खडसेंचे विखारी एकारलेपण

By Admin | Updated: November 4, 2014 02:01 IST2014-11-04T02:01:05+5:302014-11-04T02:01:05+5:30

माणसांच्या महत्त्वाकांक्षा दडून राहणाऱ्या नसल्या, तरी राजकारण आणि त्यात राखायचा संयम यासाठी तरी त्यातल्या मोठ्या माणसांनी त्या दडवण्याची शिकस्त करायची असते.

Khadseen Vichari Ekarleepan | खडसेंचे विखारी एकारलेपण

खडसेंचे विखारी एकारलेपण

एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावर नाराज असलेले भाजपाचे दुसरे ज्येष्ठ नेते आहेत. पंढरपुरात श्री विठ्ठलाची पूजा करायला कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर आलेल्या खडसेंनी त्यांची याबाबतची नाराजी उघड केली. ‘भाजपाच्या महाराष्ट्र विजयात बहुजन समाजाचा वाटा मोठा असल्याने त्याच्या मुख्यमंत्रिपदावर बहुजन समाजाचा माणूस येणे आवश्यक होते व तसे होणे महाराष्ट्राला आवडणारे होते,’ अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांना दिलेले मुख्यमंत्रिपद बहुजनविरोधी असल्याचे संकेत दिले. खडसे हे एक जुने जाणते व मुरलेले राजकीय नेते आहेत आणि राजकारणाला लागणारे दीर्घकालीन राग-द्वेषाचे राजकारण त्यांना चांगले अवगत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आरंभापासून आघाडीवर होते. निवडणुकीच्या प्रचारकाळातही तेच मुख्यमंत्री होतील, असे साऱ्यांनी गृहित धरले होते. मात्र, उमेदवार कोण असे विचारले, की भाजपाचे प्रादेशिक नेते जी तीन-चार नावे राजकारणासाठी घेत त्यात खडसे यांचेही एक नाव असे. (तसे तर विनोद तावडेंचे नावही त्यात पस्तूर म्हणून घेतले जायचे) पंकजा मुंडे यांनीही एकवार आपले नाव ‘मी त्या पदाला पूर्ण लायक असल्याचे’ सांगून सुचविले होते. माणसांच्या महत्त्वाकांक्षा दडून राहणाऱ्या नसल्या, तरी राजकारण आणि त्यात राखायचा संयम यासाठी तरी त्यातल्या मोठ्या माणसांनी त्या दडवण्याची शिकस्त करायची असते. ती अपेक्षा पंकजाकडून नाही. तावडेंकडून ती बाळगण्यातही अर्थ नाही. आपल्या लहानसहान गोष्टीही टिष्ट्वटरवर जाहीर करण्याची सवय जडलेल्या पुढाऱ्यांकडून अशा अपेक्षा बाळगण्यात अर्थही नाही. पण, खडसे जुने आहेत. गेली अनेक दशके ते राजकारणात आहेत. विधिमंडळात समोरच्या बाकावर बसणारे आणि मंत्रिपदाचा अनुभव असणारे आहेत. त्यांनी आपली सुप्त आकांक्षा अशी व्यक्त करावी हा त्यांच्याविषयीची कीव करायला लावणारा प्रकार आहे. ती व्यक्त करताना तिला विकासकामातील स्पर्धेचा वा अनुभवाच्या मोठेपणाचा धागा खडसेंनी जोडला असता, तर ते त्यांना शोभूनही दिसले असते. दु:ख याचे की त्यांनी आपली नाराजी जातीच्या नावाने उघड केली. बहुजन समाज हा शब्द कितीही व्यापक, मोठा आणि गोंडस दिसला, तरी ज्या संदर्भात खडसेंनी तो वापरला तो त्याला जातिवाचक अर्थ चिकटवणारा व फडणवीस हे बहुजन समाजातून आलेले नाहीत, हे सांगणारा आहे. सरळ अर्थाने हे विधान जातिवाचक व ब्राह्मण-ब्राह्मणेतर या वादाला खतपाणी घालणारे आहे. असे विधान भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री करावे याहून मोठी राजकीय क्षतीही दुसरी नाही. खडसे बहुजन समाजाचे असणे आणि त्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा असणे, यात गैरही काही नाही. दिल्लीहून मुंबईला आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांचे नाव प्रथम सुचविले तेव्हा नाराज झालेले खडसे काही काळ रुसून बंद खोलीत जाऊन बसल्याच्या बातम्याही वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या. तरीही ते नंतरच्या काळात मंत्रिमंडळात यायला राजी झाले. महसुलासारखे अतिशय महत्त्वाचे खाते देऊन त्यांचे सांत्वन करण्यात पक्षालाही यश आले. परिणामी, आता सारे काही सुरळीत झाले, असेच साऱ्यांच्या मनात आले. पण, खडसे अस्वस्थच होते आणि आता त्यांनी आपली अस्वस्थता अशी व्यक्त करून भाजपाच्या साऱ्या सोहळ्यालाच अपशकून केला आहे. त्यांना सांभाळणे किंवा त्यांचा बंदोबस्त करणे ही फडणवीसांची तत्काळची व मोठी जबाबदारी आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला पहिला अडसर नितीन गडकरी या त्यांच्याच समाजातील एका ज्येष्ठ नेत्याने उभा केला होता, हे बहुजन समाजाच्या खडसेंना येथे आठवावे. नागपुरातील आपल्या वाड्यावर पक्षाचे ४२ आमदार एका रांगेत उभे करून त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शक्तिप्रदर्शन करण्याची आणि वर ‘मला मुंबईत येण्याची इच्छा नाही’ असे सांगण्याची किमयाही केली होती. दिल्लीहून चाके फिरल्यानंतर व तेथून योग्य ती समज आल्यानंतर वाड्यावरचे ते बंड काही काळ गेल्यानंतरच शमले होते. तात्पर्य, ‘बहुजनां’आधी ‘स्वजनां’नीही फडणवीसांना विरोध दर्शविला होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांची जनमानसातील प्रतिमा एवढी स्वच्छ, पारदर्शक आणि जातीनिरपेक्ष की यातल्या कोणाचेही काही चालले नाही. मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतर नागपुरात त्यांचे जे देवदुर्लभ स्वागत झाले आणि त्यात समाजाचे सारे वर्ग ज्या अहमहमिकेने सहभागी झाले त्यातूनही हीच गोष्ट स्पष्ट झाली. मुख्यमंत्रिपदासाठी वा नेतेपदासाठी जन्म वा जात हीच एकमेव कसोटी नाही. ती ज्या समाजात असते वा मानली जाते त्याला कोणी फारसे प्रगतही समजत नाहीत आणि महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे... व खडसे आणि मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या अन्य दावेदारांनी ही बाब फार गंभीरपणे समजून घ्यावी, अशी आहे.

Web Title: Khadseen Vichari Ekarleepan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.