भुयारांत पाणी भरून हमासचा तिथेच खात्मा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:39 IST2024-02-03T12:39:11+5:302024-02-03T12:39:20+5:30
Israel-Hamas war: हमासला नेस्तनाबूत करायचं तर आता इस्रायलपुढे शेवटचा एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे हमासची प्रमुख तटबंदी असलेली जमिनीखालची ही भुयारं मुळातून नष्ट करायची. त्यादृष्टीनं आता इस्रायलनं तयारी सुरू केली आहे.

भुयारांत पाणी भरून हमासचा तिथेच खात्मा?
७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस इस्रायल कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी हमासनं इस्रायलवर जवळपास ५००० क्षेपणास्त्रं डागत १२०० नागरिकांना ठार मारलं. या हल्ल्यामुळे इस्रायल मुळापासून हादरला. हल्ला होण्यापूर्वी इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणांना या कानाची खबर त्या कानाला न लागल्यानं इस्रायलची पुरती नामुष्की झाली. त्यांना ते फारच झोंबलं. या हल्ल्याच्या वेदना आणि जखमा त्यांच्या मनातून आता कधीही जाणार नाहीत. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही ही खंत बोलून दाखवली होती. हमासच्या तुलनेत इस्रायलची शक्ती तशी खूपच मोठी, पण तरीही हमासच्या अतिरेक्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांना पकडण्यात इस्रायलला फारसं यश येत नसल्यानं त्यांचा आणखीच तीळपापड झाला आहे.
मुळात हमासला संपवणं एवढं सोपं नाही. कारण गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आपलं नेटवर्क अतिशय मजबूत केलं आहे आणि त्याचा मुख्य आधार आहे तो म्हणजे त्यांनी जमिनीखाली उभारलेली भुयारं. याच भुयारांच्या साथीनं गाझा पट्टीत त्यांनी आपलं वर्चस्व उभारलं आणि त्याच माध्यमातून ते इस्रायलला टक्कर देताहेत. जमिनीखालची ही भुयारं म्हणजे अक्षरशः एक वेगळीच दुनिया आहे. जमिनीवरून आणि अगदी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानंही त्यांचा अंदाज लावणं तसं कठीण, त्यामुळे हमासही इस्रायलला तोडीस तोड उत्तर देत आहे.
हमासला नेस्तनाबूत करायचं तर आता इस्रायलपुढे शेवटचा एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे हमासची प्रमुख तटबंदी असलेली जमिनीखालची ही भुयारं मुळातून नष्ट करायची. त्यादृष्टीनं आता इस्रायलनं तयारी सुरू केली आहे. हमासची ही ताकदच उखडून फेकण्यासाठी इस्रायलनं या भुयारांमध्ये आता समुद्राचं पाणी भरण्याची तयारी सुरू केली आहे.
इस्रायलच्या मते हमासचे शेकडो, हजारो अतिरेकी या भुयारांमध्ये लपून बसले आहेत. त्यात समुद्राचं पाणी भरल्यानंतर केवळ दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतील. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना एकतर या बिळांतून बाहेर यावं लागेल किंवा या भुयारांमध्येच त्यांना स्वतःला जलसमाधी घ्यावी लागेल. त्यांनी पहिला पर्याय स्वीकारला, तर बाहेर पडताच आमचे इस्रायली सैनिक एकतर त्यांचा खात्मा करतील किंवा त्यांना पकडतील. दुसऱ्या पर्यायाची निवड त्यांनी केली, तर आम्हाला काहीच करायचं नाही!..
इस्रायलच्या दृष्टीनं हे स्पेशल ऑपरेशन असून त्यासाठी समुद्राच्या किनारी प्रचंड क्षमतेचे मोठमोठे वॉटर पंप लावण्यात आलेले आहेत. या पंपांच्या माध्यमातून काही तासांत शेकडो गॅलन पाणी या भुयारांमध्ये भरलं जाईल. एका रिपोर्टनुसार काही भुयारांमध्ये समुद्राचं हे पाणी भरण्याचं काम सुरूही झालं आहे. 'आयडीएफ' म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या मते भुयारांमध्ये पाणी भरल्यानंतर तिथला वीज-पाण्याचा सप्लायही आपोआप बंद होईल. हमासच्या अतिरेक्यांना लपण्यासाठी या पृथ्वीतलावर कोणतीही जागा शिल्लक राहणार नाही. ते बाहेर आले की आम्ही त्यांचं अस्तित्व संपवू.
अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार इस्रायलनं पहिल्या टप्यात समुद्राच्या किनारी अत्यंत शक्तिशाली असे पाच पंप लावले आहेत. दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइननं हे पाणी काही भुयारांमध्ये सोडलं जाईल. हमासची काही भुयारंही प्रचंड मोठी, काही किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली असली तरी इतक्या वेगानं समुद्राचं पाणी भुयारांमध्ये सोडलं जाईल की काही तासांत तिथे पूरसदृश स्थिती निर्माण होईल आणि तिथे असलेल्या लोकांना बाहेर पडणंही मुश्कील होईल. 'आयडीएफ'कडे सध्या किमान ८०० भुयारांची इत्थंभूत यादी आहे. ती नष्ट करणं हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट आहे. ही भुयारं बनवण्यासाठी सुमारे सहा हजार टन काँक्रिट आणि १८०० टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. ४० किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद गाझा पट्टीत सध्या सुमारे वीस लाख लोक राहतात. हमासच्या मते भुयारांमधलं त्यांचं अंडरग्राऊंड नेटवर्क ५०० किलोमीटरपेक्षाही अधिक आहे. यातली काही भुयारं तर इस्रायलच्या काही अतिसंवेदनशील ठिकाणांपर्यंतही जातात!.
हमासवाले बोळ्यानं दूध पितात का?
अमेरिकन लष्करी तज्ज्ञ मायकेल क्लार्क यांच्या मते हे काम नक्कीच सोपं नाही. कारण हमासचे अतिरेकी बोळ्यानं दूध पित नाहीत. ओलीस ठेवलेल्या अनेक इस्रायली नागरिकांना त्यांनी या भुयारांतच बंदिस्त करून ठेवलेलं असणार. शिवाय पर्यावरणाचा प्रश्न आणि याच भुयारांच्या माध्यमांतून अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचा पुरवठाही होत असणार, असं झालं तर गाझा पट्टीतले सारे फिल्ट्रेशन प्लाण्ट्सही बंद पडतील आणि सर्वसामान्य माणसांचं जगणंच मुश्कील होईल! असं कसं करता येईल?