कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
By अतुल कुलकर्णी | Updated: December 15, 2025 07:32 IST2025-12-15T07:31:06+5:302025-12-15T07:32:14+5:30
विधानसभेत चांगले काम करणाऱ्यांना महापालिकेत तिकीट देऊ असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा नेते, नेत्यांच्या बायका, मुलं, भाऊ, वहिनी यांनाच संधी मिळणार असेल तर आम्ही करायचे तरी काय? अशा भावना सार्वत्रिक आहेत.

कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
आठ डिसेंबर रोजी याच कॉलममध्ये महापालिका निवडणुकीत बड्या नेत्यांच्या नातेवाइकांची निवडणूक लढवण्याची इच्छाशक्ती कार्यकर्त्यांना मारून टाकते. कार्यकर्त्यांची अवस्था कढीपत्त्यासारखी झाल्याचे लिहिले होते. त्यावर, आमच्या भावनांना 'लोकमत'ने वाट करून दिली असे सांगणारे अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. इतकी वर्ष मेहनत करूनही वॉर्डामध्ये कसा अन्याय होतो याच्या करुण कहाण्या त्यांनी सांगितल्या. आणखी किती वर्ष आम्ही कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या? आमचे आणखी किती आयुष्य नेत्यांच्या दिवाळीला आकाशदिवे करण्यातच घालवायचे? आमच्या दिवाळीला नेतेमंडळी किमान लवंगी फटाके तरी उडवतील का? असे सवाल कार्यकर्ते करत होते. लोकसभा, विधानसभेला वेगवेगळी कारणे सांगितली गेली. विधानसभेत चांगले काम करणाऱ्यांना महापालिकेत तिकीट देऊ असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा नेते, नेत्यांच्या बायका, मुलं, भाऊ, वहिनी यांनाच संधी मिळणार असेल तर आम्ही करायचे तरी काय? अशा भावना सार्वत्रिक आहेत.
नगरसेवक, आमदारकी मिळालेल्यांनाही आता पुन्हा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदाचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे नेते अशोक जाधव तीनवेळा नगरसेवक, दोनवेळा आमदार होते. भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम यांनी त्यांचा पराभव केला. त्यांची कन्या अर्पिता नगरसेविका होत्या. आता त्यांच्या जागी अशोक जाधव नगरसेवक होण्यासाठी पुन्हा इच्छुक असल्याचे वृत्त आहे. अमित साटम मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू समीर साटम यांना नगरसेवक व्हावे वाटत आहे. वॉर्ड ७५ मध्ये उद्धवसेनेचे प्रमोद सावंत दोनवेळा नगरसेवक होते. नंतर त्यांच्या पत्नी प्रियांका सावंत नगरसेविका झाल्या. आता हा वॉर्ड खुला झाल्याने परत प्रमोद सावंत इच्छुक आहेत.
वॉर्ड ५४ मधून शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका साधना माने स्वतःच्या सुनबाई दीप्ती माने यांच्यासाठी, वॉर्ड ८ मधून भाजपच्या आ. मनीषा चौधरी त्यांच्या कन्या अंकितासाठी, मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना प्रभाग ४७ मधून आई व माजी नगरसेविका जया तिवाना यांच्या जागेवर, मुंबईचे माजी उपमहापौर मोहन मिठबावकर त्यांची कन्या शलाकासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी देखील नगरसेविका होत्या. उद्धवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. सुनील प्रभू यांचा मुलगा व युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू वॉर्ड ५४ मधून, मागठाणेचे शिंदेसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांचे नावसुद्धा इच्छुक म्हणून चर्चेत आहे.
उत्तर पश्चिम मुंबईचे शिंदेसेनेचे खा. रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांचे नाव वॉर्ड ७४ मधून चर्चेत आहे. वॉर्ड १४मधून मूळचे काँग्रेसचे आणि नंतर भाजपच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक झालेले विद्यार्थी सिंग आता स्वतःच्या सुनेला येथून तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत, तर वॉर्ड १३ किंवा १४ पैकी एका ठिकाणासाठी आसावरी पाटील प्रयत्न करत आहेत. वास्तविक वॉर्ड १४ मध्ये त्यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध आहे. मंत्री आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार पुन्हा नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत. शिंदेसेनेच्या माजी आ. यामिनी जाधव व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे मुलगा निखिल याला पालिकेत पाठविण्याच्या तयारीला लागले आहेत.
नात्या-गोत्यांची ही यादी न संपणारी आहे. प्रत्येकाने खासदारकी, आमदारकी आणि आता नगरसेवक पदही आपल्याच घरात मिळावे असा आग्रह सुरू केला आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे सर्वपक्षीय नेते सत्ता आपल्याच घरात राहावी यासाठी जिवाचे रान करत आहेत. ज्यांच्या मागे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मात्र काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे असे सगळे कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर कधीतरी महापालिका निवडणुका होतील या आशेवर ज्या तरुण-तरुणींनी आपापल्या वॉर्डामध्ये प्रचंड मेहनत घेतली, ऐपत नसतानाही लोकांकडून पैसे उभे करत स्वतःलाही उभे केले, अशा अनेक कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सगळ्याच पक्षांनी जर नात्यागोत्याच्या राजकारणाला खतपाणी घालत विद्यमान नेत्यांच्याच नातेवाइकांना तिकिटे देण्याचे धोरण घेतले तर ते त्यांच्यासाठी भले फायद्या-तोट्याचे ठरेल, पण घरात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना काहीतरी करून दाखविण्याची जिद्द ठेवून राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा मात्र यामुळे राजकीय पक्षांवरचा विश्वासच उडून जाईल.
त्यातून येणारी निराशा त्यांना राजकारणापासून कायमची तोडून टाकणारी ठरेल. कदाचित वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हेच हवे असेल. शेवटी फोडणीत टाकलेला कढीपत्ता करपून गेला तरी त्याची फिकीर ना भाजी बनविणाऱ्याला असते, ना ती खाणाऱ्याला... नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कार्यकर्ता घडविणाऱ्या कार्यकर्त्यांमधून नेतृत्वगुण शोधणाऱ्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्राला याची फार मोठी परंपरा आहे. आर. आर. पाटील यांच्यासारखा ग्रामीण भागातला एक तरुण राज्याचा गृहमंत्री म्हणूनच होऊ शकला. एकनाथ शिंदे, नारायण राणे मुख्यमंत्रिपदापर्यंत गेले. छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्या पिढीचे राजकारणी आहेत. या सगळ्यांच्या घरात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातून कोणीही राजकारणात आले नाही.
ही असंख्य उदाहरणे आजूबाजूला असताना आज तरी प्रत्येक नेता आपल्याच घरात पद कसे मिळेल यासाठी वाट्टेल ते करायला तयार होत आहे. ज्यांच्या घरात कोणी राजकारणात नव्हते अशांनी तरी आता राजकीय पार्श्वभूमी नसणारे कार्यकर्ते मैदानात उतरवले पाहिजेत. ही निवडणूक सत्ता काबीज करण्याची नाही तर कार्यकर्ते नेते घडवण्याची आहे, एवढे भान जरी ठेवले तरी पुरेसे आहे....