शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

Kargil Vijay Diwas: कारगिल... विजयापूर्वीच्या गंभीर चुका आणि विजयाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 7:33 PM

कारगिलमधील विजयाचा २०वा स्मृतीदिन साजरा करताना त्यावेळच्या काही गंभीर चुकाही जनतेच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत.

- प्रशांत दीक्षित

विजय दिवस साजरा करतानाच कारगिल परिसरातील ११० किलोमीटच्या सरहद्दीवरील १३० ठाणी पाकिस्तानी सैनिक कशी ताब्यात घेऊ शकले, कोणत्या चुकांमुळे हे घडले हेही जनतेला समजणे आवश्यक आहे. यातूनच समाजाची समज वाढते. चुकांचे स्मरण करून त्या सुधारल्या नाहीत तर विजय दिवस पोकळ ठरतात आणि कारगिलनंतरही मुंबईवरील हल्ल्याला तोंड देण्याची वेळ येते.कारगिलमधील विजयाचा २०वा स्मृतीदिन साजरा करताना त्यावेळच्या काही गंभीर चुकाही जनतेच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. विजय साजरा करण्याची हौस भारतात विशेष आहे. विजय दिवस साजरा करू नये असे नाही. देशात राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी आणि देशात भावनिक एकात्मता साधण्यासाठी असे दिवस उपयोगी असतात. लोकांमध्ये देशभक्तीचा स्फुल्लिंग चेतविणे हे विजय दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट असते. मात्र हे भावनिक उद्दिष्ट झाले. युद्धे नियोजन व व्यूहरचना यांच्या बळावर जिंकली जातात, केवळ भावनेवर नव्हे. या दोन गोष्टींबाबत आपण कुठे कमी पडलो असू तर त्याचीही चर्चा विजय दिवशी होणे आवश्यक असते. विजय दिवस साजरा करताना शौर्याबरोबर चुकांचेही स्मरण केले पाहिजे. पण ते करण्याचा शहाणपणा आपल्या रक्तात नाही. उलट चुका दाखविणे म्हणजे राष्ट्रद्रोह करणे अशा मानसिकतेत सध्या आपण सापडलो आहोत. ही मानसिकता झुगारून काही चुका स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.

कारगिलमधील पाकिस्तानची घुसखोरी हा भारतासाठी अनपेक्षित धक्का होता. लष्कर, प्रशासन व वाजपेयी सरकार या घुसखोरीबद्दल पूर्णपणे अंधारात होते हे सध्या विसरले गेले आहे. वाजपेयींचा लाहोर बस प्रवास काही महिन्यांपूर्वीच झाला होता. या बस प्रवासामुळे भारत-पाकिस्तान संबंधात नवा अध्याय लिहिला गेला असून आता सर्व काही सुरळीत होऊ लागेल अशा स्वप्नात सरकार, लष्कर व प्रशासन होते. अखंड सावधानता, हे मुख्य सूत्र वाजपेयी सरकार विसरले होते.

घुसखोर आठ ते दहा किलोमीटर आत घुसले आहेत हे ३ मे रोजी लष्कराच्या लक्षात आले. त्यांना हुसकाविण्यासाठी लष्कराने प्रतिहल्ल्यालाही सुरूवात केली. मात्र कारगीरमधील परिस्थिती किती गंभीर आहे हे दिल्लीत वाजपेयी सरकारला २५ मेपर्यंत लक्षात आले नव्हते. जसवंतसिंह यांचा मुलगा त्यावेळी पत्रकार होता. त्याला एका लष्करी अधिकार्याने खासगी भेटीत माहिती दिल्यावर सरकारमध्ये गडबड उडाली. २५ मेला फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली तेव्हा वाजपेयी सरकारला जाग आली. तोपर्यंत लष्कराचे ५० जवान ठार झाले होते. लष्कराचे अधिकारी तोपर्यंत ती साधी घुसखोरी आहे असेच सांगत होते. त्यांचे ऐकून, दोन ते चार दिवसांत घुसखोरांना पिटाळून लावण्यात येईल असे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस सांगू लागले. हेच वाक्य त्यांनी जूनमध्ये अनेक वेळा उच्चारले. प्रत्यक्षात सर्व घुसखोरांना पिटाळण्यासाठी वा ठार करण्यासाठी अडीच महिने कडवा संघर्ष करावा लागला. त्यामध्ये ४७४ अधिकारी व सैनिकांना बलिदान करावे लागले. १२०० सैनिक व अधिकारी अपंग झाले.

गुप्तचर यंत्रणांकडून योग्य माहिती मिळाली नाही असा दावा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून केला गेला. युद्धानंतर नेमलेल्या चौकशी समितीनेही त्यावर विश्वास ठेवला. मात्र प्रवीण स्वामी व अन्य काही पत्रकारांनी खणून काढलेल्या माहितीनुसार घुसखोरीची माहिती गुप्तचरांनी वेळीच दिली होती. ३५०हून अधिक जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे आणि एप्रिलमध्ये ते भारतीय हद्दीत घुसतील अशी माहिती स्कार्डू येथून देण्यात आली होती. काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याकडे कारगील-लेह हमरस्त्याचा नकाशा मिळाला होता तर आणखी एका दहशतवाद्याकडे झोझिला खिंडीतील रस्ता उद्ध्वस्त करण्याच्या कटाचा आराखडा सापडला होता. ही माहिती लष्कराने गंभीरपणे घेतली नाही. पाकिस्तानने घुसखोरी सुरू केली ती जानेवारी १९९९मध्ये. त्याआधी कारगीर, द्रास, बटालिक या भागात तुफान गोळाबारी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानच्या तोफा सतत धडधडत होत्या.

तोफगोळ्यांचा असा वर्षाव त्याआधीच्या अनेक वर्षांत झाला नव्हता. भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेच्या जवळ येऊ न देणे व घुसखोरांच्या तयारीला संरक्षण देणे हे उद्देश या हल्ल्यामागे होते. दुर्दैवाने पाकिस्तानचा हा व्यूह भारतीय लष्कराच्या लक्षात आला नाही. त्याआधीच्या वर्षात भारताने पोखरण येथे अणुस्फोट केला होता. अणुस्फोट केल्यामुळे आता पाकिस्तानकडून धाडस केले जाणार नाही अशा आवेशात भारताचे नेतृत्व असल्याने स्कार्डूमधून आलेली माहिती लष्करी अधिकार्यांनी वरिष्ठ पातळीवर पोहोचविलीच नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे या भागाची हवाई टेहळणी करण्यासाठी वायूदलाच्या जग्वार विमानांची मदत घेण्यात लष्कर प्रमुख मलिक यांनी कुचराई केली. ही टेहळणी व्यवस्थित झाली असती तर घुसखोरीची व्याप्ती व तयारी हे दोन्ही लक्षात आले असते. टेहळणी तंत्रज्ञानाबद्दल वाजपेयी सरकारमध्ये अनास्था होती.

अद्ययावत सामग्री नव्हती. तरी योग्य ती टेहळणी कऱण्यास हवाई दल सक्षम होते. त्यावेळची काही छायाचित्रे याची साक्ष देतात. मात्र हवाई दल व लष्कर यांच्यांत समन्वय नसल्याने घुसखोरांच्या पूर्वतयारीबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही. ही माहिती नसल्याने तोलोलिंग, टायगर हिल अशा ठिकाणी पहिल्या टप्प्यांत सैनिक आंधळेपणे घुसविण्याची चूक लष्कराने केली. उंचावर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना सहज टिपून काढले. पाकिस्तानी घुसखोर व सैनिक कुठे लपले आहेत हेच पहिले चार आठवडे भारतीय सैनिकांना समजत नव्हते. यामुळे मनुष्यहानी वाढली. पाकिस्तानी घुसखोर वा सैनिकांनी मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या व उत्तम शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे होती. भारताची दोन विमाने व एक हेलिकॉप्टर त्यांनी सहज टिपले यातून त्यांची क्षमता लक्षात यावी.

भारताच्या १२० किलोमीटरच्या सरहद्दीवरील, १३ ते १८हजार फूट उंचीवरील १३० ठाणी घुसखोरांनी ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडे होती, भारताकडे नव्हती. कारगीरमध्ये घुसखोरी करणारे काश्मीरी दहशतवादी आहेत, पाकिस्तानी लष्कर नव्हे असे आपले संरक्षण मंत्री सांगत होते. तर पाकिस्तानच्या १०व्या कॉर्पस कमांडोचे सैनिक भारतात घुसले आहेत असे अमेरिकेने मे महिन्यांतच जाहीर केले होते. त्यानंतर भारत याबद्दल बोलू लागला. पुढे आपल्या गुप्तचरांनी मुशर्रफ यांचे एक टेलीफोन संभाषण पकडले. कारगील कारनामा पंतप्रधान नवाझ शरीफ यांना केवळ माहित नव्हता तर त्यांना तो मान्य होता हे त्यातून कळले. भारत-पाक भाई-भाई या स्वप्नातून त्यावेळी वाजपेयी सरकार जागे झाले.

पाकिस्तानकडून काही गडबड होण्याची शक्यता असल्याने ताबडतोब टेहळणी सामुग्री व जादा कुमक द्यावी अशी मागणी ब्रिगेडिअर सुरिंदर सिंग यांनी अनेकवेळा केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारगीरमधील परिस्थिती अजिबात गंभीर नाही असे लेफ्टनंट जनरल किशन पाल सतत सांगत होते. लष्करी अधिकार्यांमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता हे अनेक पत्रकारांनी दाखवून दिले आहे. त्वरीत मदतीची मागणी करणार्या ब्रिगेडिअर सुरिंदर सिंग यांच्यावर गोपनीयतेचा कायदा भंग करण्याची कारवाई २००१मध्ये करण्यात आली आणि किशन पाल यांना मात्र पदक देऊन गौरविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या चुका दडपण्याचा हा प्रयत्न होता.

तरीही भारताला कारगीरमध्ये विजय मिळाला. त्यामागची महत्वाची कारणे म्हणजे लवकर संपलेला हिवाळा, पाकिस्तानने दिलेला पहिला धक्का पचविल्यानंतर भारतीय लष्कर व हवाई दलाने उत्तम ताळमेळ राखत केलेले प्रतिहल्ले, प्रथम गांगरलेल्या वाजपेयी सरकारने नंतर दाखविलेले धैर्य व निपुणता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेकडून मिळालेली मदत. यापैकी हिवाळा लवकर संपणे आणि अमेरिकेने भारताची बाजू घेणे या बाबी पूर्णपणे अनपेक्षित होत्या.

कारगिल घुसखोरीमागे पाकिस्तानचे तीन उद्देश होते. १) काश्मीरी लोकांसाठी प्रसंगी बलिदान करण्यास पाकिस्तानी सैन्य मागेपुढे पहाणार नाही हे काश्मीरी लोकांच्या मनावर ठसविणे २) काश्मीरमधील भारतविरोधी आंदोलनाला उत्तेजन देणे, कारण हे आंदोलन तेव्हा मंदावले होते ३) भारतीय भूभागाचा लचका तोडून, अमेरिकेला मध्यस्थी घालून भारताला काश्मीर प्रश्नावर तडजोड करण्यास भाग पाडणे. १९९९मध्ये झोझिला खिंड आणखी दोन आठवणे उशीरा खुली झाली असती तर द्रास-कारगीलमधून लेहकडे जाणारा भारतीय हमरस्ता पाकिस्तानच्या हाती गेला असता. या रस्त्यापासून अक्षरशः एक किलोमीटर अंतरावर घुसखोर पोहोचले होते. मात्र झोझिला खिंड बर्फातून मोकळी झाल्याने भारताची कुमक वेगाने द्रास व कारगीलमध्ये पोहोचली व जोरदार प्रतिहल्ला सुरू करता आला. हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे घुसखोरांना पाकिस्तानातून मिळणारी मदत जवळपास बंद झाली. शस्त्रे, अन्न, पाणी या सर्वाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. भारताचा विजय त्यामुळे दृष्टीपथात आला.

पाकिस्तानला दुसरा धक्का बसला तो अमेरिकेकडून. अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन हे ठामपणे भारताच्या बाजूने उभे राहिले. वाजपेयी यांच्या लाहोर बस प्रवासामुळे क्लिंटन खुष झाले होते. भारत-पाकिस्तान संबंध चिघळणे त्यांना नको होते. कारण अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवर त्यामुळे परिणाम होणार होता. शिवाय आर्थिक सुधारणांमुळे श्रीमंत होत चाललेली भारताची बाजारपेठ अमेरिकेला खुणावीत होती. ४ जुलै रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी क्लिंटन यांची भेट घेतली तेव्हा क्लिंटन यांनी त्यांना खडसावले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्ऱफ हे मुंबईवर अण्वस्त्र डागण्याच्या तयारीत असून त्यामुळे पाच ते आठ लाख लोक ठार होतील अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचरांनी पाकिस्तानी अधिकार्यांकडून मिळविली होती. (वाजपेयी किंवा फर्नांडिस यांच्याकडे ही माहिती नव्हती) ही माहिती ऐकताच क्लिंटन संतप्त झाले व त्यांनी शरीफ यांना चांगलेच धारेवर धरले. त्याबद्दलची तपशीलवार माहिती टाल्बोट यांच्या पुस्तकात आणि ब्रुस रिडल यांनी पेन्सिलव्हानिया विद्यापीठासाठी लिहिलेल्या निबंधात दिली आहे. हे दोन्ही अधिकारी चर्चेला उपस्थित होते. त्वरीत माघार घेऊन भारतीय नियंत्रण रेषेचा पाकिस्तानने सन्मान केला नाही तर अमेरिका उघडपणे पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेईल आणि १०० दशलक्ष डॉलर्सची मदत ताबडतोब थांबविण्यात येईल असे क्लिंटन यांनी सांगितले.

शरीफ यांच्याबरोबरच्या चर्चेचा तपशील वाजपेयींना क्लिंटन कळवित होते हे विशेष. ब्रिटनसह चीन, सौदी अरेबिया या पाकिस्तानच्या मित्र देशांनीही अमेरिकेसारखी भूमिका घेऊन शरीफ यांच्यावर दबाव टाकला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सम्युअल बर्जर यांनी याबाबत महत्वाची भूमिका बजावली. परिणामी ११ जुलै १९९९ पासून पाकिस्तानी सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली. २५ जुलैपर्यंत प्रत्येक घुसखोर एकतर माघारी गेला वा भारतीय सैन्याने टिपून काढला. पाकिस्तानचे १७०० सैनिक ठार झाल्याचा भारताचा अंदाज आहे. २६ जुलै १९९९ला युद्ध संपले.

भारताला भूप्रदेशावर मिळालेल्या विजयाचा कौतुकदिन साजरा करायला हवा हे खरे असले तरी लष्कर, प्रशासनात ताळमेळ नसल्याने युद्धाचे स्वरूप अतिशय गंभीर झाले या त्रुटीचेही स्मरण या दिवशी केले पाहिजे. भारतीय लष्कराकडून, प्रशासनाकडून व राज्यकर्त्यांकडून कोणत्या चुका झाल्या हे जनतेला समजले पाहिजे आणि यासाठी चौकशी आयोगातील माहिती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणे देऊन लोकांपासून गुप्त ठेवण्याची परंपरा थांबविली पाहिजे. व्यक्ती, संस्था, यंत्रणा यापैकी कोणाची काय चुक झाली व त्यामागची कारणे काय हे जनतेला समजले तर समाजाची समज वाढते. चुकांचे स्मरण करण्याची सवय आपल्याला नसल्यामुळे कारगीलनंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा पाकिस्तानने मुंबईमध्ये घुसखोरी केली. १६७ नागरिकांचा हकनाक बळी गेला. आणि त्यावेळीही विविध यंत्रणात ताळमेळ नसल्याचे कारण सांगत चौकशी अहवाल बंद करण्यात आला. चुकांचे स्मरण करून त्या सुधारल्या नाहीत तर विजय दिवस पोकळ ठरतात.(पूर्ण)

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवान