इस्लामी जगतापलीकडचा धर्मातिरेक
By Admin | Updated: January 21, 2016 03:07 IST2016-01-21T03:07:02+5:302016-01-21T03:07:02+5:30
भारतात अलीकडच्या काळात सहिष्णुता-असहिष्णुता या मुद्द्यांवरून बरंच रण माजवलं गेलं आहे. मात्र हे फक्त भारतात वा इतर ‘विकसनशील’ आशियाई वा आफ्रिकी देशांतच होतं

इस्लामी जगतापलीकडचा धर्मातिरेक
प्रकाश बाळ , (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
भारतात अलीकडच्या काळात सहिष्णुता-असहिष्णुता या मुद्द्यांवरून बरंच रण माजवलं गेलं आहे. मात्र हे फक्त भारतात वा इतर ‘विकसनशील’ आशियाई वा आफ्रिकी देशांतच होतं, असं मानलं जात असतं.
हे कितपत खरं?
प्रत्यक्षात हे विधान बघा.
‘... जगभर काय चाललं आहे, ते तुम्ही बारकाईनं बघितलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, खिश्चन धर्म संकटात आहे. खिश्चनांना घेरलं जात आहे... आम्ही खिश्चनांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत... आम्ही अमेरिकेला पुन्हा बलवान बनवणार आहोत...’
अगदी ‘इस्लाम खतेरे मे’, असा नारा देणाऱ्या कट्टरवादी मुस्लिमांप्रमाणंच हे उद्गार आहेत. पण ते एखाद्या धर्मवेड्या खिश्चन धर्मोपदेशकानं काढलेले नाहीत. हे आहेत अमेरिकेच्या आगामी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवू पाहणारे उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांचे. या आधीच ट्रम्प यांनी मुस्लीम विरोधात प्रक्षोभक भाषणं केली आहेत. मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी जाहीररीत्या केल्यानं - आणि मी अध्यक्ष बनल्यास तसं करीन असं काहीसं गर्भित वक्तव्य केल्यानं मध्यंतरी मोठा गदारोळ उडाला होता.
हे जे वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे, ते ‘लिबर्टी युनिव्हर्सिटी’त. हे विद्यापीठ जेरी फॅलवेल या पुनरुज्जीवनवादी धर्मोपदेशकानं १९७१ला स्थापन केलं. ‘ख्रिस्ताच्या विचारांच्या प्रसारासाठी कट्टर स्वयंसेवकांची फळी उभी करणं, हे या विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे. हे फॅलवेल चित्रवाणी वाहिन्यांवर धर्मोपदेश करीत असत. आपल्या देशातील आस्था, साधना वगैरे वाहिन्याप्रमाणं. फॅलवेल यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे धर्मोपदेशकाचं काम पुढं चालवत आहे. या विद्यापीठात १४ हजार विद्यार्थी आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी ट्रम्प यांचे जे स्पर्धक आहे, त्यातील टेड क्रूझ हे या विद्यापीठात कायम विद्यार्थ्यांशी चर्चा करायला जात असतात. निदान आज तरी हे क्रूझ रिपब्लिकन उमेदवारीच्या स्पर्धेत ट्रम्प यांच्यापेक्षा बरेच मागं आहेत. तरीही ट्रम्प यांना कोणताही धोका पत्करायचा नसल्यानं त्यांनी ‘लिबर्टी युनिव्हर्सिटी’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ... आणि ‘खिश्चन धर्माच्या संरक्षणा’संबंधी आणि ‘अमेरिकेला पुन्हा बलवान बनवण्याबाबत’ ट्रम्प यांनी जी विधानं केली, त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. सध्या विद्यापीठाचे सर्वेसर्वा असलेल्या फॅलवेल यांच्या चिरंजिवांनी असं जाहीर केलं की, ‘ख्रिस्ताप्रमाणं ट्रम्प हे मानवजातीवर प्रेमाची पखरण करीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणं इतरांना मदतीचा हात देण्यास सतत तत्पर असतात’. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी हिलरी क्लिन्टन यांच्या विरोधात उभे असलेले बर्नी सँडर्स यांनीही ट्रम्प यांच्या पाठोपाठ याच विद्यापीठात भाषण केलं. खिश्चन धर्माच्या तत्त्वाचं पालन, ‘अमेरिकी मूल्यव्यवस्थेचं जतन’ आणि त्याद्वारे गौरवर्णीय वर्चस्व कायम राखणं हा अमेरिकेतील निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या जोडीलाच पूर्ण मुक्त अर्थव्यवस्था आणि किमान करआकारणी या दोन मुद्द्याभोवतीही बरंच राजकारण खेळलं जात आलं आहे. ओबामा यांच्या आधी आठ वर्षे अध्यक्ष राहिलेले जॉर्ज बुश आणि त्यांचे उपाध्यक्ष डिक चेनी व संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफिल्ड वगैरे नेते याच विचारांचे होते. गौरवर्णीय वर्चस्ववादी हा बुश यांचा सर्वात मोठा पाठीराखा वर्ग होता. म्हणूनच ९/११ घडल्यावर तासाभराच्या आतच पत्रकारांशी बोलताना बुश यांनी ‘ही तर आता धर्मयुद्धाची सुरुवात झाली आहे’, अशा आशयाचं विधान केलं होतं. मध्ययुगात खिश्चन व इस्लाम या दोन धर्मीयांत जो संघर्ष झाला, तो ‘धर्मयुद्ध’ म्हणून इतिहासात गणला जात आला आहे. बुश यांच्या वक्तव्याचा हा संदर्भ होता. त्याचे विपरीत परिणाम २१व्या शतकातील जगातील राजकारणात होतील, याची जाणीव बुश यांना त्यांच्या सल्लागारांनी करून दिल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली. अशा या गौरवर्र्णीय खिश्चन वर्चस्ववादापायीच इराकवर हल्ले केले गेले. लिबिया अस्थिर करण्यात आला. अलीकडंच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर व लिबियाचे त्या काळातील सर्वेसर्वा मुआम्मर गडाफी यांच्यातील दूरध्वनी संभाषणाचा तपशील ब्रिटिश सरकारनंच जाहीर केला आहे. त्यात ‘तुमच्या अशा धोरणामुळं इस्लामी कट्टरवाद उचल खाईल आणि केवळ लिबियाच नव्हे, तर सर्व पश्चिम आशियाच अस्थिर बनेल’, असा इशारा गडाफी यांनी दिल्याचं उघड झालं आहे. त्यावर ‘तुम्हाला देश सोडून जाण्यास आम्ही मदत करून’, इतकंच आश्वासन ब्लेअर यांनी दिलं. तेव्हा ‘आमचं लोकांना संघर्षासाठी तयार करण्याविना तुम्ही दुसरा काही पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही’, असा निर्वाणीचा इशाला गडाफी यांनी दिला होता.
आज गडाफी यांचा इशाला खरा ठरला आहे.
मात्र हा असा प्रकार अमेरिकेपुरताच मर्यादित राहिलेला नाही. जे परदेशी लोक ब्रिटिश नागरिकांशी लग्न करतील, त्यांना दोन वर्षात इंग्लिश भाषा येणं ब्रिटन सरकारनं एक परिपत्रक काढून बंधनकारक केलं आहे. अन्यथा त्यांना त्याच्या मूळ देशात परत पाठवलं जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडं पश्चिम आशियातून आलेल्या स्थलांतरिताना आश्रय देण्यात गेल्या वर्षापर्यंत आघाडीवर असलेल्या जर्मनीनंही हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे.
या सगळ्या घटना दर्शवतात की, ‘सहिष्णुता-असहिष्णुता’ या संबंंधीच्या घटना जगभरच वाढत चालल्या आहेत. धर्मातिरेकी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. मुस्लीम समाजापलीकडं खिश्चन, ज्यू इत्यादी धर्मीयांतही आणि हिंदूंतही या प्रवृत्ती उफाळून येत आहेत.
...आणि भारताप्रमाणंच त्याचा राजकारणासाठी वापर करण्यात कोणताही विधिनिषेध बाळगला जाताना दिसत नाही. उद्या समजा ट्रम्प अध्यक्ष झाले, तर काय होईल? इस्लामी जगतापलीकडचा हा धर्मातिरेक जगाला कोठे घेऊन जाईल?