विद्वेष आणि विभाजनवादी राजकारण

By Admin | Updated: January 2, 2015 00:19 IST2015-01-02T00:19:49+5:302015-01-02T00:19:49+5:30

भाजपा आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी, ‘हे हिंदुराष्ट्र असून घरवापसी होणारच’ असे विधान कोलकत्यात केले.

Juvenile and Partitioning Politics | विद्वेष आणि विभाजनवादी राजकारण

विद्वेष आणि विभाजनवादी राजकारण

विद्वेष आणि विभाजनवादी राजकारण
भाजपा आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी, ‘हे हिंदुराष्ट्र असून घरवापसी होणारच’ असे विधान कोलकत्यात केले. वादग्रस्त विधानांमुळे नाराज झालेल्या नरेंद्र मोदींनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर भागवतांनी हे विधान केले आहे. भाजप आणि परिवारातील नेत्यांच्या बेलगाम वक्तव्यांना आवर घालायचा प्रयत्न मोदी करीत आहेत, असे सांगितले जात आहे.
राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीतील प्रचारसभेत बोलताना, ‘तुम्हाला रामजाद्यांचे सरकार हवे की हरामजाद्यांचे?’ असे विचारले. विरोधी पक्षांनी राज्यसभेचे कामकाज रोखल्यानंतर साध्वींनी खेद व्यक्त केला आणि मोदींना संसदेच्या दोन्ही सभागृहांत साध्वींची बाजू सावरून घ्यावी लागली. या घटनाक्रमानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्ये करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाल्याचे दिसून येते. सुषमा स्वराज यांची गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी, साक्षीमहाराजांनी गांधीहत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणे, उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आणि भाजपाचे माजी खासदार राम नाईक यांचे, ‘अयोध्येत राममंदिर उभारावे अशी लक्षावधी भारतीयांची इच्छा आहे’ हे वक्तव्य, अशी चढाओढच सुरू आहे. मोदींनी खासदारांना, ‘सांभाळून बोला’ अशी तंबी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले; मात्र त्यानंतरही हा वाचाळपणा सुरूच आहे. साक्षीमहाराजांनी आपले वक्तव्य मागे घेतल्यानंतर अखिल भारत हिंदु महासभानामक संघटनेने देशभर नथुरामाचे अर्धपुतळे बसवण्याची मागणी केली आहे!
सरकारची नाचक्की होऊनही हे का सुरू आहे, याची चिकित्सा आवश्यक आहे. वादग्रस्त वक्तव्ये करून हे नेते स्वत:च्याच सरकारला अडचणीत आणत असल्याचे चित्र निर्माण होत असले तरी या वक्तव्यांचा आशय पक्षाच्या दूरगामी उद्दिष्टांशी सुसंगतच आहे. पार्टी विथ डिफरन्स असे बिरुद मिरविणाऱ्या भाजपाचे राजकारण इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिकच द्विमुखी आणि त्यामुळेच विरोधाभासाने भरलेले दिसते. भाजपाचा वैचारिक मूलस्रोत असणाऱ्या रा.स्व. संघाकडून हा वारसा आलेला असावा. आपण सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र राजकारण - तेही विभाजनवादी - करायचे, अशी संघाची नीती (!) राहिलेली आहे. आणीबाणीच्या काळात जनसंघीयांच्या दुहेरी निष्ठांमुळेच जनता पक्षात फूट पडली होती.
या वर्षी केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता यावी म्हणून अत्याधुनिक साधनांचा वापर केला गेला. मात्र, या भौतिक आधुनिकतेच्या अंतर्यामी प्रतिगामी विचारच वास करतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. भाजपाचे अनेक खासदार हे हिंदू धार्मिक नेते आहेत. त्या धार्मिक नेते असलेल्या व नसलेल्या खासदारांची वक्तव्ये, फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला हिंदू धार्मिक नेत्यांची उपस्थिती, भाजपने ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’च्या प्रमुखपदी नेमलेल्या वाय. सुदर्शन रावांनी केलेले जातिव्यवस्थेचे समर्थन, स्मृती इराणींनी ज्योतिषाकडे जाणे इ. उदाहरणे प्रतिगामीपण सिद्ध करण्यास पुरेशी आहेत. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या मते, मनुस्मृती हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मात्र, भारतात बऱ्याच अंशी रुजलेल्या लोकशाहीमुळे आता भाजपाच्या स्वप्नातील मनुस्मृतीचे राज्य आणणे आणि त्याबद्दल उघडपणे बोलणे अवघड आहे. पण तरीही, कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पोटातले ओठावर येतेच. त्यातूनच जातिव्यवस्थेचे, ज्योतिषाचे समर्थन येते. एकीकडे मोदी राज्यघटनेप्रति बांधिलकी असल्याचे सांगणार व दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले नेते बरोबर त्याउलट वक्तव्ये व वर्तन करणार, हे वारंवार घडत आहे.
हरिद्वारचे विद्यमान भाजपा खासदार आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, विज्ञान हे ज्योतिषशास्त्रापुढे खुजे आहे आणि भारताने एक लाख वर्षांपूर्वीच अणुचाचणी केली होती, असा दावा नुकताच केला! याच महाशयांनी, रालोआचे सरकार आल्यावर रुपया ५२ वरून ६३ पर्यंत वधारला असे विधान करून स्वत:चे हसे करून घेतले! संघप्रणीत विद्याभारतीच्या दीनानाथ बात्रा यांनी शिक्षणात पुराणकथा आणल्या असून, गुजरातमधील विद्यार्थ्यांना पूरकवाचन म्हणून त्या लावल्या गेल्या आहेत. स्टेम सेलचे तंत्रज्ञान, दूरचित्रवाणी, मोटरकार आपल्याकडे शेकडो वर्षांपूर्वीच उपलब्ध होते, गाईंची सेवा केल्याने मुलेबाळे होतात, यासारखे अनेक तथ्यहीन दावे त्यात केले आहेत. मध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण हद्दपार करणाऱ्या, वेंडी डोनिजर व इतर अनेक अभ्यासकांच्या, हिंदुत्ववाद्यांना गैरसोयीच्या पुस्तकांवर न्यायालयांमार्फत बंदी आणणाऱ्या बात्रांची गाडी मोदी पंतप्रधान झाल्यावर सुसाट सुटली आहे. बात्रांच्या पुस्तकांमध्ये मोदींचे शुभेच्छापत्रही आहे! याचा अर्थ, या घटनाविरोधी कृत्याला मोदींचा पाठिंबाच आहे.
खुद्द मोदीही अनेक अशास्त्रीय विधाने बिनदिक्कतपणे करत असतात. मुंबईत अंबानींच्या रुग्णालयाचे उद्घाटन करताना त्यांनी, कर्णाचा जन्म गर्भाशयाबाहेर होणे म्हणजे आपल्याकडे महाभारतकाळात अनुवंशशास्त्र अस्तित्वात होते आणि मानवी शरीरावर हत्तीचे डोके लावून गणपती तयार होणे म्हणजे त्या काळात प्लॅस्टिक सर्जन होता व तेव्हापासून प्लॅस्टिक सर्जरीला सुरुवात झाल्याचा दावा केला होता! एकीकडे मंगळावर यान पाठविण्याऱ्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन द्यायचे, ते करताना आपल्याकडे अंतराळशास्त्र आधीपासूनच विकसित होते असा, तर दुसरीकडे पुस्तकाच्या प्रस्तावनेत रामाने पहिले विमान उडविल्याचा दावा करायचा, असा हा द्विमुखीपणा आहे.
हा द्विमुखीपणा एवढ्यावरच थांबत नाही. एकीकडे भ्रष्टाचार हटवण्याचे वचन देत सत्तेवर यायचे आणि त्याच वेळी भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले पोखरियाल यांना खासदारकी आणि येडियुरप्पांना पदे द्यायची, संसदेच्या पायऱ्यांवर डोके टेकायचे; मात्र सभागृहांमध्ये क्वचितच उपस्थित राहायचे आणि विरोधकांनी वारंवार मागणी करूनही वादग्रस्त मुद्द्यांबाबत मिठाची गुळणी धरायची. देशात आणि परदेशात तसेच टीव्ही व रेडिओवर भाषणबाजी करणारे आणि उठसूट ट्विट करणारे मोदी या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चकार शब्द काढत नाहीत. त्यांच्या या बोलकेपणातील मौनच पुरेसे बोलके आहे.
काँग्रेसचीच आर्थिक धोरणे पुढे चालविणाऱ्या भाजपकडे स्वत:चा असा रचनात्मक कार्यक्रमच नाही. परिवारातील संघटनांच्या कार्यक्रमातील प्रतिगामीपण नवे नाही. त्यामुळेच विद्वेष हा या राजकारणाचा स्थायीभाव आहे. खुद्द मोदींची पंतप्रधान होण्याआधीची भाषणे-मुलाखतीही ‘परिवारा’चाच अजेंडा असे. पूर्वीच्या भाजपा राजवटीच्या काळात वाजपेयी मुखवटा होते, तर अडवाणी हा चेहरा. सध्या मोदी मुखवटा आहेत, तर चेहरे अनेक. त्यामुळेच मोदींची राजीनाम्याची धमकी आणि वाचाळपणा करणाऱ्यांना त्यांची तंबी कितपत खरी आहे, हाही प्रश्नच आहे.
तात्पर्य, हा वाचाळपणा सुरूच राहणार आहे. विकासाच्या दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले, हा प्रश्न लोकांनी विचारू नये म्हणूनही ते सोयीचेच असेल. विद्वेषाच्या या विभाजनवादी राजकारणातून समाजाचे अधिकाधिक धार्मिक ध्रुवीकरण होऊन लोकशाही मात्र विकल होणार आहे. भारताचे हे पद्धतशीरपणे सुरू असलेले तालिबानीकरण हेच सर्वांत मोठे आव्हान आहे.
मिलिंद चव्हाण
राजकीय विश्लेषक

Web Title: Juvenile and Partitioning Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.