भारत-अमेरिका सहकार्य : ‘एक और एक ग्यारह’!
By Admin | Updated: April 8, 2016 02:41 IST2016-04-08T02:41:43+5:302016-04-08T02:41:43+5:30
भारत आणि अमेरिकेदरम्यानची विकास कार्यातील भागीदारी कित्येक दशके जुनी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पासून ते भारतातल्या भांडवली बाजारापर्यंत हा भागीदारीचा वारसा राहिला आहे

भारत-अमेरिका सहकार्य : ‘एक और एक ग्यारह’!
जोनाथन अॅडल्टन, (वाणिज्य दूत, अमेरिकन दूतावास, मुंबई)
भारत आणि अमेरिकेदरम्यानची विकास कार्यातील भागीदारी कित्येक दशके जुनी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पासून ते भारतातल्या भांडवली बाजारापर्यंत हा भागीदारीचा वारसा राहिला आहे. या आधी ही भागीदारी पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात होती तर याच भागीदारीमुळे भारतात हरित क्रांती आणणे शक्य झाले होते. अमेरिकेच्या एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटला (युएसएड) गत काळातील या भागीदारीचा सार्थ अभिमान वाटतो. पण त्याचवेळी आम्हाला असे वाटते की मधल्या काही वर्षात, भारतात, अमेरिकेत आणि युएसएडमध्ये बरेच बदल झाले आहेत. भारत सध्या ओळखला जातो तो तेथील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी गोष्टींमुळे, या गोष्टी विकासासाठी आव्हान ठरणाऱ्या घटकांना पर्याय ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर युएसएड भारतात नवीन उपक्रम आणि भागीदारीवर भर देत आहे. भर म्हणजे युएसएडचे अधिकाधिक कार्यक्रम भारत आणि अमेरिकेने एकत्रित काम करण्याविषयीचे आहेत. भारत आणि अमेरिकेचे हे एकत्रित कार्यक्रम जागतिक पातळीवर विकासाची व्यापक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आहेत. आम्ही या आधी भागीदारीतून जे उपक्र म हाती घेतले होते ते आम्ही इतर देशांसोबतसुद्धा वाटून घेतले आहेत. भारतातील माझ्या सुरुवातीच्या काही महिन्यात मला जागतिक पातळीवरील विविध विषयांवरच्या कामांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. मागील वर्षी उझबेकिस्तानमधून काही व्यापारी, शेतकरी आणि सरकारी अधिकारी भारत भेटीवर आले असता आम्ही त्यांना या भेटीसाठी मदत केली होती. या भेटीचा उद्देश फळ उत्पादन वाढवणे आणि त्यासाठी नवी बाजारपेठ शोधण्याचा होता. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही केनियातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची अशीच भारतभेट घडवून आणली होती. अशा कार्यक्रमांमधून आम्हाला चांगला परिणामही दिसत आहे. उदाहरणार्थ केनियातील दूध उत्पादनाच्या क्षेत्रात भारतीयांच्या अनुभवांचा वापर करून अनेक ठिकाणचे दूध उत्पादन ५० टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षीही आम्ही भारताबाहेरील तब्बल नव्वद हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून त्यातले काही नेपाळ, केनिया आणि मलावी या देशांमधील शेतकरी असतील. भारतातील कृषी क्षेत्रात सुरु असलेल्या नवीन गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी तिथले कृषी उत्पादन वाढवावे हा त्यामागील उद्देश असणार आहे.
मी अनेक वेळा अफगाणिस्तानातून आलेल्या शिष्टमंडळांची भेट घेतली आहे. त्यांना भारताकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याची इच्छा आहे. त्यांच्यातल्या एका गटाने केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करून तेथील आरोग्यसेवांचा अभ्यास केला तर दुसऱ्या गटाने अन्न सुरक्षा संबंधात दौरा पूर्ण केला आहे. अलीकडेच अफगाणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका गटाने भारत भेटीत आर्थिक समावेशनाचा अभ्यास पूर्ण केला आहे.
गुजरातमधील सेल्फ एम्प्लॉईड विमेन्स असोसिएशन (सेवा) ही संस्था शेकडो अफगाणी महिलांना भारतात आणि अफगाणिस्तानात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. आम्हाला त्यांच्यासोबत असलेल्या भागीदारीचा अभिमान आहे. याच प्रमाणे दिल्लीतील ‘नॅशनल पॉवर ट्रेनिंग सेंटर’ ही संस्था युएसएडचीे आणखी एक सहयोगी आहे. या संस्थेत अभियांत्रिकी विकासाचे कार्यक्रम राबविले जातात. इथे अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांगला देशातील अभियंते कार्यरत आहेत. भारत सरकारच्या सोबत युएसएड हैदराबादेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅग्रीकल्चर एक्स्टेन्शन मॅनेजमेन्ट’ आणि जयपूर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅग्र्रीकल्चर मॅनेजमेन्ट’ येथे आफ्रिकेतील अनेक देशांच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात मलावी, लायबेरीया आणि केनियातील विद्यार्थ्यांचासुद्धा सहभाग होता. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात आता आफ्रिका आणि आशिया खंडातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानाचे फलित असे की २०० पेक्षा अधिक लोकांनी भारतातील या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.
अशा कार्यक्रमातून भारतातील विकास कार्यातले अनुभव जागतिक स्तरावर नेण्यात युएसएडचे असलेले स्वारस्य प्रतीत होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही दोन प्रकल्प तयार केले आहेत. पहिला प्रकल्प आरोग्य व्यवस्थेशी संबंधित आहे तर दुसरा कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. आमचे भारतातले सहयोगी भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) यांनी आम्हाला त्यांची बहुमोल यंत्रणा देऊ केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून भारतात आणि भारताबाहेर चालणाऱ्या आमच्या प्रकल्पांना निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पांमध्ये सौर पंपापासून ते मोबाइल अॅप्लिकेशनचा समावेश असणार आहे. मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आणि आरोग्यसेवकांना महत्वाची आरोग्यविषयक माहिती नियमित पुरवण्याची व्यवस्था केली जाईल.
मी भारतात येऊन काहीच दिवस झाले होते, तेव्हा एकदा दिल्लीतल्या एका दुर्मिळ वस्तुंच्या दुकानात गेलो होतो. तिथे मी चित्रपट दिग्दर्शक अनुप शर्मा यांच्या २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक और एक ग्यारह’ या हिंदी चित्रपटाचे पोस्टर बघितले होते. त्या चित्रपटाचे नाव ‘एक और एक ग्यारह’ या प्रसिद्ध हिंदी वाकप्रचारावरुन घेतले होते. त्याचा अर्थ एक अधिक एक म्हणजे दोन नव्हे, तर एक आणि एक म्हणजे अकरा असा होता.
काही महिन्यानंतर मला ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. कारण त्या शब्दांचा प्रत्यय युएसएड आणि भारतामध्ये असणाऱ्या भागीदारीतून, जागतिक मुद्यांवर चालणाऱ्या कामातून येत होता. एकत्र काम केल्याने कार्याची व्याप्ती नक्कीच कित्येक पटीने वाढत असते. जेव्हा भारत आणि अमेरिका एकत्र येऊन चांगल्या उद्देशाने काम करतात तेव्हा ते जागतिक समाजाला चांगल्या दिशेकडे घेऊन जाऊ शकतात.