- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजप, राज्यसभा सदस्यदोनच दिवसांपूर्वी ‘नागरी सेवा दिन’ साजरा झाला. लोकशाही शासन व्यवस्थेत प्रशासन ही निरंतर चालणारी यंत्रणा असते. मंत्री, मुख्यमंत्री बदलतात; पण सरकारी अधिकारी कायम राहतात. त्यामुळेच अनेकदा खरी, टिकाऊ आणि दीर्घकालीन सत्ता ही निर्वाचित लोकप्रतिनिधींपेक्षा सरकारी ‘बाबूं’च्या हातीच असते, अशा आशयाची चर्चा अनेकदा घडताना बघतो.काही दिवसांपूर्वी ‘येस मिनिस्टर’ मालिका प्रकाशित होत असे. मालिकेचा आशय तिच्या शीर्षकात जे सूचन आहे, त्याच्या बरोबर उलटा म्हणजे विपरीत होता. वरवर नोकरशहा ‘येस मिनिस्टर..!’ म्हणत मंत्र्यांची हांजी, हांजी करताना दिसत असले तरी प्रत्यक्षात मंत्रीच नोकरशहांचे ऐकताना वा त्यांच्या तालावर नाचताना दिसतात, अशा आशयाचा संदेश या मालिकेतून दिला गेला. जिन हकर नावाच्या ब्रिटिश मंत्र्याला त्याच्या प्रशासनिक व्यवहार खात्यात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची इच्छा असते; पण अशा परिवर्तनाचे त्याचे प्रयत्न त्या खात्याचे कायम सचिव सर हम्फ्रे अॅपलबी कसे हाणून पाडतात त्याचे मार्मिक चित्रण ‘येस मिनिस्टर!’ मालिकेत आहे. सरकारी बाबू कसा यथास्थितीवादी असतो, त्यावर मालिका प्रकाश टाकते. यात निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या मर्यादा, सरकारी बाबूंचे अंतर्गत राजकारण व वरवर पाहता मंत्रिमहोदयांची आज्ञा झेलण्याच्या आविर्भावात वावरणारी नोकरशाही प्रत्यक्षात असे घोडे पुढे दामटते, त्याचे चित्रण यात येते!भारताने ब्रिटिश लोकशाहीचे प्रतिमान जवळपास ‘जसेच्या तसे’ स्वीकारले, तशीच प्रशासन शाहीची चौकटही स्वीकारली. स्वातंत्र्योत्तर काळात इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे नामाभिधान इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस झाले खरे; पण मूळ ढाच्यात आमूलाग्र असे परिवर्तन घडून येणे दूरच राहिले. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे ‘गोरे इंग्रज गेले, पण काळे इंग्रज अजूनही आहेतच’ असे जे म्हटले जात असे, त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक होते न बदललेला ‘सरकारी खाक्या’! हा खाक्या या प्रकारे मागच्या पानावरून पुढे चालू राहण्यामागे अनेक कारणे होती, आजही बरीच आहेतच. त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविषयीचा अविश्वास व अश्रद्धा! निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे औपचारिक दृष्टीने नोकरशाहीचे नियंत्रक म्हणजे वरिष्ठ वा ‘बॉस’! पण वरिष्ठता बऱ्याचदा निखळ औपचारिकच राहिल्यामुळे तिचा ना दबदबा निर्माण झाला, ना तिच्याबद्दलची प्रामाणिक आदराची भावना! वरिष्ठांचे दडपण नुसते औपचारिक असेल तर त्यात भीती जास्त असते. राजकीय नेतृत्वाचे पाय किती मातीचे आहेत व त्यांची देशहिताची कळकळ किती वरवरची आहे हे नोकरशाहीच्या जसजसे लक्षात येत गेले, तशी भीतीची भावनाही देखाव्यापुरती उरली. नेमक्या याच टप्प्यावर नोकरशाही व निर्वाचित नेतृत्वात अनारोग्यकारक हातमिळवणी झाली. निवडून येणारे नेते ऱ्हस्व दृष्टीचा व क्षुद्र विचार करतात, तेव्हा बऱ्याचदा ते असुरक्षिततेने ग्रासलेले असतात. नोकरशहा हे जाणून असतात आणि ते त्यांना अशा भासमान किंवा वास्तविक असुरक्षिततेतून मुक्तीसाठी संयुक्त आर्थिक हितसंबंधांचे कवच निर्माण करून देतात. अशा स्थितीत नोकरशहा व राजकीय नेतृत्व यांच्यात कोण कोणाचा चतुराईने उपयोग करून घेतो त्यावर दोघांचेही भवितव्य ठरते. या उलाढालीत प्रशासनिक अधिकारी आपली व्यवसायनिष्ठता गमावतो व राजकीय नेता मूल्यनिष्ठा! ‘जनतेचे कल्याण’चा विषय या गदारोळात पिछाडीवर जाणे क्रमप्राप्तच होते.
नागरी सेवा : ‘सरकारी खाक्या’च्या पलीकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:27 IST