सायबर दहशतवादाची उपेक्षा घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:56 AM2019-05-28T04:56:49+5:302019-05-28T04:57:02+5:30

चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने या घटनेच्या साक्षी नोंदविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती रायटर या वृत्तसंस्थेने १३ मे रोजी दिली आहे

Ignore cyber terrorism is fatal | सायबर दहशतवादाची उपेक्षा घातक

सायबर दहशतवादाची उपेक्षा घातक

Next

- डॉ. एस. एस. मंठा

न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथील मशिदीत गोळीबार करून जे हत्याकांड घडविण्यात आले त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने या घटनेच्या साक्षी नोंदविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती रायटर या वृत्तसंस्थेने १३ मे रोजी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचे पंतप्रधान जसिंदा आर्डर्न यांनी फ्रान्सच्या मदतीने आॅनलाइन हिंसाचार हाताळण्यास जागतिक पाठिंबा मिळावा यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची तयारी चालविली आहे. या आॅनलाइन हिंसाचाराला दहशतवाद म्हणायचे का?
ब्रेस हॉफमन या विचारवंताने दहशतवादाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. ‘‘हिंसक घटनांच्या आधारे जाणीवपूर्वक भयाची निर्मिती करून त्याचा वापर करणे किंवा राजकीय बदल घडवून आणण्यासाठी हिंसाचार घडवून आणण्याची धमकी देणे. कारण सर्व तºहेच्या दहशतवादी कृत्यात हिंसाचार किंवा हिंसाचाराची धमकी असतेच...’’ अशा कृत्यातून निर्माण होणाऱ्या अराजकाला अन्य नाव देणे तसेही अशक्य आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी त्याची संभावना ‘हिंसाचार’ अशी करणे हे त्यांच्या शहाणपणाचे आणि दूरदर्शित्वाचे द्योतक म्हणावे लागेल. त्याची गणना देशाच्या सार्वभौमत्वाविरोधात पुकारलेले युद्ध अशीही करता येईल. नवीन रचना प्रस्थापित करण्यासाठी जुने मोडून टाकण्यासाठी केलेले कृत्य, असेही या हिंसाचाराबद्दल म्हणता येईल.
राष्ट्राराष्ट्रातील संबंध हे ‘शांतता’ किंवा ‘युद्ध’ या स्थितीमुळे ठरत असतात. शांतता म्हणजे संघर्षविहिनता असे असतेच असे नाही आणि युद्ध म्हणजे परंपरागत युद्ध किंवा ‘आण्विक युद्ध’ अशीही अवस्था नसते. दोन राष्ट्रांत सर्वंकष युद्ध हल्ली होत नाही तसेच पारंपरिक शस्त्रांचा वापरही करीत नाहीत. अन्य राष्ट्रांचे अर्थकारण दुबळे करण्यासाठी आर्थिक युद्धाचाही वापर करण्यात येतो आणि अन्य राष्ट्राचे राजकीय व लष्करी सामर्थ्य कमी करण्यात येते. ते व्यापारावर बंदी घालतात, बहिष्काराचे अस्त्र वापरतात, कर आकारणीत भेदभाव केला जातो, भांडवल गोठवण्यात येते, मदत रोखण्यात येते, गुंतवणूक बंदी केली जाते आणि भांडवलाचा प्रवाह थांबविण्यात येतो.
राष्ट्राराष्ट्रांमध्ये अशा तºहेची कृत्ये सुरू असतात, ज्यातून प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केली जात नाही. पण ज्यांची गणना शांततेत करता येत नाही, त्यांना कमी क्षमतेचे युद्ध म्हणता येईल. त्यात गनिमी युद्ध आणि दहशतवादी कृत्ये यांचा समावेश असू शकतो. काही अप्रभावित गट, संभाव्य क्रांतिकारी आणि तत्सम लोक या तºहेच्या युद्धतंत्राचा वापर करतात आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संघर्ष झाले तर ते देशाच्या परिघातच घडून येतात. त्यात बाह्य राष्ट्रांचा हस्तक्षेप झालाच तर तो राष्ट्रांतर्गत बंडखोरांना सहकार्य करण्यातून होऊ शकतो. पण आॅनलाइन गुन्हेगारीमुळे या सर्व गोष्टी मागे पडू लागल्या आहेत. तेव्हा नवे युद्ध हे आॅनलाइन पद्धतीनेच होईल.


दहशतवादी कृत्य घडत असताना प्रत्यक्ष नुकसानीशिवाय अप्रत्यक्ष नुकसानही होत असते. ख्राईस्टचर्चची घटना सोशल मीडियावरून प्रदर्शित होत असताना ते प्रदर्शन थांबविण्याचा प्रयत्न सोशल मीडियाने का केला नाही? ते तंत्रज्ञानासमोर आव्हान होते का? त्यांनी कमीत कमी त्या राष्ट्रापुरते त्या घटनेचे प्रसारण थांबवायला हवे होते. दहशतवाद्यांच्या कारवायांना प्रतिबंध घालणे त्यांना का जमू नये? धोकादायक चित्रे आणि व्हिडीओ काढून टाकण्यासाठी त्यांनी ‘डिजिटल फिंगर प्रिंटिंग’चा वापर का केला नाही? ज्यांनी दहशतवादी विषयाचे प्रसारण करण्यासाठी ‘फेसबुक लाइव्ह’ सेवा वापरली त्यांना त्यापासून का परावृत्त करण्यात आले नाही? लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याच्या कृतीचा गैरवापर होणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचे नाही का?
प्रचारासाठी प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो तर राजकारणी आणि राजकीय पक्ष स्वत:चे स्तोम माजविण्यासाठी सोशल मीडिया वापरतात. सायबर स्पेस आणि दहशतवाद जेव्हा एकत्र येतात तेव्हा सायबर दहशतवादाचा जन्म होतो. आपल्या विचारांचे प्रसारण करण्यासाठी दहशतवादी गट सोशल मीडियाचा वापर करतात. सायबरविना असे कृत्य करणे हे केवळ प्रचार करणे ठरेल. सायबर हिंसाचाराचे प्रक्षेपण करण्यासाठी मीडिया कंपन्यांनी आपल्या व्यासपीठाचा वापर करू देऊ नये, असे आपण म्हणतो. पण एखादी घटना हा सायबर दहशतवादी हल्ला आहे हे ठरविण्यासाठी त्या हल्ल्याने एखाद्या व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान व्हायला हवे.

सोशल मीडियावरील प्रसारणाच्या विरोधात आय.टी. कायद्यानुसार कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यात करायला हवी. सोशल मीडियावरून प्रसारित होणाºया द्वेषमूलक भाषणांचे चाहते जसे असतात, तसेच त्याचे विरोधकही असतात. एखादा विषय अपलोड केला जात असताना तो थांबविता येत नाही तसेच प्रसारण होत असलेल्या विषयांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनांची गरज लागेल. एकूणच सायबर दहशतवादाची उपेक्षा करून चालणार नाही. या संज्ञेचा अत्याधिक वापर झाला तर निर्माण होणाºया उन्मादामुळे सायबर हल्ल्याचे सुलभीकरण होईल आणि सायबर सुरक्षिततेकडून माणसाचे लक्ष अन्यत्र वेधले जाईल.

(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)

Web Title: Ignore cyber terrorism is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.