‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:53 IST2025-04-24T06:52:52+5:302025-04-24T06:53:29+5:30

काश्मिरी लोक देशभर सर्वत्र राहतात. पहलगामचं निमित्त करून त्यांना वेगळी वागणूक न देता उलट सुरक्षिततेची खात्री/हमी देणं हे आपल्या हातात आहे.

Kashmiris live across the country for various reasons It is in our hands to ensure their safety and not to treat them differently | ‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले

‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले

अधिक कदम, संस्थापक, 
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म कोणता, हे विचारून ठार मारण्यात आलं. या भयंकर घटनेने जम्मू आणि काश्मीर विलक्षण हादरलं आहे. मी १९९६-९७च्या सुमारास पहिल्यांदा काश्मीरमध्ये आलो. तेव्हा दहशतवाद इथे नवीन होता. त्याचं स्वरूप आतापेक्षा खूप वेगळं होतं. गावागावात सहज १५-२० दहशतवादी असत. अगदी नेमकं सांगायचं तर १९ वेळा दहशतवाद्यांनी मला चौकशीसाठी उचलून नेलं. मी कुठून आलोय, कोण आहे, कशासाठी आलोय, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असत. चौकशीच्या नावाखाली तासन्‌तास प्रश्नोत्तरं चालायची. एकदा अशीच माझी चौकशी चाललेली असताना एक तरुण मुलगा भेटला. दहशतवाद्यांपैकीच एक होता. पूर्वी शिकायला पुण्यात येऊन गेला होता. एमबीबीएसची प्रवेश परीक्षा देऊन आला होता. पण पुढे त्याच्या घरात कुणीतरी गेलं, त्यामुळे त्याला शिक्षण सोडून परत यावं लागलं. शिक्षणाचं बोट सुटलं आणि त्याच्या हातात एके-४७ आली. पुण्यातलं एक प्रसिद्ध विद्यापीठ, स्वारगेटचा परिसर त्याला नीट माहिती होता. ‘मी पुण्याचा आहे’ असा उल्लेख आला म्हणून त्यावेळी माझी सुटका झाली असेल का? कुणास ठाऊक, पण स्थानिक लोकांचा माझ्यावर, माझ्या कामावर पूर्णविश्वास बसेपर्यंत आलेले वेगळे अनुभव माझ्याही गाठीशी आहेत. हे वाईट अनुभव चांगल्या अनुभवांमध्ये बदलावे म्हणून मीही प्रयत्न केले.

आपल्या कामात, निर्णय प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग असायला हवा, हा नियम कटाक्षाने पाळत आलो. कितीतरी वेळा मला स्थानिकांनीच वाचवलंय. इथे दहशतवाद रुजण्यापूर्वीचं काश्मीर बघितलेले ते ज्येष्ठ लोक होते. मी काय करतो आहे, ते का महत्त्वाचं आहे हे त्यांना कळत असावं, त्यामुळे माझ्या सुखरूप असण्याचं श्रेय त्यांनाही आहेच. त्यातले अनेक लोक आता नाहीत. पण असते तर पहलगाममधल्या ताज्या घटनेने ते हादरलेच असते.

जम्मू आणि काश्मीरबद्दल बोलताना गेल्या काही वर्षांत ‘कलम ३७०’ रद्द होण्यापूर्वी आणि ‘कलम ३७० रद्द झाल्यानंतर’ असे निकषही लावले जातात. यातल्या ‘पूर्वी’ही इथे पर्यटक येत होतेच. पण इथे पर्यटकांवर हल्ला मात्र कधीही झाला नव्हता. मग आता तो का झाला? तो करून त्यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, या मुद्द्यांवर सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ‘सगळं काही शांत असणं’ आणि ‘सगळं काही शांत आहे असं वाटणं’ या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सगळं काही खरोखर शांत असावं असं वाटत असेल तर त्यासाठी थोडा वेळ जाणार, तो जाणं आपण मान्य करायला हवं. ‘कलम ३७० रद्द होण्यापूर्वी’ काश्मीर सुरक्षित नव्हतं आणि ‘कलम ३७० रद्द झाल्यानंतर’  काहीही धोका नाही, असा अर्थ आपण नागरिक म्हणून स्वतःच लावलाय का? त्या भरात जो भाग सुरक्षित नाही, जिथे पोलिस, सुरक्षा यंत्रणा यांचं अस्तित्वच नाही तिथंपर्यंत जाऊन आपण जीव धोक्यात घालतोय का? याचा विचार आपण करणार आहोत का? - असे कितीतरी प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. 

काल पहलगाममध्ये जे घडलं त्यानंतर स्थानिक काश्मिरींनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारला. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात ही स्थानिक काश्मिरींची प्रतिक्रिया आहे. ठिकठिकाणी कँडल मार्च निघाले. यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक कारणांनी ‘बंद’ होत.  ते ‘बंद’ आणि हा ‘उत्स्फूर्त बंद’ यांच्यातला फरक पुरेसा स्पष्ट आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो कणा ताठ राहायला हवा असेल, तर पर्यटक यायला हवेत, हे काश्मिरी जनतेला माहिती आहे. ताज्या घटनेनंतर आता पुढची पाच वर्ष काश्मीरसाठी चिंतेची असणार आहेत. धर्म, जात या निकषांवर लोकांमधली दरी रुंदावू नये, हे पाहणं आता भारतीयांच्या हातात आहे. काश्मिरी लोक विविध कारणांसाठी देशभर राहतात. त्यांना वेगळी वागणूक न देता उलट त्यांना सुरक्षिततेची खात्री/हमी देणं हे आपल्या हातात आहे. आपण ते केलं तर(च) काश्मीरमध्ये जाणारा संदेश सलोख्याचा आणि सौहार्दाचा असेल, तो तसा जाणं महत्त्वाचं आहे आणि आवश्यकही! 

adhik@borderlessworldfoundation.org

Web Title: Kashmiris live across the country for various reasons It is in our hands to ensure their safety and not to treat them differently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.