World Trending: २४ तासांत अख्खा देश दोन वर्षांनी तरुण! नेमकं कारण काय? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:02 AM2023-06-30T11:02:16+5:302023-06-30T12:04:53+5:30
World Trending: आपण तरुण असावं, दिसावं, आपलं वय वाढू नये, आहे त्यापेक्षा कमी दिसावं, चिरतारुण्याचं वरदान आपल्याला लाभावं, आपण कधीच म्हातारं होऊ नये.. जगातल्या जवळपास प्रत्येकाला ही आस असते. अगदी अनादी काळापासून यासंदर्भात अनेकजण अनेक प्रयोग आणि प्रयत्न करत आले आहेत.
आपण तरुण असावं, दिसावं, आपलं वय वाढू नये, आहे त्यापेक्षा कमी दिसावं, चिरतारुण्याचं वरदान आपल्याला लाभावं, आपण कधीच म्हातारं होऊ नये.. जगातल्या जवळपास प्रत्येकाला ही आस असते. अगदी अनादी काळापासून यासंदर्भात अनेकजण अनेक प्रयोग आणि प्रयत्न करत आले आहेत. आयुर्वेदिक जडीबुटी खाण्यापासून, वेगवेगळ्या प्रकारची तेलं अंगाला लावण्यापासून ते आजच्या अत्याधुनिक उपचारांपर्यंत प्रत्येक उपाय त्यासाठी करून बघितले जातात. त्यात फारसं यश मात्र अजून कोणालाही आलेलं नाही. परवा याच सदरात ‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सनचा मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्याला तर तब्बल १५० वर्षे जगायचं होतं. त्यासाठी ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपण्यापासून ते अनेक वेळा प्लॅस्टिक सर्जरी करण्यापर्यंत अनेक प्रयोग त्यानं केले. बारा प्रशिक्षित डॉक्टरांची टीम सदैव त्याच्या दिमतीला होती, तरीही वयाच्या पन्नाशीतच त्याचा मृत्यू झाला!
एकूण काय, तर प्रत्येकाला आपलं वय कमी करायचं आहे, तरुण व्हायचं आणि दिसायचं आहे. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी आहे. दक्षिण कोरियाचे लोक मात्र याबाबत अतिशय ‘भाग्यवान’! येथील लोकसंख्या आहे सुमारे सव्वापाच कोटी! या देशातील प्रत्येक व्यक्तीचं वय बुधवारपासून तब्बल एक ते दोन वर्षांनी कमी झालं आहे. त्यामुळे ते आपोआपच ‘तरुण’ झाले आहेत! याबद्दल या देशाचे लोकही आता खूप खूश आहेत. ‘आमचं वय कमी करा’, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते लढा देत होते. त्यासाठीचा त्यांचा संघर्ष अगदी रस्त्यावरही आला होता. इतकंच काय, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनीही यासाठी कंबर कसली होती. गेल्या वर्षी तिथे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. त्यावेळीही त्यांनी प्रचारात हाच मुद्दा प्रामुख्यानं घेतला होता. मला राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिलंत, तर देशातल्या प्रत्येकाचं वय मी कमी करीन, त्यांना ‘तरुण’ करीन आणि जागतिक स्पर्धेत त्यांना अधिक सक्षम करीन, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यात कदाचित त्यांच्या या आश्वासनाचा आणि त्याबाबतच्या त्यांच्या प्रयत्नांचाही वाटा मोठा असावा!
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे काम करणारा हो सोक. तो या वर्षी तीस वर्षांचा होणार होता, पण अचानक त्याचं वय दोन वर्षांनी कमी झालं आणि तो २८ वर्षांचा झाला! एका झटक्यात दोन वर्षांनी तरुण झाल्यामुळे हो सोक अत्यंत खूश आहे. त्याचं म्हणणं आहे, माझ्या आयुष्याची केवळ दोन वर्षंच वाढलेली नाहीत, तर दोन वर्षांनी मी तरुण झालो आहे आणि माझं आयुष्य आणखी सुंदर करण्यासाठी दोन वर्षांचा अधिकचा वेळ मला मिळाला आहे!
कसं काय झालं असं? साऊथ कोरियाच्या प्रत्येक व्यक्तीचं वय अचानक एक ते दोन वर्षांनी कमी कसं काय झालं? जगात कोणालाही जमलं नाही, ते या देशातल्या प्रत्येकाला एका झटक्यात कसं काय जमलं? अशी कोणती जादू केली त्यांनी?
- काही नाही, साऊथ कोरियाच्या सरकारनं फक्त कायदा बदलला आणि एकाच दिवसात अख्खा देश एक ते दोन वर्षांनी ‘तरुण’ झाला! दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. तिथे मूल जन्माला येताच ते एक वर्षाचं झालं असं समजलं जातं. याशिवाय नवं वर्ष आलं, म्हणजे एक जानेवारी उजाडला की त्या प्रत्येक व्यक्तीचं वय पुन्हा एक वर्षाने वाढतं!
सोप्या भाषेत सांगायचं तर समजा, एखादं मूल ३१ डिसेंबरला जन्माला आलं, तर लगेच ते एक वर्षाचं आहे, असं मानलं जातं. एक जानेवारीला नवं वर्ष सुरू झाल्याबरोबर ते दोन वर्षांचं झालं असं मानलं जातं, मग त्याची जन्मतारीख काहीही असू द्या! म्हणजे जन्माला आल्यापासून एकाच दिवसात हे मूल दोन वर्षांचं होईल! सांस्कृतिक परंपरेनुसार तिथे याच पद्धतीनं वय मोजलं जातं. पण यामुळे अनंत अडचणी येत असल्यानं ही पद्धत परवापासून बंद करण्यात आली असून वय मोजण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या देशातील सगळ्यांचं वय एक ते दोन वर्षांनी कमी झालं आहे!
उत्तर कोरिया, व्हिएतनामही होणार तरुण?
विमा, परदेश प्रवास, सरकारी कामांदरम्यान वय मोजणीत लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे लोकही या पद्धतीला वैतागले होते. कोरियात वय मोजण्याची आणखी एक पद्धत आहे. त्यानुसार मूल जन्माला आल्यावर त्याचं वय शून्य मानलं जातं, पण एक जानेवारीला ते लगेच एक वर्षाचं होतं! चीन, जपानमध्येही पारंपरिक पद्धतीनंच वय मोजलं जायचं, पण त्यांनी ही पद्धत बंद केली आहे. उत्तर कोरिया आणि व्हिएतनाममध्ये मात्र आजही जुन्या पद्धतीनंच वय मोजलं जातं!