फणसासारखा माणूस

By Admin | Updated: February 16, 2015 23:44 IST2015-02-16T23:44:19+5:302015-02-16T23:44:19+5:30

तरुण वयातले आर. आर. जेव्हा आईसमोर गेले तेव्हा आईनं ते रुप पाहिलं आणि छातीशी कवटाळून ती माऊली ओक्साबोक्सी रडली... आईचं ते रडणं त्यांना आतून हलवून गेलं.

Jackass | फणसासारखा माणूस

फणसासारखा माणूस

घरात कोणाचे निधन झाले तर त्यांचे कपडे दान केले जातात. आपल्या वडीलाचे निधन झाल्यानंतर त्यांचेच कपडे घालून तरुण वयातले आर. आर. जेव्हा आईसमोर गेले तेव्हा आईनं ते रुप पाहिलं आणि छातीशी कवटाळून ती माऊली ओक्साबोक्सी रडली... आईचं ते रडणं त्यांना आतून हलवून गेलं. आपण कोणीतरी मोठं झालं पाहिजे, या जाणीवेनं त्यांना झपाटलं. त्याच काळात कॉलेजात भाषणं केल्याने रोख बक्षीस मिळत हे कळाल्यानंतर त्यांनी भाषणांच्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. अशा वातावरणात सुरु झालेला आर.आर. पाटील उर्फ आबांचा प्रवास त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेला.
गृहमंत्री म्हणून त्यांनी पोलीस विभागाचा केलेला अभ्यास टोकाचा होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या होत्या. आर.आर. बैठकीसाठी वर्षावर गेले. विलासराव एकेका अधिकाऱ्याचे नाव घेत होते आणि हातात कोणताही कागद न घेता, हा माणूस नाव घेतलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चांगली वाईट बाजू सांगत होता. त्याने कोठे कोठे, कोणत्या पदावर काम केलं हे देखील सांगत होता. हाच प्रकार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही एकदा घडला तेव्हा अशोकराव देखील त्यांचा हा अभ्यास पाहून थक्क झाले होते. विलासराव आणि अशोक चव्हाण यांच्याशी असणारा मोकळेपणा त्यांना शेवटपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जोडता आला नाही. अनेकदा त्यांनी हे बोलून दाखवलं. वैताग केला, चिडचिड केली मात्र स्वत:ची ठाम भूमिका या माणसाने कधी सोडली नाही. पुण्याच्या आयुक्तपदाची नियुक्ती असो की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची निवड. आपल्या भूमिकांशी ते तुटण्याची वेळ येईपर्यंत ठाम राहीले. मात्र सरतेशेवटी त्यांचेच म्हणणे बरोबर होते हे सिध्द झाले. राकेश मारिया यांची निवड त्यांना करायची होती. त्यासाठी त्यांनी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली आणि मारियांना आयुक्तपदी बसवलेच. टोकाच्या हट्टीपणाचे त्यांनी कधी प्रदर्शन केले नाही पण मनात आलेली गोष्ट पूर्ण होईलपर्यंत कधीही ते थांबलेही नाहीत.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती त्यांना असायची. रोज सकाळी त्यांच्या दिवसाची सुरुवात शरद पवार यांच्या दुरध्वनीने. राज्याच्या सगळ्या घटनांवर दोघे एकमेकांशी बोलायचे. ते गृहमंत्री असताना त्यात एकही दिवस खंड पडला नव्हता.
२६/११ च्या घटनेनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुन्हा मंत्रीपदी निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शरद पवारांकडे हट्ट करुन गृहखाते घेतले होते. त्यानंतर २६/११ मधील नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहाचे दफन केल्यानंतरही जवळपास पाच महिने जे.जे. च्या शवागाराभोवतीची सुरक्षा त्यांनी काढू दिली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्ययात्रेच्या दिवशी दिवसभर ते केंद्रात सुशिलकुमार शिंदे आणि केंद्रीय गृहसचिवांच्या संपर्कात होते. दुसऱ्या दिवशी पुण्यात कसाबला फाशी दिली गेली. त्याचे दफन झाले. मीरा बोरवणकर यांचा एसएमएस आबांच्या मोबाईलवर आला आणि त्यानंतरच त्यांनी ही बातमी माध्यमांना दिली...
डान्सबार बंदीच्या निर्णयासाठी पडद्याआड आपल्या पाठीशी विलासराव कसे खंबीरपणे उभे राहीले याची आठवण ते खूप रंगवून सांगायचे. चवीने खाण्याचे वेड असणारा हा मनस्वी माणूस होता. नॉनव्हेज पदार्थ त्यांच्या आवडीचे. महाराष्ट्रात कोणत्या शहरात, कोणता पदार्थ चांगला मिळतो हे त्यांना चवीसह मुखपाठ होते.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर रात्रीच्या वेळी जाऊन वाळूत बसायला त्यांना प्रचंड आवडायचे. बॉडीगार्ड सोबत न घेता मी त्यांच्यासोबत अनेकदा त्या वाळूत गप्पा मारत बसलो. तेव्हा ते ज्या काही गप्पा मारायचे त्यातून एक वेगळाच माणूस अनुभवयाला यायचा. स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेच्या प्रेमात ते आकंठ बुडाले होते. त्यासाठी कोणता सिनेमा चित्रपट गृहात जाऊन बघायचा हे देखील ते चार वेळा विचार करुन ठरवायचे. एकदा अमिताभ आणि रितेशचा ‘रण’ सिनेमा आम्ही पाहिला. त्यातल्या अमिताभची संपादकाची भूमिका त्यांना एवढी आवडली की त्यांनी थेट अमिताभला तर फोन लावलाच पण त्यांच्या दोन तीन संपादक मित्रांना फोन लावून संपादक असा असला पाहिजे असेही सांगून टाकले होते.
नागनाथअण्णा नाईकवाडी लिलावतीत अ‍ॅडमिट होते. त्यावेळी ते कितीवेळा तेथे गेले असतील याची मोजदादच नाही. शेवटी शेवटी अण्णांना काही बोलताही यायचे नाही. आबा तेथे जाऊन त्यांचा हात हातात घेऊन काही वेळ उभे रहायचे आणि परत यायचे. मोठ्यांबद्दलचा हा आदर एकीकडे होता तर दुसरीकडे त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांवरही त्यांचे टोकाचे प्रेम होते. त्यांचा खाजगी सचिव अनिल महाजन यांच्या चर्चगेट येथील तुषार निवासस्थानी ते जेवायलाही आले. त्याच इमारतीत असणाऱ्या कॅन्टीनमध्ये जाऊनही ते जेवायचे. जेवायला जाताना सेक्यूरिटीवाले सोबत शिट्टी वाजवत येऊ लागले की त्यांना प्रचंड राग यायचा...
एक दिवस आपण राज्याचे मुख्यमंत्री होऊ... आपलं ते स्वप्न आहे... असं ते खाजगीत बोलून दाखवत. आपलं ते स्वप्न आहे असं सांगताना कोणाला बोलू नका बरंका... असा दमही ते द्यायचे... हे स्वप्न सोबत घेऊन ते निघून गेले... हळवा, प्रेमळ, तरीही बारीक खोडी काढून शांतपणे बघत बसण्याची आवड असणारा हा नेता मनस्वी होता... फणसासारखा वरुन काटेरी, टणक पण आतून मऊ... आणि तितकाच रसाळ...
- अतुल कुलकर्णी,
वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई

Web Title: Jackass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.