श्रीगणेशा तर झाला
By Admin | Updated: December 15, 2015 03:47 IST2015-12-15T03:47:39+5:302015-12-15T03:47:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील

श्रीगणेशा तर झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील विविध मंदिरांकडे प्रचंड मोठा सुवर्ण साठा पडून आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खजिन्याची मोजदाद झाली, तेव्हा समोर आलेल्या माहितीने प्रत्येकाचेच डोळे दिपले होते. मोदींनी ‘स्वर्ण भारत’ची घोषणा केली तेव्हा त्यांची नजर या दोन्ही प्रकारच्या सुवर्ण साठ्यांंवर होती. निरुपयोगी स्वरुपात पडून असलेले हे सुवर्ण भंडार देशाच्या कामी यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या आणि देशाच्याही दुर्दैवाने ही अपेक्षा आतापर्यंत तरी पूर्ण झालेली नाही. त्याला सोन्याबाबतची वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मानसिकताच कारणीभूत आहे. परंतु आता साक्षात गणरायाच मोदी आणि सरकारच्या मदतीला धावून आला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने आपल्या खजिन्यातील एकूण १६५ किलो सोन्यापैकी ४० किलो सोने मोदींच्या योजनेत गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराने पुढाकार घेतल्याने आता इतर श्रीमंत देवस्थानांनाही प्रेरणा मिळेल आणि तीदेखील मोदींच्या सहाय्याला धावतील अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरानेही या सरकारी योजनेत सोने गुंतविण्याचे सूतोवाच केले आहे. पण तिरुपती देवस्थानच्या खालोखालच श्रीमंत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिर देवस्थानने मात्र अद्याप तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करुन टाकले आहे. एका अंदाजानुसार भारतीयांकडे सुमारे १७ हजार टन, तर विविध मंदिरांकडे सुमारे तीन हजार टन सुवर्ण साठा पडून आहे. जगातील विविध देशांच्या सरकारांकडील अधिकृत सुवर्ण साठ्यांपैकी सर्वात मोठा, म्हणजे ८,१३३ टन साठा अमेरिकेकडे आहे. यावरून भारतीय लोक आणि हिंदू देवस्थाने किती श्रीमंत आहेत, याची कल्पना यावी. भारतीयांचा सोन्याचा हव्यास पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सुमारे एक हजार टन सोने आयात करावे लागते. देवस्थानांनी मोदींच्या योजनेस चांगला प्रतिसाद दिल्यास ही आयात सुमारे एक-चतुर्थांश कमी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकते. सिद्धिविनायक मंदिराने श्रीगणेशा तर उत्तम केला आहे, शेवटही उत्तमच होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.