डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीचे अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:19 AM2018-12-13T04:19:31+5:302018-12-13T04:20:23+5:30

तंत्रवैज्ञानिक पार्श्वभूमी, आयआयटी व आयआयएमचे संस्कार व अर्थशास्त्रातील पीएच.डी. अशी प्रशंसनीय वंशावळ असलेले डॉ. के. सुब्रह्मण्यम् नोटाबंदीचे खंदे समर्थक म्हणून संबंधित परिघात परिचित आहेत.

interpretations of the dr krishnamurthy subramanians appointment as a India's Chief Economic Adviser | डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीचे अन्वयार्थ

डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीचे अन्वयार्थ

Next

- प्रा. डॉ. जे. एफ. पाटील 

भारत सरकारचे (वित्त मंत्रालयाचे) मुख्य आर्थिक सल्लागाराचे स्थान देशाच्या आर्थिक धोरणाची रचना, कार्यवाहीत सर्वोच्च महत्त्वाचे. त्यावर पूर्वी आय. जी. पटेल, मनमोहन सिंग, बिमल जालन, रघुराम राजन, शंकर आचार्य अशानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झालेल्या व्यक्तींनी काम केले आहे. अलीकडेच मुदतपूर्व अरविंद सुब्रह्मण्यम् यांनी राजीनामा देऊन हे पद सोडले होते. त्यामुळे त्यावर कोणाची नियुक्ती होते, ही उत्सुकता होती ती डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीनंतर संपली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला. आधीचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनीही राजीनामा दिला होता. अशा महत्त्वाच्या पदांवरचे तज्ज्ञ राजीनामा का देत आहेत हा चर्चा आणि चिकित्सेचा विषय आहे. आर्थिक धोरण हा लोककल्याणाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा घटक असतो. उत्पन्न निर्मिती, बचत, गुंतवणूक, व्यापार व सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रोजगार हे सर्व आर्थिक धोरणावर अवलंबून असतात. यादृष्टीने मुख्य आर्थिक सल्लागार पदाच्या रिक्त जागेवर कुणाची नियुक्ती होते याकडे जाणकारांचे लक्ष होते.

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम् यांची या पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाल्याचे जाहीर झाले आहे. तंत्रवैज्ञानिक पार्श्वभूमी, आयआयटी व आयआयएमचे संस्कार व अर्थशास्त्रातील पीएच.डी. अशी प्रशंसनीय वंशावळ असलेले डॉ. के. सुब्रह्मण्यम् नोटाबंदीचे खंदे समर्थक म्हणून संबंधित परिघात परिचित आहेत. त्यांच्या उत्तम शैक्षणिक पात्रतेबरोबरच नोटाबंदीचे समर्थन हेही त्यांच्या निवडीला उपकारक असले पाहिजे, असा समज होणे साहजिक आहे. अर्थशास्त्रातील पीएच.डी. त्यांनी शिकागो विद्यापीठाच्या बूथ व्यावसायिक संस्थेतून प्राप्त केली. त्यांचे मार्गदर्शक प्रा. लुसिगी झिंगालेस व विशेष म्हणजे डॉ. रघुराम राजन होते.

मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्तीमध्ये आतापर्यंत शुद्ध शैक्षणिक गुणवत्ता व कार्यक्षमता हेच निकष सर्व सत्ताधारी पक्षांनी वापरल्याचे दिसते; पण या वेळी त्या निकषांबरोबर वैचारिक कलाचाही विचार झालेला दिसतो. डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम् शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत असाधारण पात्रतेचे आहेत याचा पुरावा त्यांना त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी अमेरिकेतील एक ख्यातनाम येविंग मेरिअन कॉफमन शिष्यवृत्ती मिळाली यातून सिद्ध होतो. उच्च शिक्षणानंतर गेली अनेक वर्षे ते हैदराबाद येथील इंडियन स्कूल आॅफ बिझनेस येथे अध्यापन, संशोधन मार्गदर्शनाचे काम करीत आहेत. सेबी व रिझर्व्ह बँकेच्या अनेक अभ्यास समित्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. निगम व्यवस्थापन व बँक व्यवस्थापन हे त्यांच्या अभ्यासाचे महत्त्वाचे घटक आहेत. ते सेबीच्या अनेक स्थायी समितीचे (पर्यायी गुंतवणूक धोरण, प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार व संशोधन इ.) तसेच बंधन बँकेचे संचालकही आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटचे व रिझर्व्ह बँक अकॅडमीचे अध्यापकही आहेत. मुख्य आर्थिक सल्लागाराचे दरवर्षी पूर्ण करावे लागणारे एक, अर्थव्यवस्था व आर्थिक धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम म्हणजे वार्षिक आर्थिक सर्वेक्षण तयार करणे. वित्तीय सुधारणांचे समर्थक असलेले डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम् देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आगामी सार्वत्रिक निवडणुकापूर्वी नेमले जातात या गोष्टीचे अनेक अन्वयार्थ लागू शकतात; पण त्यातून प्रचलित सरकारचा राजकीय विचार ओघाने व्यक्त होतो. सुदैवाची बाब अशी की, त्यांची वैचारिक जडणघडण शिक्षकाची व शिक्षकामुळे झालेली आहे. डॉ. रघुराम राजन यांसारख्यांचे संस्कार त्यांच्यावर आहेत. व्यक्ती विचार स्वातंत्र्याचे मूल्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या शिकागो विद्यापीठ व बुथ स्कूल ऑफ बिझनेसचे ते फलित आहेत. या अर्थाने त्यांच्या निवडीचे स्वागत करणे योग्य ठरेल.

(लेखक जेष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत)

Web Title: interpretations of the dr krishnamurthy subramanians appointment as a India's Chief Economic Adviser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.