IPL 2020 :...अखेरीस, राजाला राजासारखा निरोप मिळावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 02:58 AM2020-10-30T02:58:05+5:302020-10-30T10:10:41+5:30

MS Dhoni News : सचिननंतर जर कुणी एखादा खेळाडू तरुणांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असेल  तर तो धोनी आहे.  त्याची कथा ही अस्स्सल ‘रँगज टू रीचेस स्टोरी’ आहे. कुठे रेल्वे स्टेशनवरचा तिकीट चेकर आणि कुठे दोन वर्ल्डकप जिंकून देणारा भारताचा कर्णधार आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत!

IPL 2020: ... Finally, the king should get a send off like a king !! | IPL 2020 :...अखेरीस, राजाला राजासारखा निरोप मिळावा!!

IPL 2020 :...अखेरीस, राजाला राजासारखा निरोप मिळावा!!

Next

-द्वारकानाथ संझगिरी

अत्यंत जड अंत:करणाने मी हा लेख लिहितोय. पराभूत धोनी पाहताना त्यादिवशी खूपच वाईट वाटत होतं. कारण तसं त्याला कधी फारसं पाहिलेलंच नाही. त्यामुळे धोनीने आयपीएल खेळण्याचा  पुनर्विचार करावा, असं कुठे तरी मनात येऊन गेलं. 

सचिननंतर जर कुणी एखादा खेळाडू तरुणांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असेल  तर तो धोनी आहे.  त्याची कथा ही अस्स्सल ‘रँगज टू रीचेस स्टोरी’ आहे. कुठे रेल्वे स्टेशनवरचा तिकीट चेकर आणि कुठे दोन वर्ल्डकप जिंकून देणारा भारताचा कर्णधार आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत! प्रसंग कितीही बाका असो, बर्फालाही त्याच्याकडून थंडपणा घ्यावासा वाटावा असा थंड. मैदानावर आणि मैदानाबाहेर सहसा वाद-विवाद नाही ! वनडे आणि टी-ट्वेन्टीमध्ये, जागतिक दर्जाचाच नाही, तर ऑलटाइम ग्रेटमध्ये जाऊन बसावा असा परफॉर्मन्स. आणि  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधल्या इतिहासातला तो सर्वोत्कृष्ट कर्णधार. कॅप्टन कुल! अशा  माणसाला त्याच्या आयपीएल खेळण्याबद्दल पुनर्विचार करायला सांगताना मनावर दगड ठेवावा लागतो. 

आयपीएल २०२० मध्ये धोनी हा धोनी वाटलाच नाही. हिंदी चित्रपटाच्या डॉयलॉगच्या स्टाइलमध्ये सांगायचं तर,  ‘कोई बहेरूपीया धोनी की जगह पर खेल रहा था..’ असंच काहीतरी वाटत होतं.  आयुष्यात सर्वोच्च स्थानावर असताना योग्यवेळी कार्य संपवणं हे सर्वांनाच जमत नाही. ते ज्ञानेश्वरांना जमलं.  ते नेल्सन मंडेलांना जमलं. सत्तावीस वर्ष तुरुंगवास ! मग देशाचा अध्यक्ष होणं आणि तहहयात अध्यक्ष राहायची शक्यता असताना निवृत्त होणं.. अखेरीस सर्वसामान्य माणसासारखं निवांत निवृत्त आयुष्य जगणं. सगळंच ग्रेट. 

क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमनबद्दल तसं म्हणता येईल. १९४८ साली सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. त्या ॲशेश सिरीजमध्ये ते एकही काउंटी मॅचसुद्धा हरले नाहीत. पाच कसोटीपैकी चार कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. स्वत: ब्रॅडमनने वयाच्या ४०व्या वर्षी ७२च्या सरासरीने नऊ डावात ५०८ धावा केल्या. त्यात दोन शतकं ठोकली. आणि तरीही निवृत्त झाले. निवृत्त होताना ते शेवटच्या डावात शून्यावर बाद झाले. त्यामुळे त्यांची सरासरी ९९.९४ अशीच झाली. ते भारतीय असते तर ‘खास लोकाग्रहास्तव’ त्यांना आणखी एक कसोटी खेळवून सरासरी १०० करायला लावली असती. ९९.९४च्या कड्यावर आयुष्यभर लटकून राहायला त्यांना दिलं गेलं नसतं. त्यानंतर फार कमी जणांना ते जमलं. 


आता ते जास्त कठीण झालंय. कारण क्रिकेटमध्ये आलेला पैसा आणि पैशाकडे नेणारा प्रकाशझोत. प्रकाशझोत कमी झाला की पैसा कमी होतो. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय फार कठीण होऊन बसला आहे. जे आयपीएल क्रिकेट खेळतात त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया साधारण अशी असते- आधी कसोटीतून निवृत्त व्हायचं,  मग वनडेतून, मग टी-ट्वेन्टीतून आणि शेवटी आयपीएलमधून ! कारण आयपीएलमधून निवृत्त होणं म्हणजे कुबेराच्या दरबारातून निवृत्त होणं. ते कठीण जाणारच. धोनीही त्याच मार्गाने गेला. आधी तो तडकाफडकी कसोटीतून निवृत्त झाला. मग कोविडमुळे त्याला वनडे, टी-ट्वेन्टीतून निवृत्त व्हावं लागलं. आणि मग तो फक्त आयपीएलच खेळला. 

आता पुढे काय?
२०२१च्या मोसमात धोनीच कर्णधार होईल असं चेन्नईच्या सीईओने सांगितलं आहे. अर्थात धोनीची इच्छा असेल तर ती पूर्ण होईलच. कारण शेवटी धोनी हा धोनी आहे. पण धोनीलासुद्धा आता विचार करावा लागेल की त्याचं शरीर त्याला किती साथ देतंय? त्याचे रिफ्लेक्सेस त्याला किती साथ देताहेत? हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसेल तरीसुद्धा धोनीची एक प्रतिमा आपल्या मनात आहे. ती प्रतिमा त्याच्या शेवटच्या दिवसात विस्कटता कामा नये. 

श्रीकृष्णाला कुरुक्षेत्रावरचे हजारो बाण स्पर्श करू शकले नाहीत. शेवटी पारध्याच्या एका बाणाने त्याला सांगितलं,  ‘आता अवतार कार्य संपवायची वेळ आलीय.’ - धोनीसुद्धा त्याच बाणाच्या शोधात असावा.  निवृत्तीचा निर्णय स्वत: धोनीलाच घ्यायचा आहे. माझी एक इच्छा आहे की पुढच्या वर्षी धोनीने आपला  फॉर्म कसा आहे हे आधी पहावं. आणि त्याला खरंच वाटलं की नाही बसं झालं तर मग त्याच आयपीएलमध्ये त्याने एक मॅच निवडावी आणि त्यादिवशी निवृत्त व्हावं. तेसुद्धा सचिन तेंडुलकरप्रमाणे भरलेल्या स्टेडियममध्ये आणि टेलिव्हिजन पाहणाऱ्या करोडो लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले असताना...  राजाला राजासारखा निरोप मिळावा!

Web Title: IPL 2020: ... Finally, the king should get a send off like a king !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.