहे, जी आज माझ्यासारख्या तरुणांनी जगाला त्यांच्या भाषेत सांगितली पाहिजे. जेव्हा आपण मनापासून ही गोष्ट जगाला सांगू, तेव्हा हे जग ती आवर्जून ऐकेल आणि कोल्हापुरीला तिच्या नावासकट, अभिमानाने स्वीकारेल. आणि मग ही आपली कोल्हापुरी ‘चोरून’ मिरवण्याची हिंंमत कोणताही ब्रँड करणार नाही.