आयटी पार्क : महानगरांत नव्हे, छोट्या शहरांत हलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:12 AM2024-03-05T10:12:16+5:302024-03-05T10:27:14+5:30

आयटी पार्क सध्या महानगरांमध्येच विकसित झाले आहेत. हे उद्योग मध्यम व छोट्या शहरांत आल्यास तरुणाईसाठी एक नवे दालन खुले होईल.

IT Park wants to small towns, not metropolises | आयटी पार्क : महानगरांत नव्हे, छोट्या शहरांत हलवा!

आयटी पार्क : महानगरांत नव्हे, छोट्या शहरांत हलवा!

प्रा. डॉ. संदीप ताटेवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती -

भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग सध्याच्या काळात भरघोस पगारासह नोकऱ्या उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीच्या (नॅस्कॉम) अहवालानुसार भारतीय आयटी कंपन्यांचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०२४ अखेरीस २५४ अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. आयटी उद्योगाने अक्षरशः कोट्यवधी भारतीयांना रोजगाराची थेट संधी उपलब्ध करून दिली आहे. 

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील पदवी प्राप्त करून तसेच संगणक क्षेत्रातील बीसीए, एमसीए, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) यासारखे अभ्यासक्रम पूर्ण करून माहिती व तंत्रज्ञान उद्योगात अनेक तरुण नोकरी करीत आहेत. या क्षेत्रात पदोन्नतीची संधी व पगारातील वृद्धीसुद्धा जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण पदवीधर या क्षेत्रात कार्यरत आहेत. टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, पटणी कॉम्प्युटर, इन्फोसिस, पर्सिस्टंट यासारख्या बऱ्याच कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग (आयटी पार्क) बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, पुणे, मुंबई, गुरगाव यांसारख्या महानगरांत स्थापन झाले आहेत. 

या क्षेत्रातील पदवी प्राप्त झालेले तंत्रज्ञ नोकरीनिमित्त महानगरांत स्थायिक होतात. त्यामुळे गावाकडील व लहान शहरातील पालकवर्ग; ज्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या राहत्या शहरात गेले, त्यांना निवृत्तीनंतर मुलाकडे महानगरांत स्थानांतर करावे लागत आहे. हे नागरिक आपले राहते घर, मित्रमंडळी, शेजारी व वर्षानुवर्षांची आपली जीवनशैली सोडून महानगरांतील छोट्याशा फ्लॅटमध्ये काँक्रीटच्या जंगलात, गर्दीच्या ठिकाणी सध्या राहात आहेत. 

आयटी पार्कचा विस्तार केवळ महानगरांतच न करता मध्यम, लहान शहरांतही एमआयडीसीसारख्या ठिकाणी ते स्थापन झाले व तेथेच विस्तारित केले गेले तर तरुणांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या पालकांचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघू शकतो. 

आयटी उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या मुख्य पायाभूत सुविधा म्हणजे हाय स्पीड इंटरनेट, संगणक, इमारती, दळणवळण व्यवस्था, अखंड विद्युतपुरवठा आणि करामध्ये सवलती. यातल्या बऱ्याच गोष्टी सध्या मध्यम, छोट्या शहरांतसुद्धा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर विमानतळाची सोयसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे आयटी पार्क मध्यम, छोट्या शहरांतही उभारले गेले आणि त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न झाले तर जे तरुण आज मोठा खर्च करून नाइलाजास्तव महानगरांत राहात आहेत,  त्यांना आपल्या गावातच किंवा गावाजवळच्या शहरांत आई-वडिलांसोबत राहाता येईल. त्यांची काळजी घेता येईल आणि कमी खर्चात आपला उदरनिर्वाह करता येईल. 

म्हातारपणी मुले सोबत किंवा जवळपास राहिल्यास नातवंडांचे सुख आजी-आजोबांना व आजी-आजोबांचे प्रेम, संस्कार नातवंडांना लाभू शकेल. कुटुंबात दृढ नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकेल. 

महानगरांतील वाढत्या गर्दीवर व प्रदूषणावर यामुळे बऱ्यापैकी नियंत्रण प्राप्त करता येईल. मध्यम शहरांतील इतर उद्योगधंदे वाढीस लागतील. त्यामुळे तिथे रोजगारनिर्मिती होऊन महसूल व आर्थिक सुबत्ता वाढेल. त्याचा पाठपुरवठा राजकीय स्तरावर व सर्वसामान्य जनतेने करणे गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे. यामुळे महानगरांत होणारे स्थानांतर मोठ्या प्रमाणात टाळता येईल. कोरोनाच्या काळात वर्क फ्राॅम होममुळे घरूनच कामे करणे शक्य झाले आहे. त्याचाही फायदा घेता येऊ शकेल. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे.

Web Title: IT Park wants to small towns, not metropolises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.