...फक्त कमळाकडे बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:12 PM2019-04-11T13:12:27+5:302019-04-11T13:13:16+5:30

मिलिंद कुलकर्णी अमळनेरला भाजपच्या सभेत झालेल्या मारहाणीच्या अध्यायाचे पडसाद अनेक दिवस उमटतील. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहिलेले आहे, पण ...

Just look at the lotus! | ...फक्त कमळाकडे बघा!

...फक्त कमळाकडे बघा!

Next

मिलिंद कुलकर्णी
अमळनेरला भाजपच्या सभेत झालेल्या मारहाणीच्या अध्यायाचे पडसाद अनेक दिवस उमटतील. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहिलेले आहे, पण काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेते-कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन ‘काँग्रेसयुक्त भाजप’कडे वाटचाल सुरु आहे. परंतु, इतक्या लवकर अवगुण आत्मसात होतील, असे वाटत नव्हते. ही वाटचाल का आणि कशामुळे होत आहे, हा प्रश्न पडला. आमचा एक सन्मित्र आहे, ज्याचा प्रवास बालस्वयंसेवक, विद्यार्थी कार्यकर्ता आणि नंतर भाजप पदाधिकारी असा झालेला आहे, त्याच्याशी गुजगोष्टी करायचे ठरवले. ‘शतप्रतिशत भाजप’च्या संकल्पनेत इतर पक्षीयांची एवढी गर्दी झाली आहे की, हा निष्ठावंत कार्यकर्ता सध्या वर्तुळाबाहेर फेकला गेला आहे. पण त्याला हे मान्य नाही. नानाजी देशमुख यांचे उदाहरण देत तो, सध्या वय झाले नसले तरी थोडी विश्रांती घ्यायचे ठरवलेय, असे समर्थन करतो. मला उत्सुकता होती, अमळनेरसंबंधी तो आणि त्याच्यासारखे निष्ठावंत काय म्हणतात. म्हणून त्याच्याशी संवाद साधला.
मी : अमळनेरच्या घटनेतील मंडळी तर पक्षाची निष्ठावंत मंडळी आहे. तरी त्यांच्याकडून हा प्रकार कसा घडला? असा प्रकार बाहेरुन पक्षात आलेल्याने केला तर तुम्ही काँग्रेसी संस्कृतीच्या माथी खापर फोडतात?
सन्मित्र : पक्षाने सगळ्यांनाच सारखे घडवले आहे. कुंभार जसा असंख्य माठ घडवतो, त्यापध्दतीचे काम पक्ष करीत असतो. माठ गळका, फुटका निघाला तर कुंभाराला दोष का म्हणून द्यायचा? माठाची हाताळणी व्यवस्थित झाली नसेल, क्षमतेपेक्षा अधिक पाणी भरले असेल, माती गुणवत्तापूर्ण नसेल म्हणूनदेखील तो फुटू, गळू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. मला वाटते, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
मी : आज फक्त तुमचे ऐकायला आलो आहे. युक्तीवाद करायला नाही. त्यामुळे तुम्ही सांगाल ते ऐकून घेईल. मला एक प्रश्न पडतो, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, एक अपवाद वगळता २५ वर्षांपासून तुमचा खासदार या मतदारसंघातून निवडून येत आहे. तरीही ही उमेदवारीची काटाकाटी, व्यासपीठावर जबाबदार पदाधिकाऱ्यांची मारामारी का?
सन्मित्र : तुमचं म्हणणं बरोबर आहे. भाजप हा आता विशाल कुटुंबासारखा झाला आहे. सर्वसामान्य मोठ्या कुटुंबात जशा गोष्टी होतात, तेच भाजपमध्ये होत आहे. वेगळे काही नाही. फक्त तुमच्यासारखे मीडियावाले त्याला अवास्तव रुप देत आहेत. मोठ्या कुटुंबात बाहेरुन सुना येतात, त्यांची संस्कृती, सभ्यता घेऊन येतात. घरातील मुलींना सुनांचे अतिक्रमण वाटते. सुनांना घरातील नियम, रितीरिवाज यांचा जाच वाटतो. त्यामुळे भांड्याला भांडे लागते. तसेच घडते आहे. पक्षाचा पाया विस्तारत असताना या गोष्टी घडणारच आहेत. जे चुकीचे करतील, त्यांना पक्षशिस्त समजावून सांगितली जाईल. तशी पक्षात व्यवस्था असते.
मी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडल्याने मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात नाही का? पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही का?
सन्मित्र : भाजप हा व्यापक पाया असलेला, सखोल, समृध्द विचारसरणी, संस्कृती असलेला पक्ष आहे. छोट्या गोष्टींना फार महत्व न देता देशाच्या भल्यासाठी जनता भाजपला समर्थन देईल. कमळ कुठे उगवते, तर ते चिखलात उगवते. आपण कमळाकडे पहायचे, चिखलाकडे नाही. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे, खासदार कोण आहे, याला महत्त्व नाही. काल ए.टी.पाटील होते, उद्या दुसरे कोणी असेल. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात काही संभ्रम, गोंधळ नाही. मतदारांपर्यंत ते हा संदेश व्यवस्थित पोहोचवत आहे. अर्धपन्नाप्रमुख, पन्नाप्रमुख, बुथप्रमुख, विस्तारक अशी आमची रचना आहे, त्यामुळे...
मी त्यांचे वाक्य तोडत संघटनात्मक रचनेच्या चक्रव्युहात न अडकता निरोप घेतला. बाहेर पडल्यावर विचार केला, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली काय? का माझाच काही गोंधळ होत आहे? मोदी हे जरी प्रश्नांची उत्तरे देत नसले तरी या सन्मित्राने किमान उत्तरे तर दिली. आज ती ध्यानात आली नसली तरी २३ मे नंतर उलगडा होऊ शकेल, असे समाधान करुन घेत निवांत झालो.

Web Title: Just look at the lotus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.