भारताचा चीनशी केवळ सीमावाद नव्हे, तर संस्कृतीचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:35 IST2020-07-10T04:08:18+5:302020-07-10T07:35:22+5:30
भारत व चीन ही केवळ दोन राष्ट्रे नाहीत, तर त्या जगातील दोन सर्वांत जुन्या व मोठ्या दोन भिन्न संस्कृती आहेत. याचाच अर्थ असा की, या दोन्ही देशांच्या चारित्र्याची जडणघडण इतिहासात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांतून झाली आहे. काळाच्या ओघात या दोन संस्कृतींचा रोख कुठेतरी बदलला असावा. सध्याचा संघर्ष हे त्याचेच द्योतक आहे.

भारताचा चीनशी केवळ सीमावाद नव्हे, तर संस्कृतीचा संघर्ष
- जवाहर सिरकार
(केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे
निवृत्त सचिव व 'प्रसार भारती'चे
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी)
भारत  आणि चीन या जगातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या दोन देशांचे सैन्य सीमेवर परस्परांना भिडलेले असताना, या दोन शेजारी देशांमध्ये एवढे वितुष्ट असण्याचे मूळ कारण पाहणे गरजेचे आहे. बौद्ध धर्म ही भारताने चीनला दिलेली भेट आहे, याचा दोन्ही देशांना अभिमान आहे व प्राचीन काळी भारतात आलेल्या चिनी साधूंना दोघेही पूज्य मानतात, तर मग आताच एवढे वैर का बरं असावे? यासाठी आपल्याला प्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की, भारत व चीन ही केवळ दोन राष्ट्रे नाहीत, तर त्या जगातील दोन सर्वांत जुन्या व मोठ्या दोन भिन्न संस्कृती आहेत. याचाच अर्थ असा की, या दोन्ही देशांच्या चारित्र्याची जडणघडण इतिहासात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांतून झाली आहे. काळाच्या ओघात या दोन संस्कृतींचा रोख कुठेतरी बदलला असावा. सध्याचा संघर्ष हे त्याचेच द्योतक आहे.
ऐतिहासिक घटना व तथ्यांचा खोलवर धांडोळा घेतला तर  दोन्ही देशांचे मार्ग, परत एकत्र न येण्याइतके, कसे व कधी भिन्न झाले हे आपल्याला सहज दिसू शकेल. या दोन्ही उपखंडांच्या भावी वाटचालीची दिशा इसवी सन पूर्व २६० ते २३० या काळात ठामपणे ठरली; पण या कालखंडाचे फारसे उल्लेख इतिहासात आढळू नयेत, हे विचित्र आहे. भारतात इसवी सन पूर्व २६९ ते २३२ या काळात महान सम्राट अशोकाचे राज्य होते, तर चीनचा पहिला सम्राट चीन शी हुआंग याचा कालखंड इसवी सन पूर्व २४६ ते २१० असा होता. म्हणजे या दोघांच्या कालखंडात काही दशके सामायिक होती. ही दोन्ही साम्राज्ये परस्परांपासून खूप दूरवर होती. राष्ट्राची संकल्पना, शासक व प्रजेतील नाते, शासनव्यवस्था अशा अनेक बाबतीत दोघांचेही  विचार वेगळे होते.
श्रीलंकेतील बौद्ध साहित्यातील नोंदी पाहिल्या तर सम्राट अशोक सुरुवातीच्या काळात खूप आक्रमक होता; पण इसवी सन पूर्व २६० मध्ये झालेल्या कलिंग युद्धानंतर तो शांततेचा दूत बनला, असे दिसते. दुसरीकडे अनेक लढायांमधील रक्तपातानंतर चीन चिनी जनतेला एका छत्राखाली आणणारा थोर शासक म्हणून उदयास आला होता. त्याची तलवार जणू कायम रक्ताने निथळत  असे. त्याच्यावरून देशाला ‘चीन’ हे नाव पडले. त्यानेच अनेक स्थानिक भिन्नता दूर करून संपूर्ण चिनी समाजासाठी लेखनाची एकच लिपी प्रचलित केली.
याच कालखंडात चीन व भारताच्या वेगळ्या दिशेने मार्गक्रमणास सुरुवात झाली, असे म्हणता येईल. चीनच्या सम्राटाने तलवारीच्या जोरावर एकजिनसी समाज स्थापन केला, तर इकडे भारतात सम्राट अशोकाने विविध समाजांमधील वेगळेपणा जोपासण्यास प्रोत्साहन दिले. सम्राट अशोकाने त्याच्या साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात ३० हून अधिक दगडी शिलालेख कोरून घेतले. त्यात प्राकृत, ग्रीक व अरामाईक या त्यावेळच्या प्रचलित भिन्न भाषा ब्राह्मी ते खरोष्टी अशा निरनिराळ्या लिपींमध्ये लिहिलेल्या दिसतात. एवढेच नव्हे, तर सम्राट अशोकाने शिलालेखांतील मजकूर लिहिताना स्थानिक जनतेच्या भावना व श्रद्धेचीही कदर केली. 
चीनमध्ये प्राचीन काळी भाषा व संस्कृतीच्या बाबतीत स्थानिक विविधतेला वाव नव्हता व आताच्या काळात तर त्याला जराही थारा नाही. संपूर्ण देशात एकच भाषा व एकच लिपी असायला हवी, याविषयी चीन नेहमीच आग्रही राहिला आहे. २२ प्रमुख भाषा, डझनावारी अन्य भाषा व ६०० हून अधिक बोलीभाषा असलेला भारत एक राष्ट्र कसे काय असू शकतो, याचा चीनला अचंबा वाटतो. चीनने ही समानता इतरही अनेक बाबतीत फार पूर्वीपासून सक्तीने आणली. सरकारी फतवा न पाळता स्वत:चे वेगळेपणा जपू पाहणाऱ्यांची चीनमध्ये आजही गय केली जात नाही. याउलट सम्राट अशोकाने ‘दया, त्याग, सचोटी, शुचिता, मार्दव आणि नैतिकता’ यावर भर देणाºया धम्माचे आचरण व प्रसार केला. त्याच्या क्र. ७ च्या स्तंभ शिलालेखात त्याने त्याचे हे विचार स्पष्टपणे नोंदविले आहेत.
चीनमध्ये माणसांनी खाण्यासाठीच्या अशा चित्रविचित्र प्राण्यांचे बाजार ‘वेट मार्केट’ म्हणून ओळखले जातात. ‘कोविड-१९’ महामारीच्या निमित्ताने चीनच्या वुहान शहरातील असाच मांसासाठी मारल्या जाणा-या प्राण्यांचा बाजार जगभर चर्चेत आला. तेथे वटवाघूळ, डुकरे, उंदीर, घुशी, साप, बेडूक, पॅन्गोलिन याखेरीज इतरही अनेक डझन प्राण्यांचे ताजे मांस ग्राहकांसमक्ष कापून विकले जाते. एका सर्वेक्षणानुसार १८७ प्रकारचे कीटकही चिनी लोक आवडीने खातात व रस्तोरस्ती गाड्यांवर अशा ‘लज्जतदार’ डिशेस विकल्या जातात. यात झुरळे, मधमाश्या, गांडुळ, टोळ, विंचू, शेणकिडे, गवतीकिडे, मोठ्या माश्या, आदींचा समावेश असतो. 
सांगायचा मुख्य मुद्दा असा की, भारतात मांसाहार करणा-यांमध्येही सजीवांविषयीची जी उपजत भूतदया दिसते, तिचा लवलेशही चीनमध्ये आढळत नाही. भारताने कधीही दुस-या देशावर आक्रमण न केल्याचा आपण अभिमान बाळगतो; पण चीनला त्याच्या निरंतर आक्रमकतेचा अभिमान आहे. प्राचीन संस्कृतीतून मनात मुरलेल्या सर्वच मूल्यांचे आपण नित्यनेमाने पालन करतोच असे नाही; पण जेव्हा केव्हा त्यांचे उल्लंघन होते, तेव्हा भारतीय मनाला अपराधीपणाची बोच लागून राहते. सर्वच बाबतीत काही मूलभूत विधिनिषेध पाळणे आपल्या रक्तातच भिनलेले आहे. भारतीय आहार संस्कृतीतही त्याचेच प्रतिबिंब दिसते; पण चीनच्या रूपाने संयम हा दुबळेपणा मानण्याची संस्कृती असलेल्या शेजाºयाशी आपली गाठ पडली आहे. मात्र, शेजारी देश आणि त्यांची संस्कृती या निवडता येणाºया गोष्टी नसल्याने त्यांचा स्वभाव व संस्कृती समजून घेऊन त्याप्रमाणे पावले टाकणे एवढेच आपण करू शकतो.

