इसीसचा बंदोबस्त की निर्वासितांचा सांभाळ ?
By Admin | Updated: September 16, 2015 02:28 IST2015-09-16T02:28:43+5:302015-09-16T02:28:43+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅन्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने मध्य आशियात घातलेल्या हिंस्र धुमाकुळाला भ्यालेल्या लक्षावधी स्त्री-पुरुषांनी आपापले देश

इसीसचा बंदोबस्त की निर्वासितांचा सांभाळ ?
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅन्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने मध्य आशियात घातलेल्या हिंस्र धुमाकुळाला भ्यालेल्या लक्षावधी स्त्री-पुरुषांनी आपापले देश सोडून सुरक्षित जागी आश्रय मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जर्मनी, आॅस्ट्रिया, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हिया यासारख्या युरोपीय देशांनी या स्थलांतरितांसाठी उभारलेल्या छावण्या आता भरल्या असून यापुढे त्यांना घेता येणार नाही असे त्यांच्यातील अनेक देशांनी जाहीर केले आहे. युरोपीय देश हे तुलनेने अधिक श्रीमंत आणि पर्यावरणाबाबत विशेष जागरुक आहेत. मध्य आशियातून येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांनी त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्नांएवढे पर्यावरणाचेही प्रश्न उभे केले आहेत. परकीय निर्वासितांना प्रवेश व आश्रय द्यायला जगातील कोणताही देश आज उत्सुक नाही. रशियासारख्या देशाने या निर्वासितांना प्रवेशबंदी केली आहे. इतर युरोपीय देशांनीही त्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्याची तयारी चालविली आहे. आपल्या देशात राहता येत नाही आणि देशाबाहेरच्या जगात जागा नाही अशी या निर्वासितांची दुर्दैवी स्थिती आहे. या निर्वासितांना आणणारी एक बोट भूमध्य समुद्रात उलटल्याने तिच्यातून प्रवास करणारे अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यातल्या एका अल्पवयीन मुलाचे प्रेत वाहत ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्यावर आले. त्या मुलाच्या छायाचित्राने युरोपसह साऱ्या जगातली मानवता जागी केली. या निर्वासितांना मर्यादित स्वरूपाचा का होईना आश्रय देण्याची युरोपीय देशांची तयारी त्यामुळे झाली. मात्र आश्रय देण्याच्या त्यांच्या क्षमतेलाही मर्यादा आहेत. मुळात युरोपीय देशांची लोकसंख्याच कमी. त्यात निर्वासितांच्या अशा लोंढ्यांची भर पडण्याने त्यांचे एकूणच व्यवस्थापन बदलण्याची व बिघडण्याची त्यांना भीती आहे. १९७० च्या सुमारास पाकिस्तान सरकारने तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगला देश) बंगाली भाषिकांचा उठाव मोडून काढण्यासाठी जनरल टिक्काखानाच्या नेतृत्वात मोठी फौज तैनात केली होती. त्या फौजेने ३० लक्ष लोकांचा बळी घेतला तर एक कोटीहून अधिक लोकांना बेघर केले. बेघर झालेल्या या एक कोटी लोकांचा वर्ग सीमापार करून प. बंगाल, आसाम आणि त्रिपुरा या भारतीय राज्यात आला. परिणामी या राज्यांची व्यवस्था तर कोलमडलीच शिवाय एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या निर्वासितांना सांभाळणे व जगवणे याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला ताणही मोठा होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या निर्वासितांच्या लोंढ्यांचे वर्णन ‘नागरी आक्रमण’ असे केले होते. या लोकांना परत पाठविणे वा अडविणे मानवतेत बसणारे नव्हते आणि त्यांना जगवणे देशाच्या क्षमतेबाहेरचे होते. या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी इंदिरा गांधींनी युरोपासह जगातील अनेक देशांना तेव्हा भेटी दिल्या. पुढे त्यातूनच १९७१ चे प्रसिद्ध बांगला देशाच्या स्वातंत्र्याचे युद्ध सुरू झाले. फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने ते युद्ध यशस्वी केले आणि टिक्काखानाचा पराभव करून बांगला देश स्वतंत्र केला. इसीस या संघटनेचा आताचा अत्याचार टिक्काखानी कत्तलींएवढाच भीषण व अंगावर शहारे आणणारा आहे. या संघटनेच्या शस्त्रधारी लोकांनी शेकडोंच्या संख्येने निरपराध लोकांच्या कत्तली केल्या. स्थानिक व विदेशी लोकांची मुंडकी छाटून साऱ्या जगात स्वत:ची दहशत उभी केली. स्त्रियांवर भरचौकात गोळ्या घालून त्यांना आपल्या वचकाखाली आणले. याखेरीज ज्या कशातून आपले भय निर्माण करता येईल ते सारे या संघटनेने धर्माच्या नावाने केले. इराक आणि सिरिया या दोन देशांचा मोठा प्रदेश इसीसने आता आपल्या ताब्यात आणला असून तेथे एका तथाकथित खिलाफतीची स्थापना केली आहे. इस्लामच्या इतिहासात यापूर्वी झालेल्या खिलाफतीचा तिला वारसा आहे असे सांगून तिचा सांधा थेट इस्लामच्या प्राचीन इतिहासाशी जोडण्याचा तिने प्रयत्न केला. या खिलाफतीच्या ताब्यात केवळ मध्य आशिया आणि अरब देशच नव्हे, तर सारे जग आणण्याची इसीसची घोषणा आहे. तिचा आताचा हिंसाचार या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून सुरू झाला आहे. मध्य आशियातील इतर मुस्लीम राष्ट्रे एकत्र येऊन या आक्रमणाचा जोवर बंदोबस्त करीत नाहीत तोवर इसीसच्या भयाने इराक व सिरियामधील लक्षावधी लोक युरोपात येतच राहणार आहेत. असा बंदोबस्त करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न थकले आहेत. आपले लष्कर तेथे उतरवून या हिंसाचाराचा बंदोबस्त करण्याऐवजी ड्रोनच्या हवाई हल्ल्याचा मार्ग त्या देशाने आता स्वीकारला आहे. युरोपातला कोणताही देश इसीसविरुद्ध इंदिरा गांधींसारखी आक्रमक कारवाई करायला तयार नाही. जोवर अरब देशातून व युरोपातून अशा कारवाईची व्यवस्था होत नाही तोवर इसीसचा हिंसाचार बेलगामपणे चालूच राहणार आहे आणि भयग्रस्त लोक जगात आश्रय शोधत हिंडणारच आहेत. या स्थितीत इसीसचा बंदोबस्त वा निर्वासितांचा सांभाळ यातल्या एका पर्यायाची निवड करणे युरोपला (व कदाचित जगातील इतरांनाही) भाग आहे. एक दहशतवादी संघटना धर्माच्या नावावर साऱ्या जगात केवढा उत्पात घडवून आणू शकते याचे हे कमालीचे भयकारी उदाहरण आहे.