बालरंगभूमीला उभारी देणं ही आपलीच जबाबदारी आहे, विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:43 IST2024-12-21T08:42:41+5:302024-12-21T08:43:12+5:30

पुणे येथे सुरू असलेल्या बालरंगभूमी संमेलनात ख्यातनाम रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

it is our responsibility to support children theater do not forget | बालरंगभूमीला उभारी देणं ही आपलीच जबाबदारी आहे, विसरू नका!

बालरंगभूमीला उभारी देणं ही आपलीच जबाबदारी आहे, विसरू नका!

प्रतिभा मतकरी, ख्यातनाम रंगकर्मी

साठच्या दशकातील बालनाट्य चळवळीच्या तुम्ही साक्षीदार आहात, त्या काळाबद्दल काय सांगाल?

- लहान मुलांची भूमिका असलेलं नाटक म्हणजे बालनाट्य या समजुतीला छेद देण्याचं काम सुधा करमरकर आणि रत्नाकरने केलं. सुधा एका शिष्यवृत्तीच्या निमित्त अमेरिकेला गेली होती. तिथे तिने ज्या प्रकारची बालनाट्यं पाहिली तशी भव्यदिव्य नाटकं मराठी रंगभूमीवर यायला हवीत, असं तिला वाटलं. तिच्यासाठी रत्नाकरने लिहिलेल्या अस्सल भारतीय बाजाच्या ‘मधुमंजिरी’  नाटकाने बालनाट्य रंगभूमीला ऊर्जा दिली.

सुधा करमरकरने सुरू केलेल्या ‘लिट्ल थिएटर’तर्फे मी आणि रत्नाकरने ‘कळलाव्या...’ हे नाटक  केलं. त्यानंतर मात्र मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारं नेपथ्य असणारी, त्यांच्या भावविश्वाचे विषय असणारी नाटक करावीत असं आम्ही ठरवलं. ‘बालनाट्य’ या स्वत:च्या संस्थेतर्फे ‘राजकन्येची सावली हरवली’, ‘भामटे आणि कावळे’ आणि ‘एक होता मुलगा’ या तीन नाटिका बसवल्या. पहिल्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचावेत यासाठी मी  शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून या नाटिकांचे प्रयोग करण्याची परवानगी मिळवली.
चिकित्सक, बालमोहन या शाळा आमचे नाट्यप्रयोग करण्यासाठी तयार झाल्या. मुंबईपाठोपाठ आम्ही पुणे, सांगली या शहरात बालनाट्यांचे प्रयोग केले. सुटसुटीत नेपथ्य आणि हॉलच्या भाड्याचा वाचलेला खर्च यामुळे आम्ही केवळ आठ आण्यांत मुलांना नाटकं दाखवू शकलो. त्या दरम्यान आम्ही ‘निम्माशिम्मा राक्षस’ रंगभूमीवर आणलं. ‘गाणारी मैना’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘अदृश्य माणूस’, ‘अलबत्या गलबत्या’ ही आम्ही केलेली नाटकं  प्रौढांच्याही पसंतीला उतरली.

एनएसडीमधल्या नाट्य प्रशिक्षणाचा तुमच्या कामात कसा फायदा झाला? 

नाट्यनिर्मितीच्या बहुतेक सर्व बाजू मी आणि रत्नाकरच सांभाळत असू. त्याला प्रशिक्षणाची जोड असावी असं वाटलं. रत्नाकरची बँकेत नोकरी होती, त्यामुळे मग मी  एनएसडीमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचं असं ठरवलं.  एनएसडीमध्ये मला नाटक या माध्यमाचा सर्वांगीण अभ्यास करता आला. दिल्लीहून परतल्यावर मी ‘धडपडे-बडबडे आणि मारकुटे मंडळी’ या बालनाट्याचं दिग्दर्शन केलं. वेळ पडेल तेव्हा या नाटकात धडपडे बाईंची भूमिकाही केली. ‘झुकझुकभाऊ इंजिनवाले’ हे नाटक लिहिलं.  राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच दुबई, मस्कत आणि अमेरिकेतही जाऊन नाट्य प्रशिक्षणवर्ग घेतले. ‘कास्प प्लॅन’ या संस्थेत काम करत असताना मला वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या समस्यांची जाणीव झाली. या मुलांना आपलंसं वाटेल असं नाटकाचं कथानक असणं गरजेचं होतं. रत्नाकरने त्यासाठी ‘बूटबैंगण’ हे नाटक लिहून दिलं. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मुलांपेक्षा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या वाट्याला येणार आयुष्य वेगळं असतं. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक चळवळ उभी करण्याचं आम्ही ठरवलं. संजय मंगला गोपाळ, हर्षदा बोरकर ही मंडळी आमच्या सोबतीस आली. आज ठाण्यात ‘वंचितांचा रंगमंच’ ही चळवळ जोमाने उभी राहिली आहे. 

बालरंगभूमीत काळानुरूप होत असलेले कोणते बदल तुम्हाला जाणवतात? 

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, एक उत्तम माणूस म्हणून त्यांचा विकास व्हावा, हा बालरंगभूमीचा उद्देश सध्या हरवताना दिसतो आहे.  अल्पकालीन नाट्यशिबिरं, मुलांना सिरीअल, चित्रपटात भूमिका मिळेल अशी दिली जाणारी खोटी आश्वासनं आणि पालकांच्या(च) उपस्थितीत होणारे नाट्यप्रयोग यामुळे बालरंगभूमीचा दर्जा खालावतो आहे.  बालरंगभूमीच्या माध्यमातून मुलांवर संस्कार व्ह्यावेत, यासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. बालरंगभूमीवर सकस आशयाची नाटकं येणं आणि त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळणं ही काळाची गरज आहे.

मुलाखत : डॉ. संतोष पाठारे
santosh_pathare1@yahoo.co.in

 

Web Title: it is our responsibility to support children theater do not forget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक