प्रेरणांचा शोध

By Admin | Updated: February 16, 2015 23:46 IST2015-02-16T23:46:10+5:302015-02-16T23:46:10+5:30

स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या व इतरांच्याही आयुष्यात काही वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे ‘सेवांकुर’ हे मुक्त व्यासपीठ.

Inspiration research | प्रेरणांचा शोध

प्रेरणांचा शोध

स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या व इतरांच्याही आयुष्यात काही वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे ‘सेवांकुर’ हे मुक्त व्यासपीठ. अमरावतीच्या ‘प्रयास’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दहा वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली. समाजातील सेवाभावी माणसांचा शोध घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आयुष्याची पुढील वाटचाल करण्याचा वसा ‘सेवांकुर’ने घेतला आहे. सेवांकुरचे हे ध्येयवेडे तरुण दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी बाबा आमट्यांच्या आनंदवनात एकत्र येतात. अधेमधे ते सेवाग्रामला तर कधी तपोवनात भेटतात. सेवांकुरचा ‘आम्ही बिघडलो-तुम्ही बी घडाना’ हा असाच एक प्रेरणादायी संवादाचा मासिक उपक्रम. विविध क्षेत्रांतील प्रेरणांचा शोध या उपक्रमाच्या माध्यमातून घेण्यात येत असतो.
लातूरजवळ हासेगाव नावाचे खेडे आहे. या गावालगतच्या माळरानावर एड्सग्रस्त मुलांचा ‘सेवालय’ हा आश्रम आहे. सेवालयात सध्या ६३ एड्सग्रस्त मुले आहेत. बहिष्कार, हेटाळणी अशा संकटातून मार्ग काढत कधी काळी पत्रकार असलेला रवि बापटले या मुलांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा प्रयत्न करतो. मुलांना सोबत घेऊन एका झोपडीत रविने सेवालय सुरू केले. ही नवी ब्याद गावात कुठून आली? असे म्हणून काही समाजकंटकांनी रविच्या मुलांची झोपडी जाळली. ही मुले शाळेत जाऊ लागली तेव्हा याच समाजकंटकांनी आपली मुले शाळेत पाठविण्यास नकार दिला. या गोष्टींची रविला आता सवय झाली आहे. चांगले काम सुरू केले की असे होणारंच. रवि निराश होत नाही. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की त्याच्या वेदनेची फुले होतात. बीड जिल्ह्यातील गेवराईचा संतोष नारायण गर्जे हा २९ वर्षांचा तरुण ४० अनाथ मुला-मुलींचा बाप आहे. वडील एके दिवशी कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. संतोषला हे अनाथपण जाणवू लागले. बहीण आजारात गेली. भाचा अनाथ झाला. संतोषने त्याला पोटाशी धरले. अशीच सात अनाथ मुले सावली शोधत त्याच्याकडे आली. एका शेतात शेड घालून या अनाथ मुलांसोबत संतोषने नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता गेवराईनजीक तीन कि.मी. अंतरावर बालग्राम प्रकल्पात ही मुले त्याच्यासोबत राहतात. एक मुलगा यावर्षी इंजिनिअरिंगला पुण्याला गेला. मुलांच्या शिक्षणासाठी, रोजच्या गरजांसाठी संतोषला दारोदार भटकावे लागते. अनेकदा रिकाम्या हाताने आणि निराश मनाने संतोष घरी परततो.
अहमदनगरचे राजेंद्र आणि सुचिता धामणे हे डॉक्टर दांपत्य. एकदा नगर-शिर्डी मार्गावरून जाताना रस्त्यावर एक मनोरुग्ण महिला उकिरड्यावर विष्ठा खाताना त्यांना दिसली. धामणे दांपत्य अस्वस्थ झाले, घरी परतले, स्वयंपाक केला आणि पुन्हा परत जाऊन त्या महिलेला जेवू घातले. ही अस्वस्थता इथेच संपणारी नव्हती. समाजात अशा निराश्रित मनोरुग्ण महिला खूप असतील. त्या कशा जगत असतील, प्रश्नांचे काहूर सुरू झाले. दुसऱ्या दिवसापासून घरी स्वयंपाक करून रस्त्यावर भटकणाऱ्या अशा अनाथांना ते जेवू घालू लागले. या महिलांना हक्काचे एक घर असावे, असा विचार पुढे आला आणि त्यातूनच ‘इंद्रधनू’हा प्रकल्प आकारास आला. आज इथे ६५ मनोरुग्ण महिला राहतात.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या मधुकर धस या निर्लेप कार्यकर्त्याच्या सेवाभावाची कथाही अशीच. या माणसाने पाणी आणि शेतीसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. सात हजार हेक्टर जमिनीवर जल व मृदसंधारणाची कामे आणि नऊ हजार एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्याचे काम मधुकररावांनी केले आहे. त्यांनी ९८ डोह बंधारे बांधली आणि अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. हजारांपेक्षा अधिक गावांत चार हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून ५० हजार महिलांचे संघटन बांधले आणि त्यांना मागच्या वर्षी १९ कोटींचे कर्ज बँकांकडून मिळवूनही दिले. अशा कितीतरी सेवाभावी माणसांचे आभाळाएवढे काम विदर्भातील तरुणाई ‘सेवांकुर’च्या माध्यमातून सध्या समजून घेत आहे. एरवी ही माणसे कुठल्या तरी कोपऱ्यात आपले काम व्रतस्थपणे करीत असतात. या कामाची माध्यमांनी दखल घ्यावी यासाठी ते खटपटी करीत नाहीत आणि सूट-मफलरात अडकलेल्या कॅमेऱ्यांचे झोतही त्यांच्या कामावर पडत नाहीत.
- गजानन जानभोर

Web Title: Inspiration research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.